शाळांची सुट्टी तर सुरू झाली असेलच. खेळणी पुस्तकांचा घरभर पसारा होऊ लागला असेल आणि तो आवरताना नाकी नऊ येत असतील. या पसाऱ्याला थोडी मर्यादा घालण्यासाठी मुलांना छोटेखानी खेळघर तयार करून दिलं तर?

पुठ्ठय़ाचा एक मोठा खोका घ्या. त्याची वरची आणि समोरची बाजू कापून वेगळी करा. वरची बाजू झाकणाची असल्यामुळे तिचे दोन भाग होतील. ते सेलोटेपच्या साहय्याने जोडून छताचा आकार द्या. हे छत खालच्या खोक्याला जोडले की घराचा आकार येईल. रंगीत कार्डपेपरच्या साहाय्याने पुठ्ठय़ाच्या सर्व बाजू झाकून टाका. धारदार ब्लेड असेल आणि थोडं कौशल्य असेल तर खिडक्याही तयार करता येतील. खालील भागात छोटी गादी किंवा चादर अंथरली की झाले खेळघर तयार. या घरात मुलांचा बराच वेळ जाईल आणि साहजिकच पसाराही मर्यादित राहील.