|| मकरंद जोशी

उन्हाळ्यातली सहल म्हटल्यावर सर्वात आधी आठवण येते ती अर्थातच हिमालयाची. उत्तरेकडील लडाखपासून ते पूर्वेकडच्या दार्जिलिंगपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीतील उन्हाळा घालवायचे एक मस्त ठिकाण म्हणजे ‘औली’. उत्तराखंड राज्याच्या चामोली जिल्ह्य़ात असलेले औली हे स्थान स्थानिकांमध्ये ‘औली बुग्याल’ म्हणजे औली कुरण म्हणून ओळखले जाते. ९२०० फुटांवर हिमशिखरांच्या गराडय़ात वसलेले औली हिवाळ्यात बर्फाची शाल पांघरते, तर उन्हाळ्यात हिरवाईचा शेला ओढून घेते.

चारधाममधील बद्रिनाथकडे जाताना वाटेत जोशीमठ (ज्योतीर्मठ) लागतो, या गावापासून फक्त १६ कि.मी.वर औली आहे. सफरचंदाच्या बागा, ओक-पाइन-ऱ्होडोडेंड्रॉन आणि देवदाराचे अरण्य, भोवती नंदादेवी, मानापर्वत, कामेत, त्रिशुल अशा हिमाच्छादित शिखरांचा गराडा यामुळे औलीला एक अनुपम निसर्गसौंदर्य लाभले आहे. नोव्हेंबर ते मार्च या काळात औलीच्या उतारांवर स्किइंगचा आनंद लुटायला जगभरातून पर्यटक येतात. बर्फ वितळल्यानंतर औलीचे उतार हिरवाईने आणि रानफुलांनी भरून जातात. औलीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘केबल कार’ किंवा गोंडोला. जोशीमठ येथून तुम्ही गोंडोलात बसून हवाई सफर करत औलीला पोहोचू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला स्किइंग स्लोप्सकडे जायचे असेल तर ‘चेअर लिफ्ट’चा पर्यायही उपलब्ध आहे.

औलीमध्ये असलेला ‘चिनाब लेक’ हा तलाव मानवनिर्मित आहे, पण त्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. मात्र या तलावाचे सौंदर्य अनुभवायला छोटासा ट्रेक करावा लागतो. औलीला आल्यावर आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे ‘गुसरे ब्युगाल’. ९८०० फुटांवरील या कुरणामधून भोवतालच्या गढवाल रांगांचे मनोहर दर्शन घडते. या ब्युगालला जाण्यासाठीही तीन किलोमीटरची पदभ्रमंती करावी लागते. या वाटचालीत नंदादेवी, त्रिशुल, द्रोण या हिमशिखरांचा नजारा पाहायला मिळतो. औलीपासून १५ कि.मी.वर ‘शैलधार तपोवन’ आहे. या लहानशा गावात गरम पाण्याचे झरे आहेत. औलीमध्ये राहाण्यासाठी गढवाल विकास मंडलची रेस्ट हाऊस आहेत. तशीच खासगी रिसॉर्टसही आहेत. ऋषीकेश रेल्वे स्थानक (२५० कि.मी.) हे जवळचे रेल्वे स्थानक तर डेहरादूनचा विमानतळ (२७० कि.मी.) हा जवळचा विमानतळ आहे.

उन्हाळ्याचा ताप कमी करायला जसा हिमालयाचा बर्फाळ गारवा उपयोगी पडतो त्याचप्रमाणे हिरव्यागर्द जंगलाची शीतल सावलीही उपयोगी ठरते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सुटका हवी असेल तर दक्षिण भारतातील देवभूमी केरळची वाट धरावी. या राज्यातील इडुक्की जिल्हा म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षणांचा खजिनाच. मुन्नार, रामक्कलमेदू, थेक्काडी, एराविकुलम अभयारण्य, पेरियार टायगर रिझव्‍‌र्ह, छीय्यापारा धबधबा अशी पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे या जिल्ह्य़ात आहेत. या जिल्ह्य़ातील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे ‘इडुक्की आर्च डॅम’. आपल्या भव्य आकाराने पाहाणाऱ्यांवर छाप पाडणारे हे धरण ‘आशियातील सर्वात मोठे कमानी धरण’ म्हणून ओळखले जाते. जलविद्युत प्रकल्पासाठी हे धरण १९७३ साली बांधण्यात आले. आता या धरणात पर्यटकांसाठी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. या धरणासोबत आणखी दोन धरणे बांधण्यात आली आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून ६० चौ.कि.मी.चा जलाशय तयार झाला आहे. या सगळ्या परिसराचे नेत्रसुखद दर्शन घडते ते हिल व्ह्य़ू पार्कमधून. आठ एकरांच्या परिसरात पसरलेल्या या पार्कमध्ये इथल्या बहुरंगी फुलांचे, अनोख्या वनस्पतींचे दर्शन तर घडतेच पण हिरव्यागार डोंगरांच्या कुशीतला धरणाचा जलाशय पाहून डोळे तृप्त होतात. इडुक्की धरणाच्या जवळच इडुक्की अभयारण्य आहे. पेरियार आणि चेरुतोनी या दोन नद्यांच्या सान्निध्यात असलेल्या या जंगलामध्ये सांबर, गवा, रानकुत्रे याबरोबरच हत्ती आणि पट्टेरी वाघही आढळतो.

इडुक्की धरणापासून दीड तासाच्या अंतरावर रामक्कलमेदू हे हिल स्टेशन आहे. लोककथेनुसार या ठिकाणच्या टेकडीवर सीतेच्या शोधार्थ फिरणारे राम-लक्ष्मण आले होते. इडुक्की धरण कुरवन आणि कुरथी या टेकडय़ांमध्ये बांधलेले आहे. या कुरवन आणि कुरथीचे शिल्प इथे पाहायला मिळते. या परिसरात विद्युतनिर्मितीसाठी पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. इडुक्कीला जवळचे रेल्वे स्थानक आहे कोट्टायम (१०२ कि.मी.) आणि एर्नाकुलम (१०४ कि.मी.). तर जवळचा विमानतळ आहे कोचिन. मुन्नार, थेक्काडी या परिचित आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांना भेट देताना याच भागातील इडुक्कीच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद नक्की घ्या.

makarandvj@gmail.com