राजेंद्र श्रीकृष्ण भट

माणसाला सतत काही तरी नवीन हवे असते. आपल्या भागात ज्या भाज्या पूर्वीपासून आढळत नव्हत्या अशा अनेक भाज्या अलीकडे बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अशा भाज्यांना एक्झॉटिक भाज्या म्हणतात. जग वेगाने जवळ येत आहे. आपल्यासारखेच हवामान असणाऱ्या देशांत पिकणारी फळे, फुले, भाज्या यांची लागवड आपण आपल्या देशातही करू शकतो.

जगभर प्रवास करणारे, वैविध्यपूर्ण पदार्थ खाण्याची आवड असणारे आणि इंटरनेटवर नवनवीन भाज्या-फळे, त्यांतील पोषणमूल्ये आणि त्यांपासून तयार केले जाणारे पदार्थ यांचा शोध घेणाऱ्यांना परदेशांत मिळणाऱ्या भाज्या हव्या असतात.

या भाज्या वेगवेगळ्या प्रकारची कच्ची पाने, सॅलड्स, काकडी, फ्लॉवर, भोपळा इत्यादी प्रकारांत येतात. त्याबरोबरच हर्ब्सचेही अनेक प्रकार असतात. यापैकी अनेक भाज्या, सॅलड्स, हर्ब्स यांचे आपण आपल्या देशात सहज उत्पादन घेऊ शकतो. हवामानानुसार त्यांची विभागणी होते. या भाज्यांचे महाराष्ट्रातील काही भागांत वर्षभर तर काही भागांत केवळ हिवाळ्यात उत्पादन घेता येते. या भाज्यांत तीन प्रकार पडतात.

अल्प कालावधीच्या भाज्या (४५ ते ६० दिवस)

मध्यम कालावधीच्या भाज्या (६० ते ९० दिवस)

दीर्घ कालावधीच्या वर्षभर घेता येणाऱ्या भाज्या (६० दिवस आणि पुढे)