News Flash

पठडीबाहेरचं अंदमान

प्रवासात वेळ जातो, पण अंदमानचा हा कमी गर्दीचा भाग पाहण्यात वेगळीच मजा आहे.

विमानाने चेन्नईहून अंदमानच्या दिशेने जाताना, काही वेळातच अथांग समुद्र दिसू लागतो. समोर दृष्टी जाईल तिथपर्यंत पसरलेलं आकाश आणि खालचा समुद्र यांची निळाई पाहात अंदमानची सफर सुरू होते. अंदमान म्हणजे निळाशार, स्वच्छ समुद्र आणि पांढरीशुभ्र वाळू. गेल्या काही वर्षांत हे लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरलं आहे. पण त्यामध्ये भटकंतीचा मार्ग बहुतेकदा एकच असतो. वाट थोडी वाकडी केली आणि दिगलीपूर, रंगत, मायाबंदर, बारातांगला भेट दिली तर एक वेगळंच अंदमान पाहायला मिळतं. 

अंदमानच्या ३२५ बेटांपैकी १०-१२ बेटं प्रवाशांसाठी खुली आहेत. सगळ्या बेटांची सफर करायची तर किमान १५-२० दिवस लागतात. अंदमानचा पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील, रॉस हा दक्षिण भाग सर्वसाधारणपणे सध्याच्या पर्यटकांच्या नकाशावर असतो. पण बारातांग, रंगत, मायाबंदर हा मधला भाग आणि दिगलीपूर हे उत्तरेचं टोक फारसं पाहिलं जात नाही. प्रवासात वेळ जातो, पण अंदमानचा हा कमी गर्दीचा भाग पाहण्यात वेगळीच मजा आहे.

दिगलीपूरपासून अध्र्या तासाच्या अंतरावर असलेली रॉस आणि स्मिथ बेटं ही तिथली मुख्य आकर्षणं आहेत. मूळ गावातून दहा मिनिटांचा स्पीड बोट प्रवास करून आपण या बेटांवर पोहोचतो. हिरव्यागार वनराईने नटलेली बेटं आणि चारही बाजूंनी पसरलेला अथांग समुद्र हे दृश्य नेत्रदीपक ठरतं. पर्यटकांची संख्या कमी असल्याने या बेटांवर विक्रेते, फेरीवाले नाहीत. त्यामुळे तीन तासांसाठी (ही वेळ वन खात्याने ठरवून दिलेली असते.) या बेटांवर जाण्यापूर्वी पाण्यापासून खाऊपर्यंत सगळे साहित्य घेऊन जावे लागते. या समुद्रकिनारी तुम्ही मनसोक्त पोहू शकता. डिसेंबर ते मार्चच्या महिन्यात कालीपूर समुद्रकिनाऱ्यावर कासवे प्रजननासाठी येतात. पण ही कासवे संध्याकाळी किनाऱ्यावर येत असल्यामुळे त्यांना पाहण्याची संधी मिळणे कठीणच!

याशिवाय दिगलीपूरमध्ये लाइमस्टोन गुंफा, चिखलाचा ज्वालामुखी पाहायला मिळतो. ट्रेकिंगची आवड असल्यास सॅडेल पीकवरून अंदमानचा देखावा अनुभवू शकता. येथे एखाद्या समुद्रकिनारी बसून किंवा स्कूटरवरून फिरताना समोर अस्ताला जाणारा सूर्य पाहणं हा छान अनुभव असतो. पर्यटकांची फारशी गर्दी नसल्यामुळे इथे खाण्याचे चमचमीत पर्याय तुम्हाला मिळणार नाहीत. प्रवासात किंवा गावात मिळणारी गरमागरम रस्सम किंवा सांबरभात आणि तीन भाज्या, तळलेल्या माशाचा तुकडा, चिंचेचं सार, पापड अशी साधी तमिळ थाळी आवर्जून खावी.

अंदमानच्या कोणत्याही बेटावर जाण्यासाठी सोयीचे मार्ग पोर्ट ब्लेअरवरून जातात. त्यामुळे पोर्ट ब्लेअर फिरण्यासाठी स्वतंत्र दिवस राखून ठेवण्याऐवजी फावल्या वेळात इथे फिरणं सोयीचं ठरतं. अंदमानचा इतिहास सांगणाऱ्या ‘कालापानी संग्राहलया’ला आवर्जून भेट द्यावी. एरवी अंदमान म्हणजे समुद्र आणि काळ्यापाण्याची शिक्षा इतकीच ओळख आपल्याला पुस्तकांमधून होते. पण त्यापलीकडे अंदमानमधील मूळ आदिवासी, ब्रिटिशकाळात आणलेले कैदी आणि त्यांचे वारस, ब्रिटिश, जपानी सैन्याच्या अत्याचाराच्या कथा असा अंदमानचा प्रवास या संग्राहलयात पाहता येतो. जुने दस्तावेज, पुस्तकं, पत्रं यांचा संग्रह इथे आहे.

