मासिक पाळीविषयी समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. पण अलीकडच्या काळात त्याविषयी मोकळेपणाने बोलायला सुरुवात झाली आहे. एखादी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असो की ऑफिसमध्ये काम करणारी तरुणी असो, मासिक पाळीविषयी बोलताना त्यांच्या मनात पूर्वीसारखा अनाठायी संकोच नसतो. पुरुष वर्गातही स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दलचा परंपरागत दृष्टिकोन बदलला आहे.

पूर्वीच्या काळात मासिक पाळीला खूप गांभीर्याने पाहिले जायचे. पाळी आलेल्या स्त्रीला वेदनांसह परंपरागत अनिष्ट प्रथांनाही सामोरे जावे लागत होते. अमुक ठिकाणीच बसावे, अमुकच कपडे घालावे, अमुक ताटातच जेवावे वगैरे अशा जुन्या प्रथांप्रमाणे स्त्रीला वागणूक दिली जात असे. मात्र काळानुरूप संकल्पना बदलत गेल्याचे दिसून येते. आज कॉलेजमध्ये एखादी मैत्रीण आली नाही आणि तिच्या मित्रांनी तिला न येण्यामागचे कारण विचारले तर ती थेट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मासिक पाळी आल्याचे सांगते.  महाविद्यालयच नव्हे तर इतर कोणत्याही ठिकाणी स्त्रिया या थेट मासिक पाळी आल्याचे सांगतात. हा बदल केवळ स्त्रियांनी स्वतहून करवून घेतला नसून पुरुषांनीदेखील त्यांच्या या निर्धास्तपणाला साथ दिली आहे. आज अनेक ठिकाणी पुरुष पत्नी, बहीण, मुलगी किंवा अगदी मैत्रिणीसाठीही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन घेऊन येतात. त्यात त्यांना कोणताही कमीपणा वा हीनपणा वाटत नाही. मासिक पाळीच्या काळात हार्मोनल बदल होत असल्याने स्त्रियांची अनेकदा चिडचिड होते. दरम्यान त्या स्त्रीच्या सान्निध्यातील व्यक्तीही मासिक पाळी आलेल्या व्यक्तीचा चिडचिडेपणा समजून घेते. मासिक पाळी या विषयाला पूर्वीप्रमाणे गुप्त न ठेवता हा विषय थेट उघडपणे बोलला जात असल्याने याविषयीचे बरेचसे गैरसमज संवादातून दूर होण्यास मदत होऊ लागली आहे. आजची तरुणाई या विषयाला ‘कॅज्युअली’ घेऊ लागली आहे.

मुंबई विद्यापीठात शिकणारी दीप्ती मानकामे हिचंदेखील हेच म्हणणं आहे. ‘या विषयावर सध्या महाविद्यालयातील तरुण-तरुणी सहज गप्पा मारताना दिसून येतात. तर, औषधालयामधून एखाद्या पुरुषाला सॅनिटरी नॅपकिन आणायला सांगितले तरी ते कोणतीही लाज न बाळगता घेऊन येतात. नागरिकांमध्ये मासिक पाळीविषयीचा बदल केवळ शिक्षणामुळे झाला आहे, असे मला वाटते. यापुढेही समाजात मासिक पाळीविषयी अधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल,’ असं ती सांगते.

ठाण्यात सखी ही संस्था शालेय विद्यार्थ्यांना मासिक पाळीविषयी माहिती देण्याचं काम करत आहे. ‘या विद्यार्थ्यांना मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची माहितीही देण्यात येते. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मदतीने या विषयाबद्दल मुलींसोबत मनमोकळा संवाद साधण्यात येतो. त्यामुळे मासिक पाळी हा गंभीर विषय मुलांना समजण्यास अधिक सोपा जातो. तसेच त्यांना योग्य वयात योग्य माहिती मिळते,’ असे या संस्थेच्या डॉ. लता घनशामनी यांनी सांगितले.

सध्या मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करणारे विविध चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशा विविध चित्रपटांद्वारे मासिक पाळीविषयीचा समाजातील लाजरेपणा कमी झाला आहे. तसेच या चित्रपटांमुळे समाजातील मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होत आहे. पुरुषांसोबतच महिलांनी मासिक पाळी या विषयाकडे वैज्ञानिक दृिष्टकोनातून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या विषयाची पूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीनेही मासिक  पाळीविषयीची माहिती इतरांना द्यावी आणि समाजात जागृती निर्माण करावी, असे मला वाटते.

– दर्शन भोळे, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे</strong>

पूर्वीच्या काळी एखाद्या महिलेला मासिक पाळी आल्यास त्या महिलेला स्वयंपाक करणे, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास जाणे, अशी विविध कामे करण्यास मनाई असे. आजही अनेक ग्रामीण भागांत अशा प्रकारच्या अंधश्रद्धा मानल्या जातात. मात्र, मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी कमी आकाराची घरे असल्याने या अंधश्रद्धा पाळणे शक्य नाही. घरांचे आकार लहान असल्याने या रूढी पंरपरा बाद झाल्या. खरंतर ही अत्यंत सकारात्मक बाब आहे, असे मला वाटते. सध्या अनेक सामाजिक संस्थांनी मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मासिक पाळीविषयीचे समाजातील गैरसमज दूर होत आहेत.

-नितेश गावकर, कल्याण

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक भाग आहे. मासिक पाळी हे निसर्गाने महिलांना दिलेले एक वरदान आहे. इंटरनेटमुळे मासिक पाळीविषयीची माहिती सध्याच्या काळात सहज उपलब्ध आहे. त्याचबरोबर जाहिराती आणि चित्रपटामुंळे मासिक पाळीविषयीची जनजागृती होत आहे. त्यामुळे समाजात मासिक पाळीविषयीच्या विचारांमध्ये बदल होताना दिसून येत आहेत. केवळ इतकेच पुरेसे नसून पालकांनीही घरातील लहान मुलींसोबत याविषयी अधिक संवाद साधणे गरजेचे आहे. 

– ओमकार बिरवडकर, बदलापूर

संकलन- चेतना कारेकर