कोणत्याही देशाच्या अध्यक्षांच्या किंवा राष्ट्रप्रमुखांच्या गाडीची ऐट ही निराळीच. राष्ट्राध्यक्षांच्या पदाला साजेसाच या गाडय़ांचा दिमाख असतो. केवळ दिमाखच नाही, तर अनेक व्यवधानांचीदेखील यावेळी काळजी घ्यावी लागते. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जाणे  एवढेच कार्य या वाहनाचे नसते, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सांभाळावी लागते. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश या गाडय़ांमध्ये असतो. राष्ट्र प्रमुखांच्या या गाडय़ा बहुतेकदा चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय असतो.

पोपमोबिल

पोप बेनेडिक्ट हे त्यांच्यासाठी खास बदल करण्यात आलेली मर्सिडीज-बेन्झची एम क्लास वापरायचे. पोपमोबिल या नावाने या गाडीला संबोधले जात असे. ही गाडी बुलेटप्रूफ होती. १९८१ मध्ये तत्कालीन पोप जॉन पॉल यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कॅथलिक चर्चने त्यांच्यासाठी ही गाडी निर्माण करून घेतली होती. सध्याचे पोप फ्रान्सिस हे वॅटिकनमधील प्रवासासाठी ‘फोर्ड फोकस’ ही गाडी वापरतात.

कॅडिलॅक वन ‘बीस्ट’- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष वापरीत असलेल्या गाडीला ‘कॅडिलॅक वन’ ‘बीस्ट’ किंवा ‘लिमोझीन वन’ म्हटले जाते. नावाला साजेसाच या गाडीचा आकार आणि आक्रमकता आहे. डोनाल्ड ट्रम्प वापरीत असलेल्या या गाडीचे अनावरण २४ सप्टेंबर, २०१८ मध्ये करण्यात आले. ही गाडी ट्रम्प यांच्यासाठी नव्याने निर्माण केली आहे. ‘कॅडिलॅक वन’चे वर्णन चाके असलेला अभेद्य किल्ला असेच होऊ  शकते. गाडीतील खिडकीच्या काचा पाच इंच जाड असून गाडीचे दरवाजे ८ इंच जाड आहेत. गाडी आकाराने एखाद्या ट्रक लिमोझिनसारखी आहे. सुरक्षा यंत्रणेमुळे गाडी वजनाने अत्यंत जड म्हणचे ६.४ टनाची आहे. गाडीचे टायरदेखील विशिष्ट प्रकारे बनविण्यात आले असून टायरमधील हवा गेल्यानंतरही ते चालण्यासाठी सक्षम आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी गाडीत  वैद्यकीय सुविधा, त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या रक्त गटाच्या रक्ताचा साठा ठेवण्यात येतो. गाडी अध्यक्षांचा स्फोटापासून बचाव करण्यासाठीदेखील सक्षम आहे. गाडीची किंमत ही १.६ दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. ही गाडी निर्माण करणाऱ्या जनरल मोटर्स या कंपनीने गाडीबाबतच्या कोणत्याही माहितीचा कधीच खुलासा केला नाही. अशाप्रकारच्या गाडीला जाण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

व्लादिमीर पुतीन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ‘औरुस सिनाट’ ही गाडी वापरतात. याआधी मर्सिडीज-बेन्झ एस क्लास (डब्लू-२२१)ही रशियाच्या अध्यक्षांची अधिकृत गाडी होती. पोर्श आणि नामी ही रशियाची मोटार वाहन संस्था यांनी संयुक्तरीत्या या चिलखती लिमोझिनची निर्मिती केली आहे. अर्थातच या गाडीबाबत तपशीलवार माहिती देण्यात येत नाही. परंतु पाच टन वजन असणाऱ्या या महाकाय गाडीमध्ये ४.४ लिटरचे वी-८  इंजिन आहे. यातून ५९८ हॉर्स पॉवर एवढी ऊर्जा निर्माण होते. या गाडीची किंमत चार कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी- रेंज रोव्हर

