वाचाल तर वाचाल हे वाक्य थोरामोठय़ांकडून अनेकदा आपण ऐकत असतो. अनेकांना वाचनाची आवड असते. प्रत्येकाच्या आवडीनुसार जो तो त्या त्या प्रकारची पुस्तके वाचत असतो. मात्र ही पुस्तके वाचत असताना वाचण्याच्या पद्धती बदलत असतात. पुस्तकांवरून वाचक किंडलवर पुस्तके वाचू लागला. मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने सध्या वाचनावरही मात केल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी पुस्तकांसारखाच अनुभव देणाऱ्या ऑडिओ बुक्सची बाजारात मोठी चलती आहे. अशी ऑडिओ बुक उपलब्ध करून देणारे अनेक अ‍ॅप्स आपल्याला मिळतात. हे अ‍ॅप केवळ पुस्तके ध्वनिरूपात उपलब्धच करून देत नाहीत, तर  पुस्तकातील संवाद किंवा प्रसंग चपखल शैलीत ध्वनिमुद्रित करता येतात. असेच काही अ‍ॅप..

गुगल प्ले बुक्स

गुगलतर्फे २०१८ रोजी गुगल प्ले बुक्स अ‍ॅप लाँच करण्यात आले. याच वेळी गुगल बुक हे अ‍ॅप ऑडिओ रूपात अपडेट झाले. या अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील अनेक पुस्तके ऐकता येतात. गुगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलवर सहज डाऊनलोड करता येते. तसेच गुगल खात्याशी हे अ‍ॅप संलग्न करता येते. त्यानंतर वेब ब्राऊझरच्या माध्यमातून लॅपटॉपवरही या अ‍ॅपचा वापर करता येतो. विविध भाषेतील हजारो पुस्तके या अ‍ॅपवर ऐकता येतात. हे अ‍ॅप सशुल्क आहे.

स्टोरीटेल

इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील असंख्य पुस्तके या अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकता येतात. विशेष म्हणजे तुम्ही एखादे पुस्तक एकदा मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेत की ते तुम्हाला ऑफलाइनही ऐकता येते. पुस्तकातील तुम्हाला आवडलेला एखादा भाग तुम्ही मित्रांसोबत शेअरही करू शकता. त्यासोबत तुम्ही ऐकत असलेल्या पुस्तकांच्या काही महत्त्वाच्या नोंदीही अ‍ॅपमध्ये करता येतात. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओस् मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते. हे अ‍ॅप सशुल्क आहे.

लिब्रीव्होक्स

२४ हजार मोफत ऑडिओ पुस्तकांचा संग्रह या अ‍ॅपमध्ये आहे. या संग्रहामध्ये नवीन पुस्तकांसोबतच छपाई बंद झालेल्या काही प्रसिद्ध जुन्या पुस्तकांचाही संग्रह आहे. त्यासोबत जुन्या ऑडिओ नाटकांचा संग्रह या अ‍ॅपवर ऐकायला मिळतो. लिब्रीवोक्स हे अ‍ॅप गुगल कास्ट आणि ब्लुटूथच्या माध्यमातून नियंत्रित करता येते. या अ‍ॅपवर असलेली २४ हजार इंग्रजी पुस्तके आणि नाटके ही मोफत ऐकायला मिळतात. अ‍ॅन्डॉइड आणि आयओस् मोबाइलवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

ऑडीबल

ऑडीबल हे अ‍ॅमेझॉन कंपनीचे ऑडिओ बुक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर जगभरातील २० लाख विविध पुस्तके उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉनच्या अकाऊंटवरून सहज या अ‍ॅपवर लॉग ईन करता येते. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ बुक हे श्रोत्याला ज्या गतीने ऐकायचे आहे त्या आवाजाची गती ठरवता येते. तुम्ही या अ‍ॅपवरून तुमचे सदस्यत्व रद्द केले तरीही तुम्ही डाऊनलोड केलेली पुस्तके तुमच्या अ‍ॅपमध्ये राहतात. तुम्ही ती कितीही वेळा ऐकू शकता. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओस् मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते. हे अ‍ॅप सशुल्क आहे.