वैभव भाकरे

जे टी स्पेशल वेहिकल्समार्फत या टाटा मोटर्स आणि जयेम ऑटोमोटिव्ह्जने नुकतीच त्यांची बहुप्रतीक्षित जेटीपी श्रेणी बाजारात दाखल केली आहे. टिअ‍ॅगो आणि टिगोर या गाडय़ांना नव्या रूपात सादर करण्यात आले आहे. जेटीपी हे रेसिंग क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. टिअ‍ॅगो आणि टिगोर यांची अधिक शक्तिशाली आवृत्ती असे या गाडय़ांचे थोडक्यात वर्णन करता येईल.

टाटाने बाजारात एक चांगली हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही दाखल करून या तिन्ही श्रेणीत ग्राहकांसाठी चांगले पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय ग्राहकांच्या गरजा, जीवनशैली यांना लक्षात ठेवून कार कंपन्या गाडय़ा तयार करीत असतात. शक्तिशाली इंजिन किंवा रेसिंगच्या श्रेणीत मोडणाऱ्या गाडय़ा या त्यांच्या किमतींमुळे बऱ्याच कारप्रेमींच्या आवाक्याबाहेरच्या ठरतात. यासाठी टाटा मोटर्स आणि जयेम ऑटोमोटिव्ह्जने ड्रायव्हिंगचे वेड असणाऱ्यांसाठी नव्या स्वरूपात त्यांची विश्वसनीय टिअ‍ॅगो आणि टिगोर बाजारात आणली आहे.

टिअ‍ॅगो आणि टिगोर या गाडय़ांच्या स्टायलिंगमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र हे बदल केवळ शोभेचे नसून गाडीच्या गरजा लक्षात ठेवून करण्यात आले आहेत. पुढचे आणि मागचे बंपर यांचा आकार वाढवण्यात आला आहे. पुढे मधमाश्यांच्या पोळ्यासारखी रचना असलेलं काळ्या रंगाचे मोठे ग्रिल देण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ इंची डायमंड कट अलॉय चाके. स्मोक्ड प्रोजेक्टर हेडलॅम्प्स,  बॉनेट आणि फेंडर्सवर वेन्ट देण्यात आले आहे. हे वेन्ट गाडीला स्पोर्टी लुक तर देतातच मात्र इंजिनला थंड करण्यास मदत करतात. गाडीवर असलेले जेटीपी ब्रॅण्डिंग हे या गाडय़ा सामान्य टिअ‍ॅगो आणि टिगोरहून वेगळ्या असल्याचे दर्शवतात. गाडीच्या रिअर व्हिव आरशाच्या केसिंगचा रंग गाडीच्या रंगाच्या उलट ठेवण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या गाडीवर ही केसिंग लाल रंगाची येते, तर लाल रंगाच्या गाडीवर काळ्या रंगाची. या गाडय़ा केवळ लाल आणि पांढरा या दोन रंगांतच उपलब्ध आहे.

गाडीच्या आतमध्ये सामान्य टिअ‍ॅगो आणि टिगोरच्या तुलनेने कमी पण लक्षवेधक बदल करण्यात आले आहे. पांढऱ्या रंगाच्या टिगोरचे इंटेरिअर काळ्या रंगाचे असून यात लाल रंगाचा केलेला वापर उठून दिसतो. खुच्र्यावर जेटीपचा लोगो देण्यात आला आहे. वातानुकूलनाच्या चौकटीलादेखील लाल रंग देण्यात आला आहे. डॅशबोर्डमध्ये फार बदल करण्यात आले नाहीत. गाडीच्या मागील खुच्र्यावर बसणाऱ्या प्रवाशांसाठी लेग रूम समाधानकारक आहे. गाडीमध्ये टचस्क्रीन पॅनलदेखील देण्यात आले असले तरी यात अँड्रॉइड ऑटो किंवा अँपल कारप्लेचा पर्याय देण्यात आला नाही.

गाडीमध्ये करण्यात आलेले बदल हे रचना व विकासावर भर देणारे आहे. यामध्ये काही अनोख्या शैलीत घडवलेल्या भागांचाही समावेश होतो. सहसाची सुप्त आवड असलेल्या आणि ड्रायव्हिंगवर प्रेम करणाऱ्या शहरी ग्राहकांना डोळ्यापुढे ठेवून टिअ‍ॅगो जेटीपी आणि टिगोर जेटीपी यांचे इंजिनीअरिंग करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना ड्रायव्हिंगमधील थरार अनुभवता येईल. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

टिअ‍ॅगोच्या १.२ लिटरच्या तीन सिलेंडर पेट्रोल इंजिनची जागा १.२ लिटरच्या तीन सिलेंडर टबरे चार्जेड इंजिनने घेतली आहे. गाडीत पाच गिअरचे मॅन्युएल ट्रान्समिशन देण्यात आले असून गाडीचं वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी यात बदल करण्यात आले आहेत. सस्पेन्शन रचनेत बदल करून चाकांचे पृष्ठभागापासूनचे अंतर कमी करण्यात आला आहे. कमाल वेगावर १६० किलोमीटर प्रतितासाची मर्यादा असून, कार १० सेकंदांत शून्य ते १०० किलोमीटर/प्रतितास एवढा वेग घेऊ  शकते असा कंपनीचा दावा आहे.

शहरी रस्त्यांवर चालवताना ही नवी टिअ‍ॅगो नक्कीच सामान्य टिअ‍ॅगोहून उजवी असल्याचे जाणवेल. गाडीत दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आला आहे. सिटी ड्रायव्हिंग मोड हा शहरी रस्त्यांसाठी असून यात टॉर्क १५० एनएमपर्यंत मर्यादित ठेवला जातो. तर दुसरा स्पोर्ट मोड देण्यात आला आहे. यात तुम्ही गाडीच्या पूर्ण ताकदीचा अनुभव घेऊ  शकता. सरळ रस्त्यांवरून जाताना गाडी कोणत्याही प्रकारची तक्रार देत नसून वळणाच्या रस्त्यांवरदेखील तग धरून राहण्याची गाडीची क्षमता आहे. ट्रान्स्मिशनमध्ये केलेल्या बदलांमुळे गियर बदलणे अत्यंत सहज असल्याचे जाणवते. मुळातच  टिअ‍ॅगो ड्राइव्हिंगचा चांगला अनुभव देणारी गाडी असून जेटीपीमुळे त्यात भर पडली आहे. गाडीने वळणांवरदेखील चांगली पकड ठेवावी यासाठी गाडीची चाके नव्याने तयार करण्यात आली आहेत. वाढीव ताकदीला न्याय करीत रस्त्यावर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी गाडीचे स्टिअरिंग चांगल्यारीतीने काम करते. खराब रस्त्यांवरून किंवा खड्डे असणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करताना गाडीने कुरकुर करू नये यासाठी सक्षम सस्पेन्शन यंत्रणा तयार करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे.  टिअ‍ॅगोप्रमाणे टिगोरदेखील अपेक्षाभंग करीत नाही. व्हीलबेस मोठं असल्यामुळे ही गाडी रस्त्यावर अधिक चांगली पकड तयार करते. टागोरमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोलचा पर्याय देण्यात आला असून सेडान असल्यामुळे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी ट्रंक मिळते. गाडी चालवण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही गाडी बनव्यात आली आहे. गाडी परिपूर्ण नसली, तरी दिलेल्या किमतीत ग्राहकांची निराशा न करणारी आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com