हिंदुस्थान अम्बॅसॅडर ही बरीच र्वष भारतीय पंतप्रधानाची अधिकृत गाडी म्हणून वापरण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बीएमडब्लू ७ सीरिज ७६० एल आय वापरण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही गाडी काही काळ वापरली.  या गाडीत सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात आले असून तिची किंमत १० कोटी एवढी असल्याचे म्हटले जाते. चार टन वजन असलेल्या या गाडीचा टायर पंक्चर झाल्यानंतरही ती ८० किमी प्रति तास या वेगाने धावू शकते. परंतु सध्या नरेंद्र मोदी हे प्रवासासाठी रेंज रोव्हर स्पोर्ट्स वापरतात. गाडीत पॅनारॉमिक सनरूफ असल्यामुळे पंतप्रधान गाडीतून बाहेर ना पडता लोकांना अभिवादन करू शकतात. या गाडीतही सुरक्षेच्या दृष्टीने बदल केले असून सुरक्षेसाठी या बीएमडब्लू एक्स ५ या गाडय़ांचा ताफा पंतप्रधानांच्या सोबत असतो. गाडीत पाच लिटरचे व्ही ८ इंजिन असून या गाडीचा सर्वाधिक वेग प्रति तास २१८ किमी एवढा आहे. गाडीच्या बॉडीखाली बुलेटप्रुफ प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. गाडीवर विषारी वायुच्या हल्ल्याविरोधात पंतप्रधानांचे रक्षण करण्याची यंत्रणा आहे.

हुकूमशहाची सवारी

जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरला मर्सिडीस गाडय़ांचे वेड होते. त्याने मर्सिडीसच्या अनेक गाडय़ा वापरल्या, परंतु  मर्सिडीस ७७० ही त्याची आवडती गाडी होती. आज ही गाडी जर्मनीतील एका खासगी संग्रहालयात आहे. ‘मॉडेल के’ ही कॉन्व्हर्टिबल होती. तिला बुलेटप्रू करण्यात आले होते. त्या काळात ही सर्वात मोठी आणि महागडी मर्सिडीस होती. या गाडीची लांबी सहा मीटर होती, तर रुंदी २.२० मीटर. ही गाडी ४.८ टनाची होती. गाडीमध्ये इंधनासाठी ३०० लिटरची टाकी होती. १०० किमीच्या अंतरासाठी ही गाडी ६० लिटर पेट्रोल वापरत होती. मिरवणुकांमध्ये हिटलर उभा राहून या गाडीतून प्रवास करीत असे. त्यासाठी त्याने गाडीत विशेष बदल करून घेतले होते.  सुरुंगापासून  सुरक्षेसाठी गाडीच्या खालच्या बाजूला लोखंडी चिलखत लावण्यात आले होते. ही भारदस्त गाडी हिटलर त्याची प्रतिमा महाकाय आणि दिमाखदार दाखवण्यासाठी वापरीत होता. रोमन साम्राज्यातील सम्राट ज्याप्रमाणे प्रजेला भेटण्यासाठी रथाचा वापर करायचे आणि लोकांचे अभिवादन स्वीकारायचे त्याप्रकारचे एक रोमन रथ म्हणून हिटलर या गाडीचा वापर करीत होता.

बेंटले स्टेट लिमोझीन

(राणी एलिझाबेथ )

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय या ‘बेंटले स्टेट लिमोजीन’ या गाडीने प्रवास करतात. ही गाडी बेंटले या कंपनीने खास राणी एलिझाबेथ यांच्यासाठी तयार केली आहे. अशा केवळ दोन गाडय़ा तयार करण्यात आल्या आहेत.  या गाडीत ६.७ लिटरचे ट्वीन टबरे चार्जेर असलेले व्ही-८ इंजिन आहे. २०९ किमी प्रति तास हा या गाडीचा सर्वाधिक वेग आहे. राणी एलिझाबेथ यांना गाडीतून उतरताना किंवा गाडीत बसताना कोणतीही अडचण होऊ  नये यासाठी गाडीची उंची अधिक ठेवण्यात आली आहे. गाडीच्या खिडक्या मोठय़ा ठेवण्यात आल्या आहेत. या गाडीची किंमत १५ दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे.