राजेंद्र श्रीकृष्ण भट

गॅलरीतील कुंडय़ामधून घेता येणाऱ्या शेंगभाज्यांपैकी श्रावणघेवडा या प्रकाराची माहिती आज घेऊ. कमी पावसाच्या प्रदेशात हिवाळ्यात ही झाडे चांगली वाढतात. ही वनस्पती मुख्यत मोठय़ा रात्रीच्या ऋतूतील म्हणजे कमी तीव्रतेच्या प्रकाशाच्या कालावधीतील असल्याने हिवाळ्यात चांगली वाढत नाही. वेल आणि झुडुप अशा दोन्ही प्रकारांत ही वनस्पती होते. पूर्वी ही भाजी श्रावणात मिळायची म्हणून तिला श्रावणघेवडा हे नाव पडले. आधीच्या जाती चपटय़ा शेंगेच्या होत्या. या शेंगा भाजीसाठी वापरत. जून झाल्यावर ओल्या बियांची उसळ केली जात असे. शेंगा पूर्ण सुकल्यावर त्यातील बियांचा राजमा म्हणून वापर केला जात असे. साधारण ७०-८० दिवसांत या वनस्पतीचे आयुष्य संपते. काही प्रकारांत मुळांवर रायझोबियमच्या गाठी असून त्यात नत्र असते. त्यामुळे कुंडीतील मातीचा पोत सुधारतो.

बाजारात स्थानिक, संशोधित, संकरित  असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्थानिक आणि संशोधिक प्रजाती बहुतेककरून चपटय़ा शेंगेच्या असतात. याच्या बियांचे अनेक रंग आढळतात. प्रदेशानुसार वेगवेगळे प्रकारही आढळतात. शेंगांचे तोडे कमी असतात. ४०-५०व्या दिवशी शेंगा येण्यास सुरुवात होते. शेंगा तीन-चारच्या झुबक्यात येतात. एकूण पाच-सहा तोडे होतात.

वाण्याच्या दुकानातील राजमा आणूनसुद्धा आपण याची लागवड करू शकतो. स्थानिक कृषिकेंद्रांतून बियाणे विकत घेता येते. या पिकावर येणारा मुख्य रोग म्हणजे भुरी. पानांवर पांढरट बुरशी वाढते. पाणी योग्य प्रमाणात दिल्यास हा रोग होत नाही. गोमूत्र, हळद, हिंग, शेवग्याच्या पानांची चटणी, यापैकी काहीही पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणारी अळी आढळते. ती चिमटय़ाने काढावी. गोमूत्राचे सौम्य द्रावण फवारल्यामुळे झाडाला अन्न मिळते आणि कीड व रोग नियंत्रणात राहतात.