दिशा खातू

सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे तंत्र अजूनही भारतात प्रचलित झालेले नाही. समाजमाध्यमांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणाऱ्यांची संख्याच आपल्याकडे जास्त आहे. पण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांचा व्यावसायिक वापर करण्याकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. बसल्या जागी या समाजमाध्यमांतून आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारी सांगते..

इन्स्टाग्रामच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लघुउद्योग आणि स्टार्टअप उद्योगांनी आपल्या उत्पादनासाठी इन्स्टाग्रामचा वापर सुरू केला आहे. कलावंतही आपल्या प्रमोशनसाठी इन्स्टाग्रामचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे इन्स्टावरील अर्थकारणाला वेग आलेला आहे. इन्स्टाग्रामने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २५ कोटींहून अधिक खात्यांमार्फत जाहिरात करण्यात येत आहेत.

फेसबुकने ऑक्टोबर २०१० साली इन्स्टाग्राम हे भ्रमणध्वनी अ‍ॅप्लिकेशन बाजारात आणले इन्स्टाग्रामची लोकांमध्ये असलेली प्रसिद्धी ही दिवसेंदिवस वाढत आहे. आज एक अब्ज लोक हे अ‍ॅप वापरत आहेत. जाहिरातीसाठी समाजमाध्यमांत वापर होऊ  लागल्याने इन्स्टाग्रामने देखील विविध फीचर्स आणून त्यात इन्स्टाग्राम स्टोरी, प्रमोशन, जाहिरात, बिझनेस अकाऊंट असे प्रकार आणले. ज्यामुळे लघुउद्योग आणि स्टार्टअप्सना तसेच कलावंत आपल्या प्रमोशन आणि जाहिरातीसाठी इन्स्टाग्रामचा वापर करू लागले आहेत.

कलावंतांकडूनही वापर

इन्स्टाग्रामचा वापर फक्त वस्तू आणि सेवांच्या विपणनासाठी नव्हे तर नवोदित मॉडेल्स, अभिनेत्री-अभिनेते, छायाचित्रकार, चित्रकार, मूर्तिकार, हस्तकलाकार इत्यादी या माध्यमाचा वापर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करू लागले आहेत. तसेच सर्वच क्षेत्रांतील प्रस्थापित तारे-तारका आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपली माहिती, नव्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी याचा वापर करत आहेत.

जाहिरात अशी होते?

अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, कंपन्यांना त्यांच्या लक्ष्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी इन्स्ट्राग्राम प्रमोशनल जाहिराती करते. यासाठी इन्स्टाग्रामला ठरलेल्या पॅकेजनुसार ऑनलाइन पैसे द्यावे लागतात. ०.२० डॉलर पासून किंमत सुरू  होते. हे विशिष्ट कालावधीसाठी असते. यात कंपन्यांना छायाचित्र, चित्रफिती किंवा संपूर्ण पेजचेही प्रमोशन करता येते.

यात शाऊटआऊट्स हादेखील एक प्रकार आहे. यात काही अधिकृत इन्फ्ल्युएन्सर असतात. वस्तू किंवा सेवेचा चलचित्रे किंवा छायाचित्रे त्यांना पाठवायचे. त्यानुसार ठरलेले पैसे पाठवायचे आणि सांगितलेल्या वेळेनुसार ते प्रसिद्ध केले जाते. ज्यात उत्पादकांनी दिलेली लिंक, टॅग्स आणि मजकूर दिला जातो. यासाठी ‘शाऊट कार्ट’चा वापर केला जातो. यात आणखी एक पारंपरिक प्रकार आहे. यात ज्यांचे फॉलोअर्स १ कोटी किंवा त्याहून अधिक असतील, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून महिन्याला शेअरिंगसाठी किती मजकूर देणार त्यानुसार पैसे निश्चित करून हे काम केले जाते. यात कंपन्यांचे उत्पादन किंवा सेवेचा फोटो ते टॅग करून शेअर करतात. मग त्या टॅगवरून लोक कंपन्यांपर्यंत पोहोचतात. यासाठी १ हजारपासून पुढे पैसे ठरवले जातात. बऱ्याचदा प्रस्थापित (एस्टॅब्लिश) अकाऊंट्स ५० हजार, १ लाख ते पुढे १० लाखांपर्यंत विकली जातात. यामुळे कंपन्यांना जाहिरातीसाठी थेट आणि त्वरित अकाऊंट वापरता येते. शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. मग त्या अकाऊंटला कंपनीचे ऑफिशिअल अकाऊं ट बनवले जाते. इन्स्टाग्रामने प्रसिद्ध केलेल्या २०१७च्या अहवालानुसार भारतात एकूण २५ कोटी अ‍ॅक्टिव्ह बिझनेस अकाऊं ट्स आहेत.

‘इन्स्टाग्राम बिझनेस अकाऊंट’ काय आहे?

इन्स्टाग्रामच्या बिझनेस खात्यात वस्तू किंवा सेवांची छायाचित्रे, चलचित्रे, कॅरुसेल (एकाच पोस्टमध्ये अनेक गोष्टी), कथा इत्यादींचा वापर करून ते फेसबुकला जोडले जाते. त्यामुळे उत्पादकांची वस्तू किंवा सेवा सर्वत्र दिसू लागते.

माझा हॅण्डक्राफ्टेड वस्तूंचा व्यवसाय आहे. आम्ही आमच्या नव्या कलाकुसरी, वस्तूंची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी छायाचित्रे, चलचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यातून अनेक लोक आमच्याशी जोडले जातात. ते पाहून लोक आमच्याकडे चौकशी करतात, वस्तूंबद्दल प्रश्न विचारतात आणि पुढे जाऊन तेच आमचे ऑनलाइन, ऑफलाइन ग्राहक होतात, पण यात आपल्या वस्तू सतत व्हिजिबल असणे आवश्यक आहे. ज्यामुळे ती वस्तू लोकांच्या लक्षात राहते.

– शिवकला मुदलियार, थिंग्ज एक्सेट्रा कंपनीच्या प्रमुख.

प्रमोशन करण्यासाठी इन्स्टाग्राम वापरण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत आहे. याचे कारण म्हणजे समाजमाध्यमांमधले हे सर्वाधिक दृश्य माध्यम आहे. योग्य टॅग्स, छायाचित्रे, चलचित्रे, कथा यांच्या माध्यमातून आपल्या लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. भविष्यात हेच फॉलोअर्स प्रत्यक्ष ग्राहक होतात. ही दीर्घ प्रक्रिया असली तरी याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळालेला आहे. म्हणूनच हे अ‍ॅप सर्वाधिक प्रसिद्ध आहे आणि हे बेस्ट मोबाइल अ‍ॅपही ठरलेले आहे.

– आदित्य पाटील, डिजिटल मीडिया व्यवस्थापक.