स्कुबासाठी हॅवलॉक बेट गाठावं लागतं. पाण्याखालील प्रवाळ, असंख्य प्रजातींचे मासे डोळे दिपवतात. समुद्राच्या पाण्यात माणसांचा वावर वाढल्याने पाणी गढूळ होतं. त्यामुळे सकाळी लवकर स्कुबा करणं उत्तम. स्कुबाचा खर्च ३५००-५५०० रुपयांच्या घरात जाते. हॅवलॉकमध्ये कालापथ्थर आणि राधानगर हे दोन सुंदर समुद्रकिनारे आहेत. समुद्री खेळांची मजा लुटायची असेल तर एलिफंट बीचला भेट द्या. इथूनच एक दिवसासाठी नील बेटाची सफरही करता येते. टुरिस्ट गाडय़ांमधून तिऱ्हाईतासारखं अंदमान फिरण्यापेक्षा स्थानिकांमध्ये मिसळून आडवाटेने प्रवास केल्यास शेवटच्या दिवशी घरी परतताना मन आठ दिवसांच्या आठवणींमध्ये घुटमळत राहतं.

दिगलीपूर आणि बारातांग

पोर्ट ब्लेअर ते दिगलीपूरमधील ३२५ किमीचं अंतर पार करण्यासाठी १०-१२ तास लागतात. दिगलीपुरला जाण्यासाठी पोर्ट ब्लेअरवरून गाडी भाडय़ाने मिळते. याशिवाय सकाळी ४ आणि ७ दरम्यान सरकारी आणि खासगी बस दिगलीपूरला जातात. या छोटय़ाशा गावाची दिवसभर सफर करायची असेल, तर मोटारसायकल भाडय़ाने घेता येते. गावात रिक्षाही मिळतात.

दिगलीपूरवरून येताना शक्यतो रात्रीची किंवा सकाळी ४ ला सुटणारी बस पकडावी. जेणेकरून बारातांगला पोहोचून लाइमस्टोन गुंफा पाहता येतात. पोर्ट ब्लेअर ते दिगलीपूर हा रस्ता जंगलातून आणि आदिवासी पाडय़ांमधून जातो. अंदमानमधील आदिवासी जमाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे या भागातून नेमक्याच गाडय़ा पूर्वपरवानगीने सोडल्या जातात. तसंच वाटेत ठरवून दिलेल्या ठिकाणीच तुम्हाला जेवण, स्वच्छतागृहाच्या सोयी उपलब्ध होतात. फोटो काढायला किंवा विरंगुळा म्हणून जंगलाच्या कोणत्याही भागात थांबायची परवानगी इथे नसते.

स्थानिक वाहने

दिगलीपूर भागात जाण्यासाठी टूर कंपन्या गाडय़ा भाडय़ाने देतात. ३ दिवसांसाठी त्यांचे भाडे साधरणपणे १०,००० रुपयांपर्यंत असते. त्याऐवजी सरकारी बस (२८० रुपये) आणि खाजगी बसने (४०० रुपये) सुद्धा जाऊ  शकता. आदल्या दिवशी तिकीट काढायला मात्र विसरू नका. अंदमानला ठिकठिकाणी जायला रिक्षा महाग ठरू शकते. त्याऐवजी दिवसभरासाठी भाडय़ाने स्कूटर घेता येते. दिगलीपूरला ३०० रुपये आणि हॅवलॉकला ५०० रुपये भाडं आणि ८० रुपये/लिटर दराने पेट्रोल मिळते. इथे हॉटेल बुकिंग ते बस तिकिटापर्यंत सगळीकडे ओळखपत्र असणं गरजेचं असतं. तसचं वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळले जातात.

राहण्याची आणि खाण्याची सोय

पोर्ट-ब्लेअर, हॅवलॉक येथे भरपूर हॉटेल्स, लॉज आहेत. दिगलीपूर, रंगत भागात मात्र राहण्याच्या सोयी फारशा नाहीत. त्यामुळे आगाऊ  बुकिंग असणं उत्तम ठरतं. इथे जंगल विभाग आणि सरकारी अतिथिगृहे आहेत. तिथे राहण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. थेट बुकिंग केल्यास हॉटेलचे स्वस्त पर्याय मिळतात. दिगलीपूर भागात पारंपरिक तामिळ, बंगाली पद्धतीचं साधं जेवणच मिळतं आणि ते नेहमीच्या हॉटेलच्या जेवणापेक्षा उत्तम असतं.

bhagatmrunal3@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 1:39 am

Web Title: article on andaman islands andaman and nicobar islands
Next Stories
1 खाद्यवारसा : अंडय़ाचं कालवण
2 शहरशेती : सौंदर्यवर्धक कोरफड
3 सुंदर माझं घर : बुकमार्क
Just Now!
X