डॉ. सौरभ पाटणकर

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

भारतात दरडोई डिटर्जंटचा वापर २.७ किलोग्रॅम प्रति वर्ष इतका आहे. हा आकडा जगातील विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. उदा. अमेरिकेचा दरडोई डिटर्जंटचा वापर १० किलोग्रॅम इतका आहे. परंतु भारताची १.३ अब्ज लोकसंख्या लक्षात घेता २.७ किलो दरडोई वापर हादेखील आपल्या नद्या, नाले आणि किनारपट्टीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.

मागील भागात नमूद केल्याप्रमाणे डिटर्जंट अथवा स्टेन रिमूव्हर चिवट डाग कापडावरून तर काढतात, पण पाण्याबरोबर नाल्यांमध्ये व पुढे नदीत आणि समुद्रात समाविष्ट होतात. पाण्यातील सूक्ष्म जीव पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनच्या मदतीने पारंपरिक डिटर्जंट किंवा साबणाचे विघटन निरुपद्रवी कार्बन डायऑक्साइड, काबरेनेट, बायकाबरेनेट आणि पाणी यात करू शकतात. परंतु सिंथेटिक डिटर्जंटमध्ये फॉस्फेट, कॅल्शिअम किंवा मॅग्नेशिअमचा वापर बिल्डिंग ब्लॉक म्हणून करण्यात येतो ज्याचे विघटन करणे सूक्ष्म जीवांना शक्य होत नाही आणि डिटर्जंटचे रेणू पाण्यात अडकून राहतात. हे अविघटित डिटर्जंटचे रेणू शेवाळ्याच्या वाढीसाठी उत्तम खत ठरतात आणि जलाशयावर बघता बघता शेवाळे आणि जलपर्णीचे साम्राज्य उभे राहते. जलाशयात वाढणाऱ्या या वनस्पतींमुळे पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा जलीय प्राण्यांसाठी अपुरी पडते आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. या प्रकाराला युट्रोफिकेशन (Eutrophication) असे म्हणतात आणि असे होणे जैवविविधतेसाठी अपायकारक ठरते.

याशिवाय डिटर्जंटचे रेणू अँपिफिलिक, म्हणजे त्यांच्यावर ध्रुवीय आणि अध्रुवीय असे दोन्ही भाग असल्याने, पाण्यात गेल्यावर ध्रुवीय पाणी माशांच्या अध्रुवीय शरीरावरील थरांमध्ये म्हणजेच इंटरफेसवर ते स्थिरावतात. माशांसाठी ते हानिकारक ठरते कारण माशांच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त असणाऱ्या ‘गिल्स’च्या कार्यप्रणालीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. शिवाय पाण्याचे सर्फेस टेन्शन डिटर्जंट मिसळल्याने कमी होते, ज्याचा जलीय प्राण्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. डिटर्जंटचे पाण्यातील प्रमाण १५ पी पी एम म्हणजे १५ मिलिग्रॅम प्रति लिटर इतके झाले तरी ते माशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते.

डिटर्जंटचा वापर दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे पण त्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणावर काय उपाय करता येईल? पारंपरिक डिटर्जंटचा वापर करणे खरेच फायद्याचे ठरेल का? पारंपरिक डिटर्जंट जसे रिठा, लिंबू, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर हे माणसाच्या अन्नसाखळीशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांची प्रति ग्रॅम किंमत ही सिंथेटिक डिटर्जंटइतकी कमी होऊ  शकत नाही. याशिवाय डिटर्जंटचा अपेक्षित प्रभाव मिळण्यासाठी पारंपरिक डिटर्जंटचा जास्त वापर करावा लागतो. डिटर्जंटचा वापर हा स्वच्छतेशी निगडित असल्यामुळे कमी पैशात त्याची मुबलक उपलब्धता असणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून पारंपरिक डिटर्जंट पयावरणस्नेही असूनही ते वास्तविकरीत्या माणसाला लाभदायक नाहीत. अशा परिस्थितीत पर्यावरणस्नेही डिटर्जंट जैविक वनस्पतिजन्य पदार्थापासून मिळणाऱ्या कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनविणे शक्य आहे. या डिटर्जंटमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंच्या संरचनेतून सरफॅक्टंट इफेक्ट (रेणूमध्ये समांतर ध्रुवीय आणि अध्रुवीय केंद्रे स्थापन करणे) साधला जातो. अशा पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या डिटर्जंटमध्ये इनऑर्गेनिक (अकार्बनी) अणूंचा वापर होत नसल्याने हे डिटर्जंटचे रेणू पाण्यातील सूक्ष्म जीव विघटित करू शकतात. अशा जैवविघटनशील (Bio degradable) डिटर्जंटची निर्मिती करण्याचे प्रयत्न सध्या जगात चालू आहेत. लवकरच अशी डिटर्जंट घरोघरी पोहोचतील. तोपर्यंत सिंथेटिक डिटर्जंटचा काटकसरी आणि काळजीपूर्वक वापर करणे आपल्या सर्वाचीच जबाबदारी आहे.