वैद्य प्रभाकर शेंडय़े
drshendye@gmail.com
डोक्यावर औषधी द्रवाची धार सोडणे याला शिरोधारा म्हणतात. आयुर्वेद पंचकर्म व रिलॅक्सेशनसाठी सध्या शिरोधारा जास्त प्रचलित आहे. यासाठी रोगानुसार तेल, तूप, दूध, ताक, कांजी, उसाचा रस अशी वेगवेगळी औषधे वापरली जातात.
शिरोधारा विधी
* शिरोधारा शक्यतो सकाळी ७-१० मध्ये केली जाते.
* रुग्णाला शिरोधारा करण्यासाठीच्या विशेष टेबलवर झोपवले जाते.
* रुग्णाच्या डोळ्यावर गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या पट्टय़ा ठेवल्या जातात.
* कपाळ किंचित मागच्या बाजूला तिरके करून झोपवले जाते.
* कपाळापासून ४ बोटे वर शिरोधारा पात्र ठेवले जाते.
* शिरोधारा करताना शांत संगीत रुग्णाला ऐकवले जाते.
* औषध कोमट करून ते पात्रात ओतले जाते.
* धारा संपूर्ण कपाळावर सोडली जाते. शक्यतो एका जागी स्थिर न ठेवता लंबगोल अशी फिरवली जाते.
* रोग व प्रकृतीनुसार ३० मिनिटे ते १ तास ही क्रिया केली जाते.
* खाली जमा झालेले तेल पुन्हा गरम करून वापरले जाते.
* शिरोधारा झाल्यानंतर टिश्यू पेपर किंवा टॉवेलने तेल व्यवस्थित पुसून घेतले जाते.
शिरोधारा करताना घ्यावयाची काळजी –
* कानात कापसाचे बोळे, डोक्याला टोपी, नाकाला रुमाल बांधून मग घरी जावे.
* केस धुवायला आवळ्याचा काढा वापरावा आणि नंतर केस कोरडे ठेवण्याची खबरदारी घ्यावी.
* शिरोधारेनंतर प्रसन्न मनाने विश्रांती घ्यावी.
* जिभेवर ताबा ठेवावा व पथ्यकर भोजन करावे.
शिरोधारेचे उपयोग
* तैल धारा- केसांचे आजार, निद्रानाश, डोकेदुखी, वाताचे विकार, मानसिक ताणतणाव, भीती, उदासीनता या विकारांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त
* तक्रधारा- औषधी काढा करून त्यामध्ये औषधी सिद्ध ताक मिसळून त्याने डोक्यावर धार धरली जाते. केस पांढरे होणे, शिर:शूल, कर्णरोग, डोक्यात होणारा कोंडा, त्वचाविकार या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:10 am