मानसी जोशी, पूर्वा साडविलकर

‘गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ का दुर्गम, अवघड डोंगरवाट’ या गुरुवनचनाप्रमाणे माणसाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मात्र सध्याच्या काळात गुरुपर्यंत पोहोचण्याचा मार्ग इतका खर्चिक झाला आहे की, समाजातील एक विशिष्ट घटकच गुरुकडून मिळणाऱ्या विद्येचा लाभ घेऊ शकतो. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक कमाई करण्यासोबतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे हासुद्धा एखादी विद्या अवगत करून घेण्यामागचा उद्देश असतो. यासाठी गुरू आवश्यकच असतो. मग तो कधी शिक्षकाच्या रूपात भेटतो तर कधी प्रशिक्षकाच्या. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना मात्र गुरुकडून मिळणाऱ्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते.  हीच गरज ओळखून एखाद्या कलेचे, खेळाचे प्रशिक्षण घेतलेली तरूण मुले गरजू घरांतील मुलांच्या आयुष्यात गुरुची भूमिका बजावत आहेत.

सध्या हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय होत आहे. त्यातील नायक चांगल्या वेतनाची शिक्षकाची नोकरी सोडून आर्थिकदृष्टय़ा गरीब मुलांना आयआयटी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देतो. शिक्षण क्षेत्रातील वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचा त्याचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. प्रत्यक्ष जीवनातही अशाचप्रकारे निरपेक्ष भावनेने ज्ञानदान करणाऱ्या गुरुंचे प्रमाण कमी नाही. विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, समाजसेवी संस्था याच्या माध्यमातून तरुणांचे काही गट विद्यादानाचे काम करताना दिसत आहेत. यात आपले दैनंदिन दिनक्रम सांभाळून मुलांना शनिवार-रविवार, तसेच सुट्टीच्या वेळी विविध समाजसेवी संस्थांमध्ये जाऊन स्वत: जवळील ज्ञान इतरांना देण्याचा प्रयत्न तरुण मुले करताना दिसत आहे.

एकीकडे सगळे पैशांच्या मागे धावत असताना नि:स्वार्थी वृत्तीने केलेली सेवा ही त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळी ठरवत आहे. कल्याण येथील बापगावला राहाणारी मंजिरी धुरी हिची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. ती मैत्रिकुल जीवन शिक्षण संस्थेत राहत आहे. तिथे राहून ठाणे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. या  संस्थेद्वारे ती आदिवासी मुलांना शिकवत आहे. कल्याण आणि शहापूर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. तेथील कातकरी आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास शक्य होत नाही. परंतु ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मंजिरी आणि तिचे सहकारी या मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी मुळाक्षरे, मराठी कविता, गणिताचे पाढे हे लिहून तसेच पाठ करून घेण्याचे काम हे सर्वजण करीत आहेत. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या शारिरिक सुदृढतेसाठी मैदानी हे खेळही घेतले जातात. दोन ते तीन वर्षांंपासून हे सर्व विद्यार्थी मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी या मंडळीनी बागशाळा हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत हे विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुलांना शाळेसारखेच वातावरण मिळावे, यासाठी शाळेप्रमाणे या मुलांचीही सहल आयोजित केली जाते. हे लहान वयातील गुरू आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर या मुलांसाठी सल्लागार अथवा मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. आपल्याकडील ज्ञान देतानाच कार्यपद्धतीतून पुढील पिढीला एक आदर्श घालून देत आहेत. केवळ ज्ञानार्जनातील नव्हे तर वैयक्तिक जीवनात या मुलांना आयुष्यात ध्येय ठरवताना आणि अडचणींवर मात करण्यात शिकवत आहेत. हे आधुनिक गुरु शिष्यांना मानसिक आणि भावनिक आधारही देत आहेत. लहान वयात मुलांना शिकवणे हे एक प्रकारचे व्यक्तिमत्त्व विकास असल्याचे हे तरुण मंडळी सांगत आहेत.

