20 November 2019

News Flash

व्हिंटेज वॉर : बेंझची मोटार

आलिशान आणि दर्जेदार गाडय़ांची निर्मिती करणारी मोटार क्षेत्रात प्रतिष्ठित असणारे मर्सिडीज बेंझ.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

आलिशान आणि दर्जेदार गाडय़ांची निर्मिती करणारी मोटार क्षेत्रात प्रतिष्ठित असणारे मर्सिडीज बेंझ. यातील बेंझ नाव आपल्याला काहीसे अपरिचित, हे बेंझ नाव कुणाचे केवळ मर्सिडीजसह संयुक्तरीत्या गाडय़ांची निर्मिती करणे केवळ एवढेच बेन्झची ओळख नाही. कार्ल बेंझ हे एक नामवंत इंजिन डिझायनर आणि ऑटोमोबाइल इंजिनीअर होते. १८८५ मधील त्यांची बेंझ पेटंट मोटरकार ही जगातील पहिली प्रवासयोग्य यांत्रिकगाडी समजली जाते. या गाडीसाठी त्यांना २९ जानेवारी १८८६ मध्ये त्यांना या गाडीचे पेटंट मिळाले. बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीच्या कार्ल्सरूह येथे झाला. कार्ल यांचे वडील रेल्वे इंजिनीअर होते. कार्ल हे दोन वर्षांचे असताना त्यांचे न्यूमोनियाने निधन झाले. म्हणूनच लहान वयातच कार्ल यांच्यावर घराची जबाबदारी पडली. लहानपणापासूनच कार्ल यांना तंत्रज्ञान आणि यंत्रांचे आकर्षण होते. याच कौशल्याचा वापर करून ते पैसे कमावू लागले. सुरुवातीला ते घडय़ाळ दुरुस्त करुन कमाई करु लागले. नंतर ब्लॅक फॉरेस्ट या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांची छायाचित्रे डेव्हलप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डार्करूमची निर्मिती त्यांनी केली.  कार्ल्सरूह तंत्रविद्यनिकेतनात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि इंजिन उत्पादन करणाऱ्या कारखान्यात कामला लागले. इंजिनबद्दल, त्याच्या कार्याबद्दल अधिकाधिक माहिती शिकण्यास ते नेहमी उत्सुक असत. घोडय़ाशिवाय चालणारी स्वयंचलित गाडी तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. १८७२ पर्यंत त्यांनी त्यांचे स्वत:चे इंजिनचे वर्कशॉप सुरू करण्याचे ठरवले. बिझनेस सुरू करण्यापूर्वी त्यांनी बर्टा रिंगेर यांच्याशी लग्न केले.

बेंझ यांचा व्यवसाय यशस्वी झाला आणि गुंतवणूकदार मिळाल्यावर त्यांनी मॅनहाइम गॅस इंजिन उत्पादक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी यशस्वी झाली. परंतु घोडय़ाशिवाय चालणारी यांत्रिक गाडी बनण्याच्या बेंझ यांच्या कल्पनेवर कंपनीचा नफा ‘उधळण्या’साठी इतर गुंतवणूकदार तयार नव्हते. त्यामुळे काही महिन्यांतच त्यांनी ती कंपनी सोडून दिली. त्यानंतर पुन्हा गुंतवणूकदार मिळवून त्यांनी ऑक्टोबर १८८३ मध्ये बेंझ अँड कंपनीची स्थापना केली. ही कंपनी स्टेशनरी गॅस इंजिनची निर्मिती करीत होती, तर या कंपनीचे गुंतवणूकदार कार्ल यांच्या यांत्रिक गाडी निर्माण करण्याच्या स्वप्नाच्या पाठीशी होते. मात्र कंपनीचे त्याच्या मूळ उत्पादनाकडे दुर्लक्ष होऊ  नये अशी त्यांची अट होती.

दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर कार्ल यांचे यांत्रिक गाडीचे स्वप्न सत्यात उतरले आणि यंत्राने चालणारी तीनचाकी गाडी त्यांनी तयार केली. यात पेट्रोलचा इंधन म्हणून वापर करणारे इंजिन होते. तोपर्यंत केवळ वाफेच्या इंजिनावर चालणारी स्वयंचलित वाहने वापरण्यात येत होती, पण अंतर्गत ज्वलन इंजिनचा वापर एक मोठी उपलब्धी होती. यामुळे वाहन हलके, अधिक कार्यक्षम झाले. या गुणांमुळे ही गाडी ग्राहकांना आकर्षित करणार होती. या कारणांसाठीच बेंझ यांच्या १८८५ च्या मोटार असलेल्या तीनचाकीला पहिली मोटार मानले जाते. जेव्हा बेंझ यांनी त्यांच्या पत्नीसह लोकांसमोर गाडी प्रवासासाठी रस्त्यावर आणली तेव्हा त्याचा छोटा अपघात झाला. यातून कार्ल आणि त्यांच्या पत्नी दोघेही सुखरूप बचावले. यानंतर त्यांनी गाडीच्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले. गाडीला दुसरा गिअर बसवण्यात आला. मोठे तीन हॉर्सपॉवरचे इंजिन लावले. ब्रेकच्या यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या. पॅरिस एक्झिबिशनमध्ये झळकल्यानंतर १८८७ मध्ये बेंझ यांच्या गाडीची विक्री सुरू झाली. १८८८च्या म्युनिक इंपिरियल एक्झिबिशनमध्ये त्यांना या शोधासाठी सुवर्णपदक मिळाले. या सन्मानामुळे गाडीच्या ऑर्डरमध्ये भर पडली. त्या वेळी ही यांत्रिक गाडी केवळ धनाढय़ांना परवडणारी होती. तरीही बेंझ यांची कंपनी चांगली प्रगती करू लागली. गाडीतील कामगारांची संख्या वाढली आणि १८८९ पर्यंत ते मोठय़ा कारखान्यात स्थलांतरित झाले, जेथे १८९० मध्ये चारचाकी गाडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली.

(पूर्वार्ध)

First Published on June 15, 2019 12:10 am

Web Title: article on benz motor
Just Now!
X