भारतात रोडट्रिपवर जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. हिवाळ्यामध्ये अशा प्रकारच्या सहलींचे प्रमाण जास्त असते. पंजाब, बेंगळूरु, लडाख अशा ठिकाणी वर्षांतून एकदा तरी सहल काढणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्गावरून प्रवास करणे जरी आपल्याला नवीन नसले तरी अनोळखी शहरात अनोळखी रस्त्यांवर वाहन चालवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

वर्षांतून एकदा गावी जाणे किंवा एखाद्या ठरावीक प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणे अशा चौकटीबद्ध सहली काहीशा मागे पडत आहेत. तरुण मंडळीच नव्हे, तर मध्यमवयीन लोकांचादेखील रोडट्रिपवर जाण्याचा कल वाढतो आहे. अशा प्रकारची सहल नवीन ठिकाणाचा वेगळाच अनुभव देऊन जाते. अशा सहलींमुळे खऱ्या अर्थाने आपण एखाद्या नवीन ठिकाणाची ओळख करून घेतो. अशा रोडट्रिपवर जाताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मोठय़ा महामार्गामुळे देशातील मोठी शहरे जवळ आली आहेत. महामार्ग आपल्याला वेगाची मुभा देतो तेवढीच आपल्यावर नियमाने गाडी चालवण्याची जबाबदारीदेखील टाकतो. मागील काही महिन्यांमध्ये महामार्गावर आणि घाटांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमागे अनेक कारणे असू शकतात. महामार्गावर गाडी चालवताना गाडीचा वेग जास्त असतो त्याचप्रमाणे इतर गाडय़ांना ओव्हरटेक करण्याचे प्रमाण जास्त असते. एक जबाबदार कारचालक म्हणून स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

महामार्गामुळे आपल्याला आपल्या अपेक्षित स्थळी लवकर पोहोचण्यात मदत होते; परंतु बरेच वेळा महामार्ग किती धोकादायक ठरू शकतो याबाबत लोक विसरतात. तुम्ही नवीनच गाडी शिकला असाल तर लगेचच महामार्गावर गाडी चालवण्याचा मोह आवरा. तुमच्यातील किती जणांना गाडी चालवता येते ते पाहा. दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त गाडी चालवयाची सवय नसल्याने एकाच व्यक्तीने तीन ते चार तासांहून अधिक गाडी चालवल्यास थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे ड्रायव्हिंगचे  रोटेशन ठेवल्यास एकाच व्यक्तीवर गाडी चालवण्याचा ताण येणार नाही.

कार चालवण्याआधी ती कोणत्या स्थितीत आहे ते तपासून घ्या. महामार्गावर किंवा घाटातून प्रवास करण्याआधी तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रवासाआधी टायरची स्थिती आणि हवेचा दाब तपासून घ्या. प्रवास सुरू करण्याआधी तुम्ही ताजेतवाने असणे गरजेचे आहे. दमलेल्या अवस्थेत किंवा खूप घाईत गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते.

काही लोकांच्या बेजबाबदार गाडी चालवण्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. म्हणून महामार्गावर गाडी चालवताना नेहमी सतर्क राहा. ब्रेकवर पकड राहील असे बूट किंवा पादत्राणे घाला. गाडीच्या फ्लोअरवर पाण्याची बाटली किंवा अन्य कोणतीही वस्तू ठेवू नका. अशा प्रकारे काही ठेवल्यास ते ब्रेक पेडलमध्ये अडकून ब्रेक दाबण्यास अडचण येऊ  शकते. प्रवास सुरू करण्याआधी नेहमी सीटबेल्ट लावण्याची सवय लावून घ्या. महामार्गावर असताना मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांनीदेखील सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे.

गाडीच्या क्षमतेहून अधिक सामान त्यात लादू नका. यामुळे गाडीच्या गतिशील वर्तनावर नकारात्मक परिणाम होऊ  शकतो. त्याचप्रमाणे ब्रेक लागण्याचे अंतर वाढू शकते.