नृत्याचे प्रशिक्षण

माझे शिक्षण हे बारावी झाले आहे. मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. त्यामुळे मी पुढील करिअर हे या क्षेत्रात करण्याचे ठरविले. मी नृत्य क्षेत्रात डिप्लोमा केला आहे आणि या क्षेत्रात मी गेले बारा वर्ष कार्यरत आहे. माझी कला इतरांनी देखील शिकावी असे मला नेहमी वाटायचे म्हणून मी नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले. काही वेळा अनेकांना नृत्याची फार आवड असते परंतू त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आवड जोपासता येत नाही. अशा व्यक्तींसाठी मी माझ्या वर्गामध्ये एक भाग हा मोफत प्रशिक्षणाचा ठेवला आहे असे प्रदिप याने सांगितले. यामध्ये वर्गांमधील काही विद्यार्थ्यांंना  नृत्य करण्याचे साहित्य देखील घेण्यास शक्य होत नाही, ते साहित्य देखील मी या विद्यार्थ्यांंना उपलब्ध करून देतो. आतापर्यंच मी १५ हजार ते २० हजार विद्यार्थ्यांंना मोफत नृत्य प्रशिक्षण दिले आहे. असे देखील प्रदिप यांनी सांगितले.

— प्रदीप सौदे

प्रेरणादायी भाषण

लहानपणापासून महान व्यक्ती, यशस्वी उद्य्ोजक यांची जीवनातील संघर्षांची पुस्तके वाचण्याची आवड होती. मुलुंड येथील एमसीसी महाविद्यालयातून पदवीचे संपादन केल्यावर व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही काळ नोकरी केल्यानंतर तेथे मन रमले नाही. त्यामुळे मुलांना शिकवायचे ठरवले. आजच्या काळात तरूण मुले विविध कारणांनी नैराश्य येते असे आढळून आले. १८ ते २५ या वयातील मुलांना भावनिक आधाराची आणि योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यामुले फक्त लढ ंम्हण हा प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात केली. यात मी मराठी भाषेतून महाविद्यालये, समाजसेवी संस्था यामध्ये प्रेरणादायी कार्यक्रम करतो.

-आदित्य दवणे

लहान वयात वादनाचे प्रशिक्षण

मी यांत्रिक अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत आहे. परंतू मला लहानपणापासूनच गायनाची आणि वाद्य वाजवण्याची फार आवड आहे. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही गायन आणि वाद्याचे छोटे कार्यक्रम आयोजित करत असतो. या कार्यक्रमामुळे  नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते, असे क्रिष्णा पांडे यांनी सांगितले. ज्यांना गायनाची वाद्य वाजवण्याची आवड आहे परंतू त्यांच्याजवळ या कलेमध्ये शिक्षण घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही अशा माणसांना मी प्रशिक्षण देत आहे. माझ्याकडे वय वर्ष ५ पासून ते ५५ पर्यंतच्या वयोगटातील माणसे प्रशिक्षण घेत आहेत असे देखील क्रिष्णाने  सांगितले. त्याचबरोबर मी काही शाळांमध्ये आणि आश्रमांमध्ये भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांंना प्रशिक्षण देत आहे. असे क्रिष्णाने सांगितले.

– क्रिष्णा पांडे,

येऊरच्या मुलांसाठी मल्लखांब

सध्या ठाण्यातील येऊर येथील २५ मुलांना गेल्या तीन वर्षांपासून मी मोफत मल्लखांब, योगासने, आणि मल्लखांब याचे प्रशिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. मुले काटक असल्याने शिकवलेले लगेच आत्मसात करतात. आठवडय़ाचे काही दिवस यांच्यासाठी राखून ठेवलेले आहे. मुम्ळात येथील मुलांची आर्थिक स्थिती चांगली नाही. ते शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींपासून वंचित आहेत. त्यासाठी गावातील मुलांनी एकत्र येउन एकलव्य क्रीडा मंडळ स्थापना केले आहे. यातून आम्ही मुलांना खेळ आणि अभ्यासाचे प्रशिक्षण देतो. थोडक्यात आमच्या गावातील मुलांसाठी आम्हीच गुरु आहोत.

-किशोर म्हात्रे