डॉ. शीतल श्रीगिरी, स्त्रीरोगतज्ज्ञ.

अबॉर्शन किंवा गर्भपात हा कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात येणारा दु:खद आणि त्रासदायक पण कधी कधी अटळ असा प्रसंग असतो. म्हणून अशा प्रसंगी काय काळजी घ्यावी हे माहीत असणे गरजेचे आहे. गर्भपात करणे चुकीचे असल्याचा गैरसमज समाजात असल्याने महिला अशा प्रसंगी अनेकदा घरगुती उपाय किंवा लपूनछपून औषधांच्या दुकानांमधून गोळ्या घेऊन गर्भपात करण्याचा मार्ग निवडतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. खरं तर सुरक्षितरीत्या गर्भपात हा महिलेचा हक्क आहे आणि त्याची तिला जाणीव होणे महत्त्वाचे आहे.

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

गर्भपात हा क्षुल्लक कारणाने घेण्याचा निर्णय नाही. गर्भनिरोधक साधनांचा योग्य रीतीने वापर करून गर्भपाताची वेळ टाळता येऊ शकते. गर्भपाताचा निर्णय हा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक असून योग्य रीतीने गर्भपात करवून घेणे हे महिलेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. दुसरी गोष्ट म्हणजे भारतात गर्भपाताला सशर्त परवानगी आहे, म्हणजेच काही ठरावीक परिस्थितीत आणि ठरावीक तज्ज्ञांना वैद्यकीय गर्भपात सेवा देण्याची परवानगी आहे. दुर्दैवाने अनेक महिलांना याची योग्य माहिती नसते किंवा समजाच्या भीतीपोटी त्या वैद्यकीय तज्ज्ञांकडे न जाता गावठी, अशास्त्रीय उपाय करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. एका सर्वेनुसार भारतात असुरक्षित गर्भपातांमुळे दर दिवशी दहा महिलांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी महिलांना कायदे संमत आणि सुरक्षित गर्भपात ही संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे.

गर्भपात हा दोन प्रकारचा असतो :

* आपोआप होणारा (स्पॉन्टॅनियस अबॉर्शन/मिसकॅरेज)

* करवून घेतलेला (इंडय़ुस्ड अबॉर्शन)

पहिल्या प्रकारात कधी गर्भ सदोष असल्यामुळे, काही संप्रेरक पुरेसे नसल्यामुळे किंवा गर्भाशयाचे अस्तर नीट विकसित झालेले नसल्यामुळे गर्भवती महिलेला पोटात दुखणे, रक्तस्राव होणे असा त्रास होऊन गर्भाचा गोळा किंवा गाठी पडतात आणि आपोआप गर्भपात होतो. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत हा धोका जास्त असतो. कधी कधी गर्भ पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि रक्तस्राव सुरूच राहणे, पोटात दुखणे, दुखणे अंगावर काढत राहिल्यास जंतुसंसर्ग होऊन ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करणे आणि त्यांच्याकडून उपचार करून घेऊन गर्भाशयात राहिलेला गर्भाचा भाग काढणे गरजेचे असते.

दुसऱ्या प्रकारात वैद्यकीय तज्ज्ञांकडून गर्भपात केला जातो.

गर्भपात हा वैद्यकीय तज्ज्ञांकडून करून घेतला आणि नंतर योग्य ती काळजी घेतली, तर त्यातला धोका कमी करू शकतो. त्याच वेळी हे विसरू नये की मूल नको असल्यास गर्भनिरोधक वापरून संततिनियमन करणे हा मुख्य उपाय आहे. त्यामुळे गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे हाच प्राधान्यक्रम असणे आवश्यक आहे. गर्भपात हा अपवादात्मक परिस्थितीत अपरिहार्यपणे घेण्याचा निर्णय आहे. त्यासाठी गावठी, अशास्त्रीय उपाय न करता तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे हाच योग्य मार्ग आहे.

खालील कारणांसाठी गर्भपात करण्यास कायद्याने परवानगी आहे

* गर्भावस्थेमुळे मातेच्या जिवाला गंभीर धोका उद्भवणार असेल किंवा तिच्या शारीरिक अथवा मानसिक अवस्थेला गंभीर धोका निर्माण होणार असेल तर गर्भपाताला कायद्याने परवानगी दिली जाते.

* गर्भावस्थेत केलेल्या तपासणीत बाळामध्ये गंभीर व्यंग आढळून आल्यास आणि त्याला जन्मानंतर शारीरिक किंवा मानसिकदृष्टय़ा गंभीर अपंगत्वाची शक्यता असल्यास गर्भपात करता येतो.

* बलात्कारानंतर महिलेला गर्भधारणा झाली असल्यास (यात बलात्कारामुळे स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर आघात होणे गृहीत धरले आहे) गर्भपात करणे कायदेशीर आहे.

* महिलेने किंवा तिच्या पतीने गर्भनिरोधक साधन वापरूनसुद्धा ते अयशस्वी होऊन गर्भधारणा झाली असल्यास.

* वर नमूद केलेल्या कारणांसाठी प्रमाणित वैद्यकीय तज्ज्ञांकडून गर्भपात करवून घेता येतो. यात गर्भ किती आठवडय़ांचा आहे यावरून गोळ्या किंवा भूल देऊन शल्यचिकित्सेने गर्भपात केला जातो.

गर्भपातानंतर काळजी घ्या..

* गर्भपात आपोआप झाला असल्यास तो पूर्ण झाला आहे की नाही याची खात्री डॉक्टरांकडून करून घ्यावी.

* रक्तस्राव जास्त काळासाठी किंवा जास्त प्रमाणात झालेला असल्यास जंतुसंसर्ग आणि रक्तक्षयासारखे दुष्परिणाम होऊ  शकतात. त्यासाठी डॉक्टरांनी दिलेली प्रतिजैविके आणि रक्तवाढीची औषधे सुचवल्याप्रमाणे घ्यावीत. डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार पुरेशी विश्रांतीही घ्यावी.

* गर्भपात करवून घेतलेला असल्यास डॉक्टरांनी योग्य ती पद्धत वापरून गर्भपात केल्यानंतर त्यांनी सुचवलेली औषधे घ्यावीत.

* गर्भपातानंतर जास्त रक्तस्राव होणे, पोटात जास्त दुखणे, ताप येणे, योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव होणे, ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

* कोणत्याही गर्भपातामध्ये रक्तस्राव झालेला असतो. त्यामुळे लोह आणि प्रथिनेयुक्त सकस आहार, तसेच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

* अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गर्भपातांमुळे येणारा मानसिक ताण. येणाऱ्या बाळाच्या चाहुलीने आनंदित झालेल्या आईसाठी गर्भपात होणे हा दु:खद धक्का असतो. अशा वेळी तिला मानसिक आधार देणे, नैराश्य येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.

*  स्वत:हून गर्भपात करवून घेतलेल्या काही महिलांमध्ये कधी अपराधाची भावना तर कधी भीती निर्माण होते. ती नैराश्यात जाऊ  शकते. अशा वेळी तिचे मानसिक आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. अस्वस्थता किंवा नैराश्य तीव्र झाल्या, मानसिक अस्वस्थता जास्त आहे असे वाटल्यास समुपदेशन आणि मानसोपचार यांची मदत घ्यायला हवी.