आशुतोष बापट

शनिवार

चिपळूण जवळचे परशुराम मंदिर पाहावे. ते ब्रम्हेंद्रस्वामींनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडून बांधून घेतले आहे. परशुरामाने याच ठिकाणावरून बाण मारून समुद्र हटवला अशी समजूत आहे. परिसर सुंदर आहे. जवळच विंध्यवासिनीचे मंदिर आहे. महिषासुरमर्दिनीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. शेजारीच कार्तिकेयाची अप्रतिम मूर्ती झाकून ठेवलेली आहे. तिथून गुहागरला जावे. वाटेत डोंगरात प्राचीन लेणी आहेत. गुहागर-वेळणेश्वर-हेदवी ही तिन्ही ठिकाणे रमणीय आहेत. हेदवीला बामणघळ आहे, तिथे लाट आदळून जलस्तंभ तयार होतो. व्याडेश्वराचे प्राचीन आणि सुंदर मंदिर आणि समुद्रावर सूर्यास्त पाहावा.

रविवार

रत्नागिरीच्या दिशेला जावे. राजवाडीतील गरम पाण्याचे कुंड पाहावे. तिथवर जाण्याची पाखाडी आणि परिसर रम्य आहे. कुंडाशेजारचे शिवमंदिर पाहावे. इथे एकावर एक दोन गाभारे आहेत. मंदिराच्या लाकडी खांबांवर केलेले नक्षीकाम फारच सुबक आणि सुंदर आहे. तिथून पुढे कसबा संगमेश्वर इथे जावे. इथे शिलाहारकालीन अत्यंत देखणे कर्णेश्वर शिवमंदिर आहे. मंदिराच्या एका पोर्चवर आतील बाजूस अष्टदिक्पालांच्या मूर्ती आणि मधोमध दगडी झुंबर पाहून डोळ्याचे पारणे फिटते. तिथेच शेषशायी विष्णू आणि दशावतार कोरलेले आहेत.

ashutosh.treks@gmail.com