मे महिन्यातील उन्हाचा तडाखा वाढला आहे. घराबाहेर पडल्यावर सूर्य आग ओकत असताना फिरून घामाघूम होऊन गाडीत बसल्यावर थंडगार वारा देणारा एसी म्हणजे एखाद्या वरदानासदृश वाटतो. वाढता पारा जसा तुम्हाला तापदायक ठरतो. तसात तुमच्या गाडीसाठी धोकादायक ठरू शकतो. उन्हाळ्यात तुमच्या गाडीतील वातानुकूलित यंत्रणेचा देखील कस लागतो. म्हणूनच उन्हाळ्यात तुमची काळजी घेणाऱ्या वातानुकूलित यंत्रणेची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या ठरतात.

काही काळ गाडी उन्हात उभी केली तरीही गाडीतील तापमान वाढते. गाडीत बसल्यावर गाडीतील हवादेखील गरम असल्याचे जाणवते. अशा वेळी गाडीतील वातानुकूलन यंत्रणा दिलासादायक ठरते. रणरणत्या उन्हातदेखील थंडगार वारा देणारी ही गाडीतील वातानुकूलित यंत्रणा केवळ प्रवास सुखाचा करण्यासाठी नाही तर सुरक्षित ठेवण्यासाठीदेखील महत्त्वाची ठरते. गाडीतील वातानुकूलित यंत्रणा एकेकाळी केवळ चैनीची गोष्ट मानली जायची मात्र आता गाडीत वातानुकूलन यंत्रणा असणे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे.

उन्हाळ्यात गाडीतील वातानुकूलित यंत्रणेवर सर्वाधिक ताण येतो. उन्हाळा म्हणजे सुट्टीचा मौसम. शाळा, महाविद्यालये बंद. या वेळेस कुटुंबासह बाहेर फिरण्यासाठी जाण्याचे बेत आखले जातात. म्हणून उन्हाळ्यात गाडी सव्‍‌र्हिसिंगला देताना वातानुकूलन यंत्रणेची तपासणी करून घ्या. तापमानाचा पारा चढलेला असताना गाडी चालवणे सुस होण्यासाठी आणि गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तत्काळ त्याची दुरुस्ती करून घ्या. गाडीत थंड हवा सोडणे केवळ हेच वातानुकूलन यंत्रणेचे काम नाही. ही यंत्रणा गाडीतील गरम हवा बाहेर टाकते. यासाठी या यंत्रणेतील अनेक घटकांनी एकसंध आणि प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. कालांतराने इव्हॉपरेटर, कम्प्रेसर, कंडेन्सर या वातानुकूलन यंत्रणेच्या भागांवर परिणाम होऊ लागतो. हे भाग जसे जुने होतात त्याप्रमाणे या यंत्रणेच्या कार्यक्षमतेत परिणाम होतो. निमयमित तपासणी केल्याने कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करता येऊ शकते.

ऊन जास्त असल्यास गाडीच्या केबिनचे तापमान ६० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.

वातानुकूलन यंत्रणा ही जटील असते.  ही यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी एव्हॅपोरेटर, ब्लोवर, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, ड्रायर अनेक भाग एकत्रित येऊन काम करतात. त्यामुळे या यंत्रणेत काही बिघाड आल्यास नक्की काय समस्या आहे हे समजणे सामन्यांना अडचणीचे होते.

वातानुकूलन यंत्रणेत अनेक अडचणी येऊ  शकतात. धूळ आणि आद्र्रतेचा या यंत्रणेला सर्वाधिक त्रास होतो. हवेतील धूळ जास्त झाल्यामुळे फिल्टर आणि कंडेन्सरच्या मार्गात अडथळे तयार होतात. यामुळे हवा कूलिंग कॉईलपर्यंत पोहोचत नाही. ब्लोवर किंवा फॅन युनिटमध्येदेखील अशा प्रकारे धूळ साचते.

वातानुकूलन यंत्रणेत दुसरी आढळणारी समस्या म्हणजे रेफ्रिजन्टची गळती. सध्या गाडय़ांमध्ये आर १३४ ए ग्रेड रेफ्रिजन्ट वापरले जाते. या रेफ्रिजन्टचे उकळण्याचे तापमान कमी असते. त्याचप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेच्या विविध भागांतून याची गळती होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे गळती झल्यास ते पुन्हा भरता येऊ  शकते. त्यानंतरचा या यंत्रणेचा महत्त्वाचा आणि दुरुस्तीसाठी महागडा भाग म्हणजे कॉम्प्रेसर. यातील मॅग्नेटिक स्ट्रिप आणि पिस्टनमध्ये कालांतराने बिघाड होऊ  शकतो, त्याचप्रमाणे ऑइल रिंग्समध्ये गळती होऊ  शकते. वातानुकूलन यंत्रणेवर ताण आल्याने या समस्या होतात. वातानुकूलन यंत्रणेच्या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या उद्भवतात. ब्लोवर युनिटमध्ये उंदीर आणि घुशी शिरल्यानेदेखील समस्या निर्माण होतात. त्यामुळे गाडी उभी करताना त्यावर कव्हर टाकणे गरजेचे ठरते.

रिसक्र्युलेशन मोड

गाडी सुरू केल्यावर रिसेक्र्युलेशन मोड बंद करा. सक्र्युलेशन मोड व्हेंटिलेशनद्वारे गरम हवा बाहेर सोडते. केबिनमधील हवा थंड झाल्यावर रिसक्र्युलेशन मोड सुरू करा. यामुळे केबिनमधील थंड हवा खेळती राहील. त्याचप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेवर ताण येणार नाही.

नियमित तपासणी

नियमित तपासणीमुळे गाडीची वातानुकूलन यंत्रणा सुरळीत चालू राहते. एसीच्या कार्यक्षमतेत काही बदल जाणवल्यास वातानुकूलन यंत्रणेची कॉम्प्रेसर प्रणाली तपासून घ्या.

क्लायमेट कंट्रोल

जर तुमच्या गाडीत ऑटो एसी किंवा क्लायमेट कंट्रोल असेल तर गाडीतील एसी कमी तीव्रतेवर सुरू करा. यामुळे केबिनचे तापमान पटकन कमी होईल. काही वेळाने तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे वातानुकूलन यंत्रणेचे तापमान ठरवू शकता.

वातानुकूलन यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी

ऊन जास्त असल्यास गाडीच्या केबिनचे तापमान वाढते. त्यामुळे गाडीत बसल्यावर खिडक्या उघडून केबिनमधील गरम हवा बाहेर पडू द्या. वातानुकूलन यंत्रणा केबिनमधील गरम हवा बाहेर सोडते, थोडा वेळ खिडकी उघडी ठेवल्याने गरम हवा केबिनबाहेर सोडली जाते यामुळे गाडीच्या वातानुकूलन यंत्रणेवर अधिक ताण येत नाही.