02 March 2021

News Flash

आक्रमक

टाटाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याचे काम टाटा हॅरीअर करते

(संग्रहित छायाचित्र)

टाटाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देण्याचे काम टाटा हॅरीअर करते. पाहताच क्षणी ही गाडी टाटाच्या इतर गाडय़ांतून वेगळी असल्याचे जाणवते.  ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे कन्सेप्ट दाखवण्यात आले होते तेव्हापासून या गाडीबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

ग्राहकांच्या मनात टाटाची एक ओळख बसली आहे. टाटा केवळ बजेट सेगमेंटमध्येच चांगल्या गाडय़ा बनवते या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न करताना ही कंपनी दिसून येत आहे. टाटाची हॅरीअर हेच काम करण्यासाठी बाजारात दाखल झाली आहे. गाडीची एकूण स्टाइल ही या श्रेणीतील इतर गाडय़ांच्या तुलनेनं उठून दिसणारी आहे. गाडीचे पुढील डिझाइन टाटासाठी तरी अतिशय अपारंपरिक असल्यामुळे पाहणाऱ्याला पटकन आकर्षित करते. आता हे डिझाइन काही लोकांना आवडले असून काहींना गोंधळात टाकणारे आहे किंवा अशा प्रकारच्या अपारंपरिक डिझाइनची सवय करून घ्यायला काहींना वेळ लागू शकतो. हॅरीअरला एक आक्रमक आणि भारदस्त एसयूव्ही बनवण्यासाठी टाटाने मेहनत घेतली आहे.

गाडीच्या हेडलाइटचे डिझाइन अपारंपरिक असल्यामुळे लक्षवेधक ठरते. गाडीच्या वरच्या बाजूला डीआरएल (डेटाइम रनिंग लॅम्प) देण्यात आले आहेत. हे टर्न इंडिकेटर म्हणूनदेखील वापरता येतील. गाडीचे हेडलाइट फॉग लाइटच्या जवळ दिले आहेत. गाडीचे टेल लाइट हे लांबडे असून गाडीच्या एकंदर शैलीशी सुसंगत आहेत. गाडीला १७ इंचाचे टायर देण्यात आले आहेत. चाकांच्या डिझाइनमध्ये फार नावीन्य दिसून येत नाही. गाडीच्या बाजूचे खड्डे दिसण्यासाठी पडल लॅम्प देण्यात आले असून त्यात हॅरीअरचा लोगो दिसतो.

गाडीच्या इंटिरियरवर टाटाने विशेष मेहनत घेतली आहे. बजेट गाडय़ा तयार  करणाऱ्या टाटाने हॅरीअरचे केबिन आलिशान करण्याकडे भर दिला असून ते दिसून येते. डॅशबोर्डला वूडन पॅनल दिले असून टाटाच्या गाडीमध्ये अशा प्रकारचे इंटिरियर पाहणे हा एक सुखद धक्का आहे.

त्याचप्रमाणे गाडीत दोन स्क्रीनचा टच पॅनल देण्यात आला आहे. ८.८ इंचच्या स्क्रीनवर टाटाचा टचस्क्रीन इंटरफेस वापरू शकता. यावर अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो वापरण्याची सुविधा आहे. तुमच्या स्मार्टफोनला जोडलेला असतानाही या पॅनेलवर गाडीची मूळ सेटिंग वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. पॅनेलची कामगिरी समाधानकारक असून सुधारणांना वाव आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टरमध्ये दुसरी स्क्रीन देण्यात आली आहे. गाडीचा टॉप मॉडेल एक्सझीमध्ये जेबीएलच्या नऊ  स्पीकरची यंत्रणा देण्यात आली आहे. देखणेपणाला उपयोगितेतचा साज चढवणे हे टाटाचे वैशिष्टय़ आहे आणि गाडीच्या कॅबिनची मांडणी आणि देण्यात आलेल्या सुविधांकडे पाहून हे जाणवते.

