News Flash

व्हिंटेज वॉर : वैर क्रूझरचे

१९०३ मध्ये जन्माला आलेल्या हार्ले डेव्हिडसनने नेहमीच क्रूझर मोटारसायकलच्या बाजारावर वर्चस्व राखून ठेवले.

(संग्रहित छायाचित्र)

१९व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत म्हणजेच १९०१ ते १९५३ पर्यंत अमेरिकी क्रूझर मोटरसायकलच्या बाजारावर अधिराज्य गाजवण्यासाठी दोन मोठय़ा मोटारसायकल कंपन्यांचे वैर सुरू होते. १९०३ मध्ये जन्माला आलेल्या हार्ले डेव्हिडसनने नेहमीच क्रूझर मोटारसायकलच्या बाजारावर वर्चस्व राखून ठेवले. या काळात जी कंपनी हार्लेसमोर प्रतिस्पर्धी म्हणून तग धरून उभी राहू शकली ती म्हणजे ‘इंडियन’.

हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन या दोन्ही कंपन्यांचे चाहते कोणत्या कंपनीने मोटारसायकल निर्मितीस आधी सुरुवात केली यावरूनदेखील वाद रंगवतात. त्याचा संक्षिप्त इतिहास असा की, विल्यिम एस हार्ले यांनी सायकलमध्ये बसविण्यात येऊ  शकणाऱ्या इंजिनच्या ब्लूप्रिंटवर काम करण्यास १९०१ मध्ये सुरुवात केली. तर जॉर्ज एम हेंडी यांनी १८९७मध्ये हेंडी मॅन्युफॅक्चरिंग या मोटारसायकल उत्पादन करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. त्यांनी १९०१ मध्ये ऑस्कर हेडस्ट्रॉम या व्यक्तीला सायकलमध्ये बसवता येईल असे इंजिन तयार करण्यास सांगितले. हीच हेंडी मॅन्युफॅक्चरिंग पुढे ‘इंडियन’ झाली. त्याचवर्षी हेंडीने इंजिन लावलेल्या तीन दुचाकी तयार केल्या. यासाठी स्प्रिंगफिल्ड मॅसेच्युसेट्स येथे एक कारखानाही टाकला. १९०२ पर्यंत हेंडी मोटारसायकलचे उत्पादन करू लागली होती. विल्यिम हार्ले आणि आर्थर डेव्हिडसन यांनी आपली पहिली मोटारसायकल १९०३मध्ये बाजारात आणली. हेडस्ट्रॉम यांनी न्यूयॉर्क ते स्प्रिंगफिल्ड ही एनडय़ूरन्स रेस जिंकली आणि या मोटारसायकलने ९० किमी प्रतितास इतक्या वेगात धावण्याचा विक्रम नोंदवला. १९०४ मध्ये हार्ले डेव्हिडसनचे पहिले दालन सुरू झाले. त्याचवर्षी इंडियनने गडद लाल रंगाची मोटार बाजारात दाखल केली. पुढे याच रंगसंगतीने मोटारसायकलींना रेड इंडियन हे नाव मिळवून दिले. आणि तीच कंपनीची ओळख बनली. १९०६ मध्ये इंडियन मोटारसायकलींच्या दोन डीलरनी सॅन फ्रॅन्सिस्को ते न्यूयॉर्क हा प्रवास ३१ दिवसांत पूर्ण केला. या दोन्ही शहरांमध्ये ४१३५ किमीचे अंतर आहे. आणि या प्रवासादरम्यान मोटारसायकलीत कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झाला नसल्याचा दावा केला. आणि इंडियनची लोकप्रियता वाढू लागली. याच वर्षी इंडियनने त्यांचे पहिले व्ही ट्विन इंजिन तयार केले. हे इंजिन ६३३ सीसीचे होते. तर हार्लेने त्यांचे पहिले व्ही ट्विन इंजिन हे १९०९ मध्ये तयार केले. वॉलने डेव्हिस याने सॅन फ्रॅन्सिस्को ते न्यूयॉर्क हे अंतर २० दिवसांत कापले. एर्विन ‘कॅननबॉल’ बेकर या मोटारसायकल रेसरने ग्रामीण भागातील रस्त्यांनी मार्गक्रमणा करीत हे अंतर ११ दिवसांत कापले. हार्लेने १९१३मध्ये त्यांचा रेसिंग विभाग सुरू केला. आणि कमी कालावधीतच त्यांनी रेसिंग क्षेत्रात स्वत:चे नाव तयार केले.

पहिल्या महायुद्धाच्या काळात दोन्ही कंपन्यांनी अमेरिकी लष्कराला मदतीसाठी परदेशात मोटारसायकल पाठवल्या. १९२० पर्यंत त्यांचे वैर सुरूच होते. १९२० मध्ये दोन्ही कंपन्यांनी लिटर इंजिन बाजारात दाखल केले. त्यांनी १००० सीसीचे ट्विन इंजिन असलेली चीफ नावाची मोटारसायकल बाजारात दाखल केली. तर १९२० पर्यंत ६७ देशांत २००० डीलरसह हार्ले डेव्हिडसन जगातील सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी झाली. १९३१ ते १९५३ पर्यंत अमेरिकेत हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन या दोनच मोटारसायकल उत्पादन कंपन्या होत्या. १९३५ मध्ये हार्लेने मोटारसायकलचे आराखडे, साहित्य, रंग जपानमधील सांक्यो कंपनीला लायसेन्स्ड केले. आणि सांक्योची पहिली मोटारसायकल रिकुओ जन्माला आली. १९३८ मध्ये इंडियन मोटारसायकलचे डीलर जे सी कॅलॅरेन्स हॉईल यांनी इंडियन मोटारसायकल मालकांचा दि जॅकपाईन जिप्सीज हा क्लब तयार केला. आणि दक्षिण डकोटामधील स्टुर्गीस या शहरात ब्लॅक हिल्स क्लासिक ही शर्यत आयोजित केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा या दोन्ही कंपन्यांनी नागरिकांसाठी मोटारसायकल उत्पादन बंद केले. आणि अमेरिकी सैन्यासाठी उत्पादन सुरू केले. १९२० आणि १९३० दरम्यान लहान डोंगरांवरील शर्यती लोकप्रिय होत्या. हार्ले आणि इंडियन या दोघांनीही या शर्यतींमध्ये भाग घेतला. १९५३ मध्ये हार्लेने ५० वर्षे पूर्ण केली. आणि इंडियनवर उत्पादन बंद करण्याची वेळ आहे. पुढच्या दशकात अनेक लोकांनी या कंपनीला अर्थबळ देऊन पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. १९६९ मध्ये हार्ले एएमएफमध्ये विलीन झाली. १९८१ मध्ये हार्लेच्या १३ अधिकाऱ्यांनी एएमएफकडून पुन्हा कंपनी विकत घेतली. तर २०११ मध्ये पोलॅरिस कंपनीने इंडियनला विकत घेतले. हार्ले या वादळापुढे जगातील मोजक्या मोटारसायकल कंपन्या तग धरून उभ्या राहू शकल्या. त्यात इंडियन हे महत्त्वाचे नाव आहे. अमेरिकेबाहेर जास्त लौकिक न मिळवू शकलेली इंडियन आजही अमेरिकी मोटारसायकल चाहत्यांच्या मनात स्थान राखून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:16 am

Web Title: article about violence cruisers
Next Stories
1 मस्त मॉकटेल : स्ट्रॉबेरी मार्गारिटा
2 उन्हातील गारवा
3 ट्रिपटिप्स : जंगल भटकंती
Just Now!
X