तुमच्याकडे पर्याय असेल तर शक्यतो दिवस प्रवास करा. रात्री दृश्यमानता कमी असते, त्यामुळे अपघाताची शक्यतादेखील वाढते. प्रवासात जरी तुम्ही एखादे नवीन वाहन चालवत असाल तर ती गाडी कशी चालते, स्टिअरिंग कसे प्रतिसाद देते ते एकदा पाहा. गाडीचे ब्रेक कसे आहेत, वेगात गाडी कशा प्रकारे नियंत्रणात राहते, याची खात्री करून घ्या. तुम्ही चालवत असलेल्या वाहनाच्या मर्यादा आधीच समजून घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे तुम्ही तुमच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीत बदल करू शकता.

एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) चालवताना विशेष काळजी घ्या. एसयूव्ही ही सेडान आणि हॅचबॅकहून जड असल्यामुळे ब्रेक दाबताना सतर्क राहणे गरजेचे आहे. महामार्गावर गाडी चालवताना खिडकीच्या काचा बंद करा. हे गाडीच्या वायुगतिशास्त्रानुसार योग्य आहे. त्याचप्रमाणे खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. वातानुकूलन यंत्रणा फ्रेश मोडवर ठेवा. जर तुम्ही नेहमी ही यंत्रणा रिसक्र्युलेशनवर ठेवत असाल तर तासाभराने एकदा ती फ्रेश मोडवर आणा. यामुळे गाडीच्या केबिनमध्ये ताजी हवा खेळती राहील आणि तुम्हाला सुस्ती येणार नाही. शहराप्रमाणे महामार्गावर गाडी चालवतानादेखील दोन्ही हात स्टिअरिंगवर ठेवा.

लांबच्या प्रवासाला जाताना पहिल्या दोन-तीन तासांनंतर प्रवास कंटाळवाणा होण्याची शक्यता असते. तरी रस्त्यावरून लक्ष विचलित होऊ देऊ  नका. गाडीत म्युझिक सिस्टमवर गाणे लावणे हा प्रवास सुखकर करण्याचा सोपा उपाय, मात्र गाडीत मोठय़ा आवाजात गाणे वाजवू नका. रात्रीच्या प्रवासात फोग लाइट आणि लो बीम सुरू ठेवा. यामुळे इतर वाहनांना तुम्ही सहज दिसू शकता. महामार्गावर आल्यानंतर गाडीचा वेग वाढवा. महामार्गावर शहरापेक्षा वेगाने गाडी चालवण्याची सवय लावून घ्या.

तुम्हाला सोयीची ठरेल अशा स्थिर वेगात गाडी चालवा. बऱ्याच वेळा लोक सरळ रस्त्यांवर गाडीचा वेग वाढवतात, तर वळणांवर वेग एकदम कमी करून टाकतात. यामुळे गाडीवर तर ताण येतोच, पण  वळणावर गाडी चालवणे जटिल होऊन जाते. विशेष गतीने गाडी चालवल्यास सहज अंतर कापता येते. महामार्गावरून जाताना आपल्या मार्गाची किंवा थांबा घ्यायची पूर्वतयारी करून घ्या. अचानक ब्रेक दाबून गाडी बाजूला घेणे किंवा शेजारच्या वाहनासोबत ओव्हरटेकिंगचे द्वंद्व टाळा.

घाटातून  वाट काढताना

* उतारावर एकाच ठरावीक गिअरवर गाडी चालवा.

*  उतरताना गाडी न्यूट्रल गियरवर ठेवू नका.

*  वळणावर नेहमी हॉर्न वाजवा.

*  घाट उतरताना गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा.

*  वळणावर ओव्हरटेक करण्याचा मोह आवरा.

*  मोठय़ा वाहनांना आतल्या बाजूने ओव्हरटेक करू नका.

*  वळणावर गाडीचा वेग कमी केल्यास गाडीवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवता येते.

*  तुमच्या पुढे मालवाहू गाडी असल्यास सुरक्षित अंतर ठेवा.

* चढणावर गाडीची वातानुकूलित यंत्रणा बंद करा. यामुळे गाडीला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

*  चढणावर गाडी थांबवताना हॅन्डब्रेकचा वापर करा. अशा वेळी क्लचचा वापर करू नका.