गाडीत पॉवर ड्राइवर सीट नसून चालकाच्या खुर्चीची उंची कमी किंवा जास्त करण्यासाठी ऑटोमॅटिक सुविधा यात देण्यात आली नाही. गाडीच्या दरवाजांना कप्पे देण्यात आले असून त्यात पाण्याची बाटली  आणि मोबाइल सहज ठेवता येतो. मात्र डॅशबोर्डच्या खालच्या बाजूला यूएसबी पोर्टसाठी देण्यात आलेली जागा थोडी अडचणीची वाटते. गाडीच्या हँडब्रेकच्या लिव्हरची यंत्रणा अत्यंत वेगळी  ठेवण्यात आली आहे.

गाडी प्रवाशांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने काळजी घेतली असल्याचे दिसते. गाडीच्या सर्व मॉडेलमध्ये दोन, तर टॉप मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेकट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑफरोड एबीएस आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये ४२५ लिटर बूटस्पेस देण्यात आली आहे. मागील सीट खाली केल्यानंतर या बूटस्पेसमध्ये अधिक भर पडते.

गाडीत दोन लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले असून सहा स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे. गाडीची कामगिरी थरारक नसली तरी ती अपेक्षित कामगिरी बजावते. गाडीचे इंजिनदेखील व्यवस्थित प्रतिसाद देते. वजन आणि आकार पाहता हॅरीअर हाताळण्यास अतिशय सोपी आहे. एका गिअरमधून दुसऱ्या गिअरमध्ये जाण्याची प्रक्रिया अतिशय सहज आहे. तुम्हाला गाडीकडून वेग हवा असल्यास तुम्ही स्पोर्ट्स मोड वापरू शकता. तरी सामान्य वेगावर इको मोडवर गाडी ठेवता येते.

हेक्साप्रमाणेच या गाडीतदेखील रस्त्यांप्रमाणे गाडीचा मोड बदलण्याची सुविधा आहे. म्हणजे महामार्ग त्याचप्रमाणे खराब रस्त्यांतूनदेखील गाडी कोणत्याही अडचणीशिवाय मार्गक्रमण करू शकते. गाडीत हायड्रॉलिक स्टेरिंग देण्यात आले असून महामार्गावर या स्टेअरिंगमुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. गाडीच्या केबिनमधील आवाज कमी करता आला असता तर प्रवासाचा अनुभव नक्कीच उंचावला असता. त्याचप्रमाणे गाडीमध्ये सनरूफ नसल्याने तो एक अभाव प्रकर्षांने जाणवतो. गाडीमध्ये ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय नसून नजीकच्या काळात तो येण्याची शक्यतादेखील कमी आहे. हॅरीअरने बाजाराचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला असून एक वेगळ्या शैलीची आणि टाटाच्या विश्वासाला साजेशी गाडी दाखल केली आहे.

बिकट वाटेवर चांगली कामगिरीगाडीची जमेची बाजू म्हणजे खराब रस्त्यांवर गाडीची चांगली कामगिरी. खड्डे असलेल्या रस्त्यांवरून जातानादेखील गाडीत बसल्यावर कोणताही त्रास होत नाही. याचे श्रेय अतिशय सक्षम सस्पेन्शन यंत्रणेला जाते. गाडीची ठेवणं ही रेंज रोव्हरच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. त्यामुळे गाडीचा व्हालीबेस मोठा आहे. या गोष्टीचा सर्वाधिक फायदा होतो तो गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी लेग स्पेस देण्यात आली आहे. सपाट सीट असल्यामुळे तीन जण कुठल्याही अडचणीशिवाय बसू शकतात.

वैशिष्टय़े

* एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझी अशा चार व्हेरिएंटमध्ये हॅरीअर येणार आहे.

*  इंजिन : २.० लिटर , ४ सिलेंडर, टर्बो चार्जेर

*  ताकद: १३८@ ३७५० आरपीएम

*  टॉर्क : ३५०एनएम@ १७५०-२५०० आरपीएम

*  ट्रान्समिशन: ६ स्पीड, मॅन्युअल

*  किंमत : १२.९९ लाख ते १७.९९ लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 3:05 am

Web Title: article about tata harrier car
Next Stories
1 सॅलड सदाबहार : सफरचंद आणि खसखस सॅलड
2 सदाबहार पॅरिस
3 दोन दिवस भटकंतीचे : सासवड
Just Now!
X