News Flash

स्तनपानाविषयी जनजागृती गरजेची

चारूशीला कुलकर्णी पहिल्या काही तासांमध्ये बाळाला स्तनपान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वारंवार अधोरेखित केले जात असूनही सध्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यासाठी विशेष प्रयत्न होताना मात्र फारसे

चारूशीला कुलकर्णी

पहिल्या काही तासांमध्ये बाळाला स्तनपान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वारंवार अधोरेखित केले जात असूनही सध्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये त्यासाठी विशेष प्रयत्न होताना मात्र फारसे दिसत नाहीत. नवजात बालकाला स्तनपान का, कसे आणि केव्हा करावे याबाबत मातांच्या मनामध्ये असणारे संभ्रम, शंकाकुशंकांचे निरसन करण्याची व्यवस्था काही मोजकी रुग्णालये वगळता अन्य ठिकाणी उपलब्ध नाही. स्तनपानाविषयीची चळवळ उभारण्याची गरज आहे.

वैवाहिक आयुष्याची नवी नवलाई संपली की अनेकांकडून ‘गुड न्यूज’ कधी अशी विचारणा होते. ठरल्या प्रमाणे किंवा अवचित संसारवेलीवर फूल उमलले की मग डॉक्टरांकडच्या फेऱ्या सुरू होतात. दरवेळेस होणाऱ्या आईला बाळाच्या वाढीसंदर्भात माहिती दिली जाते. त्याप्रमाणे काही काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात.  फार झालं तर नैसर्गिक प्रसूतीसाठी व्यायाम, योगा किंवा अन्य काही थेरपींचा उपयोग होतो का, याविषयी चर्चा होत असते. परंतु प्रसूतीनंतरचा सर्वात महत्त्वाचा क्षण ‘स्तनपान’ याबाबत मात्र तिला कोणीच काही सांगत आहे. बाळाला जवळ घेतलं की बाळ आपोआपच दूध प्यायला लागतं अशा भ्रमात मग तीही राहते. जेव्हा खऱ्या परीक्षेची वेळ येते तेव्हा मात्र तिची चांगलीच भंबेरी उडते. बाळाला घ्यायचं कसं, धरायचं कसं यांसारखे अनेक प्रश्न तर तिच्यासमोर असतातच. बाळ जेव्हा स्तन तोंडातही धरायला तयार होत नाही. मग नाईलाजाने त्याला वरचे दूध द्यावे लागते. त्यावेळी मग ती अगदीच हिरमुसली होते. आपल्याला दूध पाजताच येत नाही का असा अपराधीपणा तिचे मन खायला लागतो. परिणामी दूध येण्यावरही याचा परिणाम होतो आणि यातील गुंतागुंत अधिकच वाढत जाते.

बाळ जन्मानंतर ‘आनंदी आनंद गडे..’ स्थिती असली पहिल्या तासात स्तनपानाला सहजपणे बाजूला सारले जाते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. याविषयी सोनाली बागड म्हणाली, माझे सिझेरीयन झाले त्यामुळे पहिले काही तास मी बेशुद्ध अवस्थेत होते. त्यामुळे बाळाला दूध पाजता आले नाही. शुद्धीत आल्यानंतर सिझेरीयनमुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने बाळाला घेणं मी टाळलं. परिणामी दुसऱ्या दिवशी छातीत जडपणा जाणवला. बाळाला पुरेस दूध न मिळाल्याने आणि वातावरणातील बदलामुळे कावीळ झाल्याचे सांगत काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. तर मंजुश्री साठे सांगते, माझी नैसर्गिक प्रसूती असली तरी कळांच्या असह्य़ वेदनांनी मला त्रास झाला. यामुळे मी अर्धवट शुद्धीत होती. बाळाला पहिल्या तासात मला बघताही आलं नाही, जवळ घेता आलं नाही. आजी किंवा अन्य मंडळी बाळाला जवळ आणण्याचा प्रयत्न करत होते. पण डॉक्टरांनी त्यांना सुनावल्याने बाळाला पावडरचं दूध पाजलं. प्रसूतीनंतर स्तनपानाविषयी फारसे गांभीर्य नसल्याने महिलांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपा जोशी यांनी नवजात शिशूला पहिल्या तासात स्तनपान झाले तर त्याची बौद्धिक-भावनिक वाढ होण्यास मदत होते हा मुद्दा मांडला.

