डॉ. मोहित वि. रोजेकर

छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळ अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. यात निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणांसह प्राचीन मंदिरांचाही समावेश आहे. येथील मंदिरांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे उत्तम प्रकारे जतन केलेले आहे. येथील बहुतेक मंदिरांतील शिल्पकलेचे खजुराहोतील शिल्पांशी साधम्र्य आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळी असलेली गर्दी टाळायची असेल आणि शिल्पकलेचा समृद्ध वारसा शांतपणे पाहायचा असेल, तर पर्यटकांच्या यादीत अभावानेच आढळणारी ही ठिकाणे पाहता येतील.

रायपूरकडून भिलाईकडे जाताना वाटेत एक देवबलोदा नावाचं गाव लागतं. तिथे एक खूप सुंदर शिवमंदिर आहे. स्थानिकांमध्ये ते विश्वनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. वालुकाश्म अर्थात सॅण्डस्टोनपासून निर्मित हे मंदिर इसवी सनाच्या तेराव्या शतकात कलचुरी राजवटीत बांधले गेले. संपूर्ण मंदिराच्या बाह्य़भिंतींवर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपाच्या आतील चार आणि बाहेरील १० खांबांवर भैरव, विष्णु, शिव, महिषासुरमर्दिनी, वेणुगोपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. याशिवाय अनेक नृत्यांगनांची शिल्पेही कोरलेली आहेत. सर्वाचे हावभाव आणि वस्त्रप्रावरणे वाखाणण्याजोगी आहेत. शिवलिंग गर्भगृहात तीन ते चार फूट खाली आहे.

मंदिराच्या बाह्य़ भागावर खालून वरच्या दिशेने गजथर, अश्वथर आणि नरथर अंकित आहेत. गजथरामध्ये काही ठिकाणी हत्ती आणि बैल यांच्या एकत्रित प्रतिमा आहेत. अर्धा थर झाकल्यास हत्ती आणि बैल पूर्ण दृष्टीस पडतात. याच प्रकारचे सुधारित शिल्प वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपात खांबावर दिसते. याशिवाय नरथरामध्ये खजुराहोच्या धर्तीवर काही मैथुनशिल्पेसुद्धा दिसतात. बाह्य़ भिंतींवर अनेक ठिकाणी त्रिपुरान्तक शिव, गजान्तक शिव, वामन, वराह, पार्वती, राधाकृष्ण, लक्ष्मी, त्रिविक्रम वेणुगोपाल, केशिवध इत्यादी दिसतात. मंदिराच्या आवारात एक पुष्करिणीदेखिल आहे. मंदिरासमोर असलेल्या नंदीच्या बाजूला एका शिलाखंडावर एक हात, चंद्रकोर आणि दोन मानवी आकृती आहेत. त्याबद्दल काही विशेष माहिती मिळत नाही. कदाचित वीरगळ असावा.

रायपूरपासून साधारण ३६ किलोमीटर अंतरावर आरंग हे गाव आहे. ते छत्तीसगडमध्ये ‘मंदिरांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावी एक पुरातन मंदिर आहे. भांडदेवल म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. आरंग अत्यंत प्राचीन नगरी आहे. तिथे असलेली अनेक मंदिरे, शिलालेख, ताम्रपट यावरून त्यांची प्राचीनता लक्षात येते. भांडदेवल हे जैन मंदिर आहे. गर्भगृहात र्तीथकरांच्या तीन सुंदर मूर्ती आहेत. मूर्तीची प्रमाणबद्धता आणि त्यांचा रेखीवपणा लक्षात राहण्यासारखा आहे. मंदिराच्या बाहेरील भागावर खालून वपर्यंत सुंदर कोरीवकाम आहे. ज्यात जैन र्तीथकर, मुनी, यक्ष-यक्षिणी, देव-देवता अंकित आहेत. समोरील सज्जा हा हंस, नृत्य-संगीताची दृश्ये तसेच कीर्तिमुखे यांनी युक्त आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार करता, हे मंदिर इसवी सनाच्या नवव्या शतकातील वाटते. हैहय राजवटीत त्याची निर्मिती झाली असावी, असे मानले जाते. दुर्दैवाने या मंदिराचा सभामंडप नष्ट झाला आहे.

रायपूरहून सुमारे ११६ किलोमीटरवर असलेल्या कवर्धा या गावाजवळ एक प्राचीन मंदिर आहे. भोरमदेव नावाने ओळखले जाणारे हे मंदिर हजार वर्षांहून जुने आहे, असे मानले जाते. खजुराहो आणि कोणार्क येथील समृद्ध शिल्पकलेशी साधम्र्य दर्शवणाऱ्या या मंदिराला छत्तीसगडचे खजुराहो असेही म्हटले जाते. स्थानिक गोंड आदिवासी महादेवाला भोरमदेव म्हणतात. त्यावरून या मंदिराला हे नाव मिळाले असावे, असा कयास बांधण्यात आल्याचे कळते. इथे मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय मंदिराच्या प्रवेशद्वरावर गंगा-यमुनेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. भोरमदेव मंदिराच्या आवारात चेरकी महाल, माधव महाल अशी इतरही सुंदर मंदिरे आहेत. या सर्वाचे खजुराहो येथील शिल्पकलेशी कमी-अधिक प्रमाणात साम्य आढळते.

रायपूरला मुक्काम केल्यास केवळ दोन दिवसांत ही सर्व ठिकाणे नीट पाहता येतात. जास्त प्रसिद्धी न मिळाल्यामुळे फारशी गर्दी नसलेली ही ठिकाणे शिल्पकलेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहेत. काही तरी चांगले आणि मनाला आणि नजरेला सुखावणारे पाहिल्याचे समाधान येथे निश्चितच मिळते. इतिहासात डोकावण्याची आणि समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी या ठिकाणी मिळते.

mohitrojekar@gmail.com