07 March 2021

News Flash

काळजी उतारवयातली : कर्करोग : लक्षणे व प्रतिबंध

कर्करोग हा एक गंभीर विकार आहे आणि यामध्ये रोगाच्या सुरुवातीला रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नीलम रेडकर

कर्करोग हा एक गंभीर विकार आहे आणि यामध्ये रोगाच्या सुरुवातीला रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर प्रभावी उपचारांद्वारे त्यावर मात करता येते. प्राथमिक प्रतिबंध, लवकर निदान उपचार आणि पुनर्वसन हे कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील मुख्य घटक आहेत. या लेखात आपण कर्करोगाची लक्षणे आणि प्राथमिक प्रतिबंध याबाबत जाणून घेऊ या.

लक्षणे

थकवा : हे लक्षण प्रामुख्याने रक्ताचा, पोटाचा किंवा मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग यामध्ये दिसून येते. कर्करोगामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते आणि थकवा जाणवतो. भरपूर झोप घेतल्यानंतर आणि मनसोक्त आराम केल्यानंतरही थकवा जात नसेल, तर दुर्लक्ष करू नका.

वजन कमी होणे : वजन लक्षणीय कमी होणे, हे लक्षण पचनेंद्रियासंबंधित अवयवांच्या कर्करोगात आढळते.

फोड किंवा गाठ : शरीरातील कुठल्याही भागात आलेली गाठ किंवा फोड बरी होत नसल्यास दुर्लक्ष करू नका.

असाधारण किंवा अनियंत्रित रक्तस्राव : रक्ताची उलटी होणे, हे जठर, यकृत या अवयवांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. शौचातून रक्त पडणे हा मोठय़ा आतडय़ांच्या कर्करोगाचा संकेत असू शकतो. खोकल्यातून रक्त पडणे, हे फुप्फुसांच्या कर्करोगाचे आणि लघवीतून रक्तस्राव हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

स्तनांतील बदल : स्तनांचा बदललेला आकार, गाठ, स्तनांवरील एखादा भाग आजुबाजूच्या उतींपेक्षा कठीण होणे ही स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

मासिक पाळीच्या समस्या : उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव होणे, असह्य़ पोटदुखी, कंबरदुखी ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.

सततचा खोकला : सर्दी-खोकला होणे ही सामान्य बाब आहे. मात्र, हा त्रास खूप काळ होणे, त्याबरोबर आवाजात बदल, दम लागणे, अन्न गिळताना त्रास होणे ही लक्षणे असतील, तर गळ्याच्या कर्करोगाचा किंवा फुप्फुसांच्या कर्करोगाचा संभव असतो.

लघवी करताना त्रास होणे : वाढत्या वयानुसार लघवीला सारखे जाणे, नकळत लघवी होणे हे त्रास प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

बद्धकोष्ठता किंवा शौचाच्या सवयीतील बदल : हा मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचा संकेत असू शकतो.

त्वचेवर ठिपके किंवा त्वचेचा रंग बदलणे : त्वचेचा रंग बदलणे, अस्तित्वात असलेल्या तिळाच्या आकारात वाढ होणे, ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्राथमिक प्रतिबंध

* धूम्रपान, तंबाखू, गुटखा व मद्यपान या व्यसनांपासून दूर राहा.

*  उतारवयात कर्करोगाचा धोका वाढत जातो म्हणूनच कर्करोगाची पडताणी करण्यासाठी असणाऱ्या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे करा. चाळिशीनंतर स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी दरवर्षी मॅमोग्राफीचा तपास करणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान लवकर करण्यासाठी पॅप स्मिअरची तपासणी नियमितपणे करू शकता.

*  अतिनील किरणोत्सारांमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी १० ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळा. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करा. नियमितपणे सनस्क्रिनचा वापर करा.

लसीकरण

‘हेपाटायटिस बी’मुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या विषाणूंचा संसर्ग होऊ नये यााठी लसीकरण करणे आवश्यक आहे. ह्य़ूमन पॅपिलोमाच्या विषाणूंमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्याचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे.

गर्भधारणा न होण्यासाठी उपलब्ध असलेल्या गोळय़ांचा वापर वयाच्या ३५ वर्षांनंतर टाळा. रजोनिवृत्ती काळात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेत असलेल्या स्त्रियांना संभाव्य धोक्याची आणि लाभांची माहिती असणे आवश्यक आहे. या हार्मोनमुळे स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग तसेच रक्तगुठळीचा धोकाही वाढतो.

रेझर आणि सुयांचा सहवापर टाळा. असुरक्षित संभोग टाळा. या कारणांमुळे हेपटायटिस बी, हेपटायटिस सी आणि एचआयव्ही या विषाणूंचा संसर्ग होऊन त्यांच्यामुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका वाढतो.

स्तनपान करण्यामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

मुलींचे लग्न कमी वयात करणे टाळा. कारण दीर्घकाळ असलेल्या जंतुसंसर्गामुळे व गर्भाशयातील घावामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:21 am

Web Title: article on cancer symptoms and prevention
Next Stories
1 सर्वगुणसंपन्न
2 नवं काय? : पेट्रोल इंजिनमधील फ्युएल इंजेक्शन सिस्टीम
3 जुन्नरचे कातळसौंदर्य
Just Now!
X