शनिवार

सातारा जिल्ह्यात कृष्णा-कोयना प्रीतीसंगमावर असलेल्या कराडवरून ३५ कि.मी. वर रेठरेच्या साखर कारखान्याजवळ असलेल्या कोळे नरसिंगपूरला जावे. जमिनीच्या पातळीच्या खाली असलेलं मंदिर आणि तिथे असलेली १६ हातांची अतिशय सुंदर अशी नृसिंहाची मूर्ती पाहावी. तिथे अगदी जवळ असलेला बहे बोरगावचा समर्थ रामदासांनी स्थापलेला मारुती पाहावा. अकरा मारुतींपैकी हा अकरावा मारुती. आपल्या बाहूंनी मारुतीने इथे कृष्णेचा प्रवाह दोन बाजूंना वळवला अशी कथा आहे. तिथून परत कराडला यावे आणि अवघ्या १२ कि.मी. वर असलेली आगाशिवची बौद्ध लेणी पाहावीत. तिथून पुढे वसंतगडाच्या पायथ्याला असलेल्या तळबीड गावी जावे. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे हे गाव. गावात त्यांची सुंदर समाधी आहे.

रविवार

कराडच्या उत्तरेला ४० कि.मी. वर असलेल्या औंधला जावे. पंतप्रतिनिधींचे हे गाव. तिथे असलेले यमाई देवीचे मंदिर देखणे आहे. मंदिरासमोर असलेल्या दीपमाळा फारच डौलदार आहेत. औंधचे प्रसिद्ध श्री भवानी संग्रहालय वेळ काढून पाहावे. धुरंधर, सातवळेकर, राजा रविवर्मा अशा ख्यातनाम चित्रकारांची अमूल्य चित्रे इथे पाहायला मिळतात. शिवाय अनेक दुर्मीळ वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो. औंधपासून पुढे १० कि.मी. वर भोसरे गाव आहे तिथे जावे. सरनौबत प्रतापराव गुजर यांचे ते जन्मगाव. त्यांचा तिथे असलेला वाडा आणि समाधी पाहावी. गावात सापडलेले अनेक वीरगळ गावकऱ्यांनी एका मंदिराच्या आवारात रांगेत मांडून ठेवले आहेत. स्वराज्याच्या दोन सरसेनापतींच्या गावाला भेट देण्याचा योग या दोन दिवसांत येतो.

ashutosh.treks@gmail.com