आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

शनिवार

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जालन्याला जावे. इथून पूर्वेला ३० कि.मी. वर असलेल्या सिंदखेड राजाला जावे. जिजाऊसाहेबांचे हे जन्मस्थान. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेली जिजाऊ सृष्टी पाहावी. तिथून पुढे ४५ कि. मी. वर असलेल्या लोणारला जावे. ३० ते ५० हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे लोणार इथे खाऱ्या पाण्याचे एक मोठे सरोवर तयार झाले आहे. ते अंतर अंदाजे ३ कि.मी. आहे. आतमध्ये रामगया मंदिर, शंकर मंदिर, कमळजादेवी मंदिर आहे. लोणार गावातील शिल्पांनी समृद्ध असे दैत्यसुदन मंदिर आवर्जून पाहायला हवे. विविध फुले आणि पक्षी पाहायला मिळतात.

रविवार

पहाटे निघून २५ कि.मी. वरील मेहकरला जावे. विष्णूची त्रिविक्रमरूपातली देखणी ११ फूट उंच मूर्ती पाहण्याजोगी आहे. पूजा सुरू असताना गेल्यास मूर्ती निट पाहता येते. परत लोणार-मंठामार्गे जांबसमर्थला यावे. समर्थ रामदासस्वामींचे हे जन्मस्थान. तिथे मंदिर उभे आहे. समर्थाच्या वापरातील वस्तू पाहाव्यात. ज्या बोहल्यावरून समर्थानी पलायन केले तो बोहला ३ कि.मी. वरील आसनगावला आहे. तिथून अंबडला यावे. अंबडची मत्स्योदरी देवी प्रसिद्ध आहे. टेकडीवर हे सुंदर मंदिर आहे. मंदिरात देवीचे तांदळे पाहायला मिळतात. मंदिरावर असलेले ३ धडे व १ डोक्याचे माशाचे शिल्प अप्रतिम आहे. तिथून जालन्याला परत यावे.