राजेंद्र श्रीकृष्ण भट
सर्वच वेलभाज्यांची मुळे उथळ असतात. साधारण साडेनऊ इंच खोल वाढतात. गच्चीवर वाफे तयार करून किंवा मोठय़ा कुंडय़ांमध्ये लावून घरगुती वापरापुरते उत्पन्न घेणे शक्य असते. वाफ्यातील किंवा कुंडीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. कुंडी किंवा वाफ्याबाहेर येईल एवढे पाणी घालू नये. पाणी शक्यतो संध्याकाळी घालावे. या वेलीचे आयुष्य संपले की ती जमिनीलगत कापावीत. त्यामुळे मुळे मातीतच कुजतात आणि माती सुपीक होते. काही वेळा पुन्हा पाने येऊन वेल तयार होते. आधी कापलेल्या वेलीचे लहान तुकडे करावेत आणि ते मातीवरच टाकावेत. त्यामुळे मातीची सुपीकता वाढते.
काकडी आणि ढोमसे – यांचे फळ ४५ ते ५० दिवसांत मिळते. हंगामानुसार दोन-तीन दिवसांनी फळांची तोडणी करावी. साधारण एक ते १२ फळे मिळतात. चौथे-पाचवे फळ बीसाठी ठेवावे. १०-१२ फळे लागल्यानंतर वेलीची उत्पादन देण्याची क्षमता संपते.
शिराळी, पडवळ – यांना साधारण ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात. या वेलींबाबत एक नियम आहे. पहिले फळ येण्यास जेवढा कालावधी लागतो, साधारण तेवढाच कालावधी पुढे उत्पादन मिळत राहते.
दुधी, कारले – या वेलींना ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात.
घोसाळी – ही वेल वर्षभर टिकवता येते. तिची वाढ जास्त असते. साधारण ५०-६० दिवसांत फळे येऊ लागतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 4:20 am