बाळ व आई यांच्यात एक बंध निर्माण होतो. बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. बाळाला स्तनपानामुळे आईच्या स्तनग्रातून दूध मिळवण्यासाठी हालचाल करावी लागते. ही हालचाल त्याच्या मेंदूला चालना देते. शिवाय अन्य शारीरिक हालचालींनाही प्रोत्साहन देते. दुसरीकडे, बाळ स्तनपान करत असल्याने बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव थांबण्यास, गर्भाशयाची पिशवी आकुंचन होण्यास मदत होते. आपल्याकडे ग्रामीण भागात पहिल्या काही तासात स्तनपान होत असले तरी बाळ झाल्यावर त्याला मध चाटवणे किंवा अन्य काही अंधश्रद्धेचा पगडा आहे. दुसरीकडे, उच्चभ्रू समाजात स्तनपान केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होईल, शरीर स्थूल होईल किंवा अन्य असे काही गैरसमज असल्याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले.

डॉ. सुधीर येरमाळकर यांच्या मते पहिल्या तासातील बाळाला मिळणारं दूध त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ठरते. बाळासाठी आईचे दूध महत्त्वाचे असून यामुळे कुठलाही जंतुसंसर्ग होत नाही. बाळाच्या आईसह कुटुंबाला पहिल्या हजार दिवसातील आहाराविषयी माहिती होणं गरजेचे आहे असे डॉ. येरमाळकर सांगतात.

सुरुवातीच्या चीक दुधाचे महत्त्व

* रोगप्रतिकारक शक्ती असल्याने जंतूपासून बचाव होतो. बाळाला पहिली शी (मेकॉनियम) होण्यास मदत होते. त्यामुळे कावीळ वाढण्याचा धोका कमी होतो.

* भरपूर दूध येत नसले तरी सुरुवातीच्या चीक दुधाने बाळाचे पोट भरते

सिझेरियन झालेल्या मातेसाठी

* सिझेरियन झाल्यानंतर लगेचच परिचारिका किंवा नातेवाईकांच्या मदतीने स्तनपान करणे शक्य.

* बाळाची साखर नियंत्रित राहण्यासाठी पावडरच्या दुधाऐवजी दिवसातून किमान दहा वेळा स्तनपान करणे उत्तम.

हिरकणी कक्ष, मिल्क बँककडे दुर्लक्ष

महिलांना सार्वजनिक ठिकाणीही स्तनपान करता यावे, कामाच्या ठिकाणी तशी व्यवस्था व्हावी यासाठी शासनदेखील प्रयत्नशील असल्याचा दावा केला जातो. मात्र, वास्तवात विपरीत स्थिती लक्षात येते. सार्वजनिक ठिकाणी क्वचित शोधून सापडणारे हिरकणी कक्ष बंद असतात. जिथे ते सुरू आहेत, तिथे त्यांची दयनीय अवस्था आहे. कामाचे ठिकाण खासगी असो वा सरकारी असो, मातेसाठी तशी व्यवस्था नाही. यावर पर्याय म्हणून मिल्क बँक महत्त्वाची भूमिका निभावू शकते. राज्यात मुंबई वगळता दोन ठिकाणी ही व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी प्रशासकीय अनास्था आणि वैद्यकीय वर्तुळात त्याविषयी अनभिज्ञता असल्याने मिल्क बँकचा पर्याय अंधातरी आहे. त्याचा माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांना निरनिराळ्या व्याधींना तोंड द्यावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2019 1:55 am

Web Title: article on breastfeeding awareness zws 70
Next Stories
1 राहा फिट : संगीत, आनंद आणि आरोग्य
2 काळजी उतारवयातली : ज्येष्ठांचे लसीकरण
3 योगस्नेह : नाडी शोधन प्राणायाम
Just Now!
X