ऋषिकेश बामणे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील विजयाचा चषक हाती घेतल्यानंतर जल्लोष करतानाचे भारतीय संघाचे छायाचित्र समाजमाध्यमांतून जोरात चर्चिले गेले. संघाचा खेळ, वैयक्तिक कामगिरी किंवा जल्लोषातले नावीन्य हा या चर्चेचा विषय नव्हता. तर, या छायाचित्रातील धोनी आणि आणखी एक दोघे वगळता बाकीच्या खेळाडूंची दाढी हा नेटकरींच्या चर्चेचा विषय होता. दाढी करण्याची साधने, प्रसाधने बनवणाऱ्या ‘जिलेट’ ही कंपनी या मालिकेच्या प्रायोजकांपैकी एक असताना ‘टीम इंडिया’च्या खेळाडूंच्या दाढीची चर्चा झाली नसेल तर नवलच!

गेल्या काही वर्षांत जगभरातील पुरुषांमध्ये दाढी राखण्याकडे कल वाढत चालला आहे. हा ट्रेंड क्रिकेट, फुटबॉल आणि अन्य काही क्रीडाप्रकारांतील नामांकित खेळाडूंमध्येही दिसून येतो. सध्याच्या भारतीय संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूची दाढी पाहायला मिळते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा तर या ‘दाढी फॅशन’चा एक ‘आयकॉन’ म्हणूनच ओळखला जातो.

जवळपास तीन ते चार वर्षांपूर्वीचा कोहली व आजचा कोहली यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यानेच सुरू केलेल्या ‘ग्रो युवर बियर्ड’ या मोहिमेद्वारे देशभरातील इतर तरुणांनीदेखील दाढी राखण्यास सुरुवात केली. क्रिकेट संघातील शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा यांची भरघोस वाढलेली पण कोरीव दाढी समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय होती. नोव्हेंबर महिन्यातील ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ या लोकप्रिय हॅशटॅगने तर सर्वानाच वेड लावले. संपूर्ण महिन्यात दाढी न करता वाढलेल्या दाढीचे छायाचित्र फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या साइट्सवर टाकून इतरांनाही या मोहिमेत जोडण्यासाठी प्रेरित केले जायचे. फुटबॉलपटू लिओनेल मेसीनेसुद्धा त्याचे दाढी वाढवलेले छायाचित्र पोस्ट केले होते.

दुसरीकडे, मध्यंतरी समाजमाध्यमांवर ‘ब्रेक द बियर्ड’ ही मोहीमही राबवली गेली. दाढी वाढवण्यात आघाडीवर असलेले रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा यांनी या मोहिमेतही सहभागी होत दाढी काढल्यानंतरचे छायाचित्र समाजमाध्यमांतून प्रसारित केले. या खेळाडूंनी कोहलीलाही ‘चॅलेंज’ दिले होते. मात्र, पत्नी अनुष्का शर्माच्या सांगण्यावरून कोहलीने त्याला नकार दिल्याचे समजते. यावरूनही समाजमाध्यमांवर विनोद आणि मेम्स फिरत होते.

दाढीवरील विनोद महागात

दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलाला आतंकवादी संबोधल्यामुळे माजी क्रिकेटपटू डीन जोन्सला समालोचनामधूनच निलंबित करण्यात आले होते. २००६मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात शॉन पोलॉकच्या गोलंदाजीवर कुमार संगकाराचा झेल घेतल्यावर ‘आतंकवाद्याने आणखी एक बळी मिळवला आहे’ असे थेट शब्द जोन्सने उच्चारले होते.

त्याशिवाय २०१५च्या अ‍ॅशेस मालिकेत एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपल्याला ओसामा असे संबोधले, असा आरोप इंग्लंडच्या मोईन अलीने केला. सप्टेंबर २०१८मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात त्याने या प्रसंगाचा खुलासा केला. त्या खेळाडूचे नाव मात्र मोईनने जाहीर केलेले नाही. तसेच २०१८च्याच अ‍ॅशेस दौऱ्यात काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनीसुद्धा आपल्याला ‘तुझी दाढी कोणासारखी आहे? तुझे चिकनचे दुकान कुठे आहे?’ असा क्लेशात्मक प्रश्नांचा भडिमार केला होता, असे म्हटले.