04 March 2021

News Flash

टेक्नोचा ‘ट्विन’

परवडणाऱ्या दरांच्या श्रेणीत असलेल्या स्मार्टफोनच्या बाजारात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

परवडणाऱ्या दरांच्या श्रेणीत असलेल्या स्मार्टफोनच्या बाजारात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. भारतीय मोबाइल वापरकर्त्यांचा मोठा वर्ग १५ हजार किंवा त्याहून कमी किमतीच्या स्मार्टफोनचा ग्राहक आहे. त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांबरोबरच पूर्व आशियाई आणि काही पाश्चात्त्य कंपन्यांनी या किंमत श्रेणीतील स्मार्टफोन निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. बाजारात दर चार-आठ दिवसांनी येणारे नवनवीन कंपन्यांचे स्मार्टफोन पाहताना याची साक्ष पटते. अनेकदा तर एकच कंपनी अगदी महिन्या दोन महिन्यांच्या अंतरात दोन-तीन स्मार्टफोन बाजारात आणून ही स्पर्धा आणखी तीव्र करते. मोबाइल निर्मात्या कंपन्यांमधील या स्पर्धेचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो. कारण ग्राहक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी या कंपन्या केवळ कमी किमतीतले फोन निर्माण करतात असे नव्हे तर, या फोनमध्ये चांगली वैशिष्टय़े कशी ठासून भरता येईल, याच्यासाठीही धावपळ करत असतात.

हाँगकाँगस्थित ‘ट्रान्शन होल्डिंग’ या कंपनीची उपकंपनी असलेला ‘टेक्नो’ हा स्मार्टफोन ब्रॅण्डही परवडणाऱ्या दरांतील स्मार्टफोनच्या निर्मितीत नवीन ओळख निर्माण करू पाहात आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षांत या कंपनीने दहापेक्षाही अधिक स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत. याच पंक्तीत ‘कॅमन आय ट्विन’ हा नवीन फोन दाखल करण्यात आला आहे. सहा इंचाचा डिस्प्ले, क्वाड कोअर प्रोसेसर, १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, तीन जीबी रॅम अशी वैशिष्टय़े असलेला हा फोन आपल्या किंमत श्रेणीतील अन्य स्मार्टफोनसारखाच आहे.

डिझाइन

सहा इंचाची स्क्रीन असलेल्या ‘ट्विन’चा आकार सर्वसाधारण फोनपेक्षा काहीसा लांब आहे. त्यामुळे हा फोन पाहताक्षणी उठून दिसतो. साधारण ८.५ मिमी जाडी असलेल्या या फोनची पुढची बाजू काचेने व्यापलेली आहे, तर मागील बाजू प्लास्टिकने बनलेली आहे. पुढच्या बाजूला कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसाठी जागा आहे. फोनच्या पुढच्या बाजूच्या खालच्या भागातील काळी कड मात्र खटकते. या भागावर कोणतीही बटणे वा टच सेन्सिटिव्ह बटण नसताना ही काळी कड का, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. फोनच्या मागील बाजूस डय़ुअल कॅमेरे असून त्यासोबतच एलईडी फ्लॅशही पुरवण्यात आला आहे. तसेच फिंगरपिंट्र सेन्सरही मागच्या बाजूस आहे.

फोन प्रथमदर्शनी आकर्षक आणि उंची वाटतो. तो लांबीला जास्त आणि रुंदीला कमी असल्यामुळे हातात सहज सामावतो आणि हलका असल्याने हाताळतानाही अडचण येत नाही. पॉवर आणि व्हॉल्यूमची बटणे फोनच्या डाव्या बाजूस असून त्यांची मांडणी योग्य आहे.

