तवानचा आणि आपला संबंध येतो ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लिहिलेले मेड इन तवान वाचण्यापुरता. भारतीय पर्यटकांच्या विश लिस्टमध्ये तवान नसतोच. तंत्राधारित उत्पादनांमुळे येथे सुबत्ता असली, पायाभूत सुविधादेखील उत्तम असल्या तरी खास पर्यटनपूरक योजना राबवत तवान पर्यटनाच्या नकाशावरदेखील पुढे आला आहे.

तैवानमधील पर्यटनविकासाची चुणूक राजधानीच्या ताई पाई शहरात उतरताच दिसू लागते. विमानतळ शहरापासून ३० किमीवर आहे, पण संपूर्ण रस्ता वरूनच जातो. येथे रस्त्याचे आठपदरी जाळे आहे. दोन शहरांना जोडणारे रस्तेदेखील पूर्णत: वरूनच जातात. परिणामी ताशी १००-११० च्या वेगाने अंतर कापणे सहज शक्य असते. हीच स्थिती तवानमध्ये भटकताना जागोजागी दिसते.

ताईपाई या राजधानीच्या शहरपासूनच भ्रमंती सुरू होते. शहरातील सर्वात उंच इमारत म्हणजे वन ओ वन (१०१). दुबईतील बूर्ज खलिफा बांधली जाण्यापूर्वी हीच जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जायची. शहराच्या कोणत्याही भागातून ही इमारत सहज दिसते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर व्ह्य़ू पॉइंन्ट आहे. तिथून संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. ताई पाईमध्ये पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण येथील नाइट मार्केट पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. येथील कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी असते.

ताईपाईमध्ये एक लव्हर्स ब्रीज आहे. युरोपात काही ठिकाणी असे पूल असतात. पण येथील लव्हर्स ब्रीजचा परिसर खास पर्यटकांना डोळ्यासमोर ठेऊन विकसित करण्यात आला आहे. खाण्यापिण्याची चंगळ असल्याने या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी बरीच गर्दी होते. रात्री फ्लोरोसंट दिव्यांनी सारा परिसर झगमगून जातो. येथे फेरफटका मारायचा तर किमान तीन-चार तास आरामात जातात.

ताईपाई भटकून झाल्यावर दुसरा दिवस हा ताईचुंग शहरासाठी काढावा. या शहरातच एक खास रेनबो व्हिलेज आहे. हुवांग फुंग या निवृत्त सैनिकाने १२०० घरांच्या भग्नावेशांतील ११ घरं वाचवून त्यांना विविध रंगी पक्षी, प्राणी आणि माणसं यांचा वापर करून रेनबो व्हिलेजची स्थापना केली आहे. सध्या हे ठिकाण पर्यटकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. त्याशिवाय येथील समुद्रात दोन किमी लांबीचा एक मरिन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. येथील समुद्र अजिबात खोल नाही, त्याचाच लाभ घेऊन हा प्लॅटफॉर्म पर्यटकांना भटकण्यासाठी तयार केला आहे. ताईचुंगमध्ये विज्ञानसंग्रहालय, कलासंग्रहालयदेखील आहे. पण त्याचबरोबर इतर ठिकाणी नसणारे असे भूकंप संग्रहालयदेखील आहे. या शहराने ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप अनुभवला आहे. त्यावेळी प्रचंड हानी झाली होती. याचेच अनोखे संग्रहालय येथे पाहायला मिळते.

तवानच्या भोवतीच्या सागरामुळे तेथे अनेक भूवैविध्ये तयार झाली आहेत. त्यापकीच एक म्हणजे ये हूलू जिओ पार्क. समुद्राच्या लाटांमुळे खडकांची धूप होऊन समुद्रकिनारी तयार झालेले असंख्य आकार येथे पाहता येतात.

तवानला भेट द्यायची असेल तर फेब्रुवारी-मार्चचा चेरी ब्लॉसम पकडून जावे किंवा मग लॅन्टर्न फेस्टिव्हल (साधारण फेब्रुवारीमध्ये). केवळ ३६ हजार चौरस किमीचा हा पिटुकला देश तुम्हाला बरेच काही देऊन जातो.

कंदील उत्सव

तवानचे आणखीन एक आकर्षण म्हणजे लॅन्टर्न फेस्टिव्हल. तीन-चार देशांतच हे फेस्टिव्हल सरकार आयोजित करते. तवान त्यापकीच एक. अपेक्षा, संदेश लिहिलेले कंदील आकाशात उडवण्याचा हा उत्सव. कंदिलांना ठरावीक क्रमांक दिला जातो. एक मार्गदर्शकदेखील असतो. ठरावीक अंतराने हे कंदील आकाशात सोडले जातात. हा सारा सोहळा प्रचंड उत्साहाचा आणि अतिशय सकारात्मक अशा ऊर्जेचा असतो.

सनमून लेक

ताईचुंग शहराबाहेरचे आकर्षण म्हणजे सनमून लेक. किमान एक पूर्ण दिवस हाताशी ठेऊन भटकण्याचे हे ठिकाण आहे. सनमून लेक आणि परिसराचा पर्यटनासाठी केलेला विकास हा एक भन्नाट प्रकार आहे. अबरो फार्मोसन हे सांस्कृतिक गावच तेथे डोंगराच्या पल्याड खालच्या बाजूस तयार केले आहे. दिवसभर तेथे अनेक कार्यक्रम सुरू असतात. रोपवेने गावात जाता येते. रेन फॉरेस्टवरून रोप वेने जातानाचे दृश्य अप्रतिम असते. इथे वनस्पतीशास्त्र उद्यान आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये जर या ठिकाणी गेलात तर चेरी ब्लॉसमचा आनंद हमखास घेता येतो. तीन-चार किमीच्या परिसरात तवानी कला, खेळ, राहणीमान अशा अनेक गोष्टींची अगदी कुशलतेने मांडणी केली आहे. सनमून लेकच्या भोवतीने सायकलवरून भटकायचे असेल तर सायकल स्मार्ट कार्ड सुविधादेखील आहे.