आशुतोष बापट

शनिवार

रत्नागिरीच्या दक्षिणेला असलेल्या गोळप या गावी जावे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती असलेले हरिहरेश्वराचे सुंदर मंदिर पाहावे. कशेळीला जावे. कनकादित्य सूर्याचे मंदिर पाहावे. तिथून आडिवरे गावी जावे. सुप्रसिद्ध महाकाली मंदिराच्या छतावर केलेले लाकडी नक्षीकाम पाहावे. पुढे देवाचेगोठणेत ब्रrोंद्रस्वामींनी बांधलेले भार्गवरामाचे मंदिर आणि परशुरामाची मूर्ती पाहावी. देवळात एक पोर्तुगीज घंटा टांगली आहे. पुढे बारसु या ठिकाणी एक भव्य कातळशिल्प आहे. दोन बाजूंना दोन वाघ आणि मध्ये मानवाकृती असे ६० फूट लांब आणि २० फूट रुंद असे सुंदर कातळशिल्प पाहावे.

रविवार

रत्नागिरीच्या उत्तरेला असलेला जयगड हा सुंदर  जलदुर्ग पाहावा. तीन बाजूंनी जमीन आणि एका बाजूला समुद्र असा हा परिसर अतिशय देखणा दिसतो. दीपगृह पाहावे. जवळच असलेले जिंदाल कंपनीने बांधलेले गणपतीचे मंदिर अत्यंत देखणे आहे. जयगडच्या शेजारीच असलेल्या कऱ्हाटेश्वरला जावे. प्राचीन शिवालय आणि तिथून दिसणारा समुद्र अतिशय अप्रतिम आहे. परतताना मालगुंडला थांबावे. येथील कवी केशवसुत यांचे जन्मस्थान खूप सुंदर राखले आहे. केशवसुतांचे घर तसेच त्यांच्या कवितांचे संग्रहालय मुद्दाम पाहावे. भंडारपुळे, आरे-वारे या सुंदर किनारामार्गाने रत्नागिरीत आल्यावर रत्नदुर्ग पाहावा. येथील सूर्यास्ताचे दृश्य अविस्मरणीय असते.

ashutosh.treks@gmail.com