या फोनमध्ये फूल व्ह्य़ू एचडी प्लस डिस्प्ले पुरवण्यात आला असून स्क्रीन रेझोल्यूशन १४४० बाय ७२० इतके आहे. डिस्प्ले अतिशय सुस्पष्ट असून त्यावरील रंगांचा उठावदारपणा स्क्रीनच्या वॉलपेपरकडे पाहिल्यावरच जाणवतो. बंद खोलीत डिस्प्ले जितका सुस्पष्ट वाटतो तितका तो सूर्यप्रकाशात मात्र वाटत नाही. परंतु तरीही त्याची दृश्यमानता फारशी कमी होत नाही.

कॅमेरा

या फोनमध्ये मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सेलचे डय़ुअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिल्या कॅमेऱ्यातून छायाचित्रे टिपली जातात, तर दुसरा कॅमेरा छायाचित्रातील पाश्र्वभूमी सुस्पष्ट वा धूसर करण्यासाठी उपयोगात येतो. या फोनमध्येही ‘बोकेह मोड’ पुरवण्यात आला आहे. ‘पोट्रेट’ छायाचित्र काढत असताना व्यक्तीच्या मागचा वा आजूबाजूचा भाग अस्पष्ट करून केवळ व्यक्तीवर ‘फोकस’ करण्यामुळे छायाचित्र अधिक उठावदार येते. यासाठी ‘बोकेह मोड’चा उपयोग होतो. अलीकडे सर्वच फोनमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. ‘कॅमन आय ट्विन’मधील बोकेह मोड आपले काम चोखपणे बजावतो. कॅमेऱ्यातील छायाचित्रे उत्तम दर्जाची आहेत असे म्हणता येणार नाही. थोडे झूम करून काढलेली छायाचित्रे काहीशी धूसर येतात. एकूणच सर्व छायाचित्रे सुस्पष्टपणात कमी पडताना दिसतात. याउलट या फोनचा फ्रंट कॅमेरा अतिशय दर्जेदार छायाचित्रे देतो. ‘एचडीआर’ सुविधेमुळे छायाचित्रांमध्ये अधिक स्पष्टता आणता येते, हे विशेष.

कामगिरी

या फोनमध्ये १.४ गिगाहार्ट्झचा क्वाडकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर पुरवण्यात आला असून त्याला तीन जीबी रॅमची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे फोनवरील सर्व कामे अतिशय कुशलतेने पार पडतात. ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेज असल्यामुळे वापरकर्त्यांना अ‍ॅप्ससाठी जागा कमी पडण्याचा प्रश्न येत नाही. मात्र तसे झाले तरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज क्षमता वाढवण्याची सुविधा ‘ट्विन’मध्ये आहे. इंटरनेट ब्राऊजिंग किंवा सोशल मीडिया हाताळताना फोन अतिशय वेगवान हालचाली करतो. अलीकडे क्षणोक्षणी अपडेट राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाईसाठी हा मुद्दाही महत्त्वाचा ठरू शकतो.

‘कॅमन आय ट्विन’ हा १२ हजार रुपयांच्या आसपास मिळणारा एक चांगला स्मार्टफोन आहे. फोनची किंमत कमी ठेवायची झाल्यास त्यातील काही वैशिष्टय़ांना मुरड घालावी लागते. ‘ट्विन’मध्ये ही तडजोड कॅमेऱ्याशी केली असावी असे वाटते. अन्यथा हा फोन त्याच्या किंमत श्रेणीतील इतर फोनच्या तुलनेत उजवा ठरतो.

‘कॅमन आय ट्विन’ची अन्य वैशिष्टय़े

* बॅटरी :  ४००० एमएएच

*  डिस्प्ले :  सहा इंच

* कनेक्टिव्हिटी : वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, डय़ुअल सिम

*  आपॅरेटिंग सिस्टीम : अ‍ॅण्ड्रॉइड ओरिओ

*  किंमत : ११८९९ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 3:36 am

Web Title: article about twin mobile
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : मन आणि बुद्धीची सांगड घातली की उत्तर सापडते
2 न्यारी न्याहारी : मका इडली
3 जीवन रक्षक
Just Now!
X