मकरंद जोशी

सध्या तरी गारवा आहे, पण सूर्याने डोळे वटारले की त्याच्या झळांपासून वाचण्यासाठी सगळे आतुर होतात. भारतासारख्या भौगोलिक वैविध्य लाभलेल्या देशात त्रासदायक हवामानापासून सुटका करून घेण्याची सोय निसर्गानेच करून ठेवली आहे. त्यामुळे उत्तरेतील हिमालयापासून ते दक्षिणेतील हिरव्यागर्द डोंगररांगांपर्यंत विविध पर्याय खुणावू लागतात, पण नेमकी याच काळात शाळा, कॉलेजला सुट्टी असते. त्यामुळे पर्यटनस्थळी जाण्या-राहण्यासाठी बुकिंग मिळणे कठीण होऊन बसते. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी आताच नियोजन करू या..

दक्षिण भारत म्हटले, की उटी, कोडाई, मुन्नार, कुर्ग अशी नावे झटकन आठवतात, पण त्याखेरीज इतरही थंड हवेची रमणीय ठिकाणे दक्षिण भारतात आहेत. त्यातलं एक म्हणजे तमिळनाडूच्या उत्तर भागातलं येराकूड. हे ठिकाण सालेम जिल्ह्य़ातील सर्वरायण हिल्सवर वसलं आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फुटांवर वसलेलं येराकूड वर्षभर हिरवंगार आणि त्यामुळे गारेगारही असतं. या पर्यटनस्थानापासून सालेम शहर फक्त ३२ कि.मी. अंतरावर आहे, त्यामुळे सालेमचं रेल्वे स्थानक आणि विमानतळ इथून सर्वात जवळ आहे. कॉफीच्या मळ्यांनी वेढलेल्या येराकूडचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला विशाल तलाव. या तलावाभोवती असलेल्या आखीव रेखीव उद्यानात दरवर्षी मे महिन्यात समर फेस्टिव्हल साजरा केला जातो. येराकूडच्या दक्षिणेला लेडीज सीट म्हणून पॉइंट आहे. तिथून भोवतालच्या परिसराचे विहंगम दर्शन घडते. विशेषत: संध्याकाळी दूरवरच्या सालेम शहरातले चमचमणारे दिवे बघताना मजा वाटते. इतर कुठल्याही हिल स्टेशनप्रमाणेच येराकूडमध्येही ब्रिटिश राजवटीच्या खुणा पाहायला मिळतात, त्या १८२० साली बांधलेल्या ‘ग्रँज’ या बंगल्याच्या रूपाने. तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर एम. डी. कॉकबर्न यांनी हा बंगला बांधला होता आणि त्याच्या भोवती येराकूडमधला पहिला कॉफीचा मळा लावण्यात आला होता.

बंगळूरुपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर असलेलं एक छोटसं गिरीस्थान म्हणजे नंदी हिल्स. चिक्कबल्लापूर जिल्ह्य़ातील हे ठिकाण नंदीदुर्ग म्हणूनही ओळखलं जाते. समुद्रसपाटीपासून ४८५० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणाचे हवामान उन्हाळ्यातही आल्हाददायक असते. याच ठिकाणी पेन्नार, पलार आणि अर्कावती या नद्यांचा उगम होतो. म्हैसूरचा बादशहा टिपू सुलतान उन्हाळ्यात इथे मुक्कामाला येत असे. पुढे इंग्रज अधिकारीही उन्हाळ्यात या ठिकाणच्या गारव्याचा आनंद घ्यायला येत. इथल्या नंदी गावातील भोग नंदीश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे काम नोळंबा, गंग, चोळ, होयसाळ अशा विविध राजवटींत ९व्या शतकापासून ते १३व्या शतकापर्यंत चालले होते. नंदी हिल्सच्या वळणवाटांवर सायकल चालवण्याचा आनंद जसा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे पॅराग्लायडिंग करून आकाशातून परिसर न्याहाळण्याचा अनोखा अनुभवही घेऊ  शकता.

उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी भारताच्या उत्तरेकडे वळलात तर हिमालयाच्या कुशीतल्या ठिकाणांची रांगच दिसू लागते. शिमला, मनाली, नैनिताल, मसूरी, कौसानी अशा अतिपरिचयाच्या ठिकाणांबरोबरच जरा हटके ठिकाणांचीही इथे कमतरता नाही. उत्तराखंडमध्ये अल्मोडाजवळ असलेलं बिनसर म्हणजे जणू हिमालयातील झाकलेलं माणिकच. इतिहासकाळातील चंद राजघराण्याची राजधानी असलेलं हे ठिकाण हिमालयाच्या कुमाऊं  रांगेत सुमारे आठ हजार फुटांवर वसलेलं आहे. बिनसरमधून चौखंबा, नंदादेवी, त्रिशूळ, शिवलिंग, पंचौली अशा बर्फाच्छादित रांगांचा नजारा पाहायला मिळतो. या गावाभोवतीचे अरण्य म्हणजेच बिनसर अभयारण्य वन्यजीवप्रेमींना हमखास आकर्षित करते. कस्तुरीमृग, हिमालयन गोरल, चितळ, बिबटय़ा, अस्वल अशा प्राण्यांबरोबरच सुमारे २०० प्रकारचे पक्षी या अरण्यात पाहायला मिळू शकतात. नैनितालपासून बिनसर ९६ कि.मी.वर आहे, तर काठगोदाम (१२० कि.मी.) हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

उत्तराखंडमधीलच आणखी एक झकास ठिकाण म्हणजे लॅन्सडाऊन. गढवालमधील पहाडावर ५६८६ फुटांवर ओक आणि ब्लू पाइन झाडांच्या हिरव्या गर्दीत वसलेलं हे ठिकाण निवांतपणे सुट्टीची मजा घ्यायला उत्तम आहे. भुल्ला ताल या चिमुकल्या तळ्यातील बोटिंग आणि गढवाल रेजिमेंटचे ‘दरवानसिंग संग्रहालय’ सोडले तर इथे बाकी काही नाही. त्यामुळे डोंगर उतारावरच्या पायवाटांवर चक्कर मारत शुद्ध हवा छातीत भरून घेण्याचा आणि घडय़ाळाकडे दुर्लक्ष करत आराम करण्याचा आनंद नक्की घेता येतो. लॅन्सडाऊनकडे येताना किंवा जाताना वाटेत ऋषिकेश-हरिद्वारला थांबून व्हाइट वॉटर राफ्टिंगचा थरारही अनुभवता येतो. लॅन्सडाऊनला गेल्यावर स्थानिकांची लाडकी ‘बाल’ मिठाई खायला आणि ‘बुरांश’ म्हणजे ऱ्होडोडेंड्रॉनचे सरबत प्यायला विसरू नका.

ट्रेन, विमान, हॉटेल सगळं काही आत्ताच बुक करून टाका आणि उन्हाळी सुट्टी करा, गारेगार..

makarandvj@gmail.com