थंडीच्या दिवसांत राजस्थानातील वाळवंटी प्रदेश वेगळ्याच उत्साहात फुलून जातो. जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे तर खास पर्यटन उत्सवांचे दिवस. जानेवारीच्या अखेरीस ३० ते २ फेब्रुवारीला नागौर तर ७ ते ९ फेब्रुवारीला डेझर्ट फेस्टिव्हल होणार आहे.

नागौर फेस्टिव्हल म्हणजे येथील पारंपरिक जत्रा. मुख्यत: जनावरांचा बाजार हा तिचा उद्देश. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची जत्रा म्हणून ओळखली जाते. तब्बल ७० हजार जनावरांचा व्यापार येथे होतो. बैल, घोडे, उंट यांचा समावेश असतो. त्याच जोडीला देशातील सर्वात मोठा मिरची बाजारदेखील भरतो. त्याशिवाय उंटाच्या शर्यती, पारंपरिक बोलक्या बाहुल्या वगैरे आहेतच.

ही जत्रा संपली की जेसलमेरच्या वाळवंटात उत्साह दिसू लागतो तो डेझर्ट फेस्टिव्हलसाठी. राजस्थान पर्यटन महामंडळामार्फत या उत्सवाचे आयोजन केले जाते. स्थानिक कलाकृती, कलाकार आणि पारंपरिक कला यांना वाव देणारा हा तीन दिवसांचा उत्सव. उंटाच्या शर्यती, कॅमल पोलो, उंटावरील वाद्यवृंद, पारंपरिक मिरवणूक असा भरगच्च कार्यक्रम असतो.