प्रवासासाठी अनेक जण बाहेरगावी जात असतात. मात्र भटकंती करणाऱ्यांमध्ये मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या गडावरती जाणे किंवा बाईक घेऊन दूरवर जाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. ट्रेकिंग किंवा रायडिंग करतानाही इलेक्ट्रॉनिक गोष्टींची आवश्यकता असते. ट्रेकिंगला जाताना आणि रायडिंगला जाताना कोणत्या मूलभूत इलेक्ट्रॉनिक वस्तू सध्या वापरायला हव्यात किंवा सध्या त्या अधिक वापरल्या जात आहेत. याविषयी जाणून घेणार आहोत यंदाच्या ‘ट्रेक-राईड आणि टेक’मधून..

वॉकीटॉकी

वॉकीटॉकी म्हटले के पोलीस किंवा अन्य सुरक्षा व्यवस्थेच्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र ट्रेकिंगला जातानाही सध्या अनेक ट्रेकर्स वॉकीटॉकीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. ट्रेकिंगला जाणारे विविध समूह वॉकीटॉकीचा वापर करतात. एखादा व्यक्ती गड चढताना पुढे गेला तर त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकीची मदत होत असल्याचे ट्रेकर्सचे म्हणणे आहे. बाजारात विविध प्रकारचे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. अनेकदा डोंगरदऱ्यांमध्ये वॉकीटॉकी योग्य तो प्रतिसाद देत नाहीत. मात्र ट्रेकिंगसाठी खास वॉकीटॉकी बाजारात पाहायला मिळत आहेत. रात्रीच्या वेळेस एखाद्या गडावर चढाई करताना समोरची वाट दिसावी याकरिता वॉकीटॉकींवर एलईडी लाईटसची सुविधा पुरवण्यात आली आहे. समूहाने बाइकने राईडला जातानाही वॉकीटॉकीचा वापर होत असल्याचे पाहायला मिळते.

किंमत- दोन ते पाच हजार रुपये

प्रो ट्रेक वॉच

ट्रेक करताना ट्रेकर्सला अनेकदा कळत नाही की कोणत्या ठिकाणी आपण चालत आहोत. राईड करताना वाहनचालकही रस्ता चुकतो. अशा वेळेस ‘प्रो ट्रेक वॉच’ कामी येते. प्रो ट्रेक वॉच या घडय़ाळाला ट्रेकर्स आणि रायडर्समध्ये मोठी मागणी आहे. कॅसिओसारखे चांगल्या कंपनीचे विविध प्रो टेक वॉच बाजारात उपलब्ध आहेत. घडय़ाळ्याच्या उंची किमतीप्रमाणेच यामधील सुविधा तितक्याच उत्कृष्ट आहेत. जीपीएस, होकायंत्र, एकूण कापलेले अंतर यांसारख्या विविध गोष्टी एकाच घडय़ाळ्यात देण्यात आल्यामुळे ट्रेकर्सही या घडय़ाळ्याकडे आर्कषित होत आहेत.

किंमत- २५ ते ३० हजार रुपये

सोलार बॅटरी चार्जर

अनेकदा ट्रेक करताना तसेच राईड करताना अधिक कालावधी जातो. दुर्गम ठिकाणी विजेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोबाइल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे चार्जिग करणे जिकिरीचे जाते. अशा वेळेस सोलार बॅटरी चार्जर कामी येतो. सहज हाताळता येणारे हे बॅटरी चॉर्जर बॅगेप्रमाणे खांद्यावरही अडकवू शकतो. गडावर जसजसे उंच जाऊ तसतसा सूर्यप्रकाश अधिक मिळतो. परिणामी त्याचा फायदा सोलार बॅटरी चार्जिगसाठी होतो. रायडिंग करताना दुचाकी कोठेही न थांबवता सोलार बॅटरी चार्जर सूर्यप्रकाशाच्या मदतीने चार्ज करता येते. बाजारात विविध प्रकारच्या सोलार बॅटरी चार्जर उपलब्ध आहेत.

किंमत- तीन हजार ते चार हजार रुपये

ट्रेकिंग स्टीक

ट्रेकिंग करताना अवघड वाटेवर तसेच चढाईवर ट्रेकिंग स्टीक नेहमीच उपयोगात येते. मात्र अद्ययावत ट्रेकिंग स्टीक सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या ट्रेकिंग स्टीकवर विशिष्ट प्रकारच्या यंत्रणा आपल्याला पाहायला मिळतात. किती अंतरावर चढाई करण्यात आली आहे. तापमान किती आहे याची माहिती डिजिटल स्वरूपात या ट्रेकिंग स्टीकवर पाहायला मिळते. फोल्ड करून बॅगेत ठेवता येणाऱ्या ट्रेकिंग स्टीकही बाजारात उपलब्ध आहेत.

किंमत- दोन ते चार हजार  रुपये

ड्रोन

ड्रोनचा वापर चित्रपटाच्या चित्रीकरणात किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी पाहायला मिळायचा. मात्र आता ट्रेकिंग तसेच राईडिंग करतानाही ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेकिंग किंवा दूरवर बाईक राईड यांचे आयोजन करणाऱ्या संस्था या अनेकदा पैसे आकारून इतरांना राईडवर, ट्रेकला घेऊन जातात. त्या वेळी त्या राईडचा ट्रेकचा प्रवास संकेतस्थळांवर तसेच समाजमाध्यमांसमोर ब्लॉग स्वरूपात लोकांसमोर माडंण्यासाठी ड्रोनचा वापर अनेक ट्रेकर्स आणि रायडर्स सध्या करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळेस चित्रीकरणासाठी योग्य असणारे नाईट व्हीजर ड्रोनही बाजारात उपलब्ध आहे. गडावरची ट्रेकर्स चढाई आणि विस्तीर्ण रस्त्यावर ऐटीत चालणाऱ्या दुचाकी यांचे आकर्षक चित्रीकरण ड्रोनद्वारे करण्याचा वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

किंमत- पाच ते पंधरा हजार रुपये

संकलन- ऋषिकेश मुळे