News Flash

परीकथेतल्या देशात

खास पर्यटकांना भटकण्यासाठी एक विशेष रेल्वेसदृश असे वाहन देशाची राजधानी वडूज येथे उपलब्ध असते.

युरोप भटकंती आता नवीन राहिलेली नाही. युरोपच्या भटकंतीत नेहमीची भव्यदिव्य ठिकाणे तर असतातच, पण त्याच वेळी एखादे अगदी छोटसे ठिकाणदेखील खूप आनंद देऊन जाणारे असते. युरोपातला असाच एक देश म्हणजे लॅन्चेस्टाईन. हा देश किती छोटा, तर अगदी १८० चौरस किलोमीटर इतकाच. म्हणजे आपल्याकडच्या एखाद्या तालुक्याइतकेच त्याचे क्षेत्रफळ. ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी आणि स्वित्र्झलड या देशांनी चारही बाजूंनी वेढलेला हा देश म्हणजे युरोप सफरीतले एक नितांतसुंदर विश्रांतीस्थळ म्हणता येईल.

लॅन्चेस्टाईनची लोकसंख्या आहे केवळ ३२ हजार. पण येथील सर्व प्रजा अतिश्रीमंत वर्गात मोडणारी आहे. पर्यटन हे उत्पन्नाचे मुख्य साधन तर आहेच, पण त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, मोटारींचे सुटे भाग इत्यादींच्या निर्यातीने देशाची अर्थव्यवस्था सांभाळली आहे. बऱ्याच प्रमाणात हा देश स्वित्र्झलडवर अवलंबून आहे. गरिबी हा प्रकारच नाही. हा देश पाहायला जायचे ते तेथील अमाप निसर्गसौंदर्यासाठी. आल्प्सच्या पायथ्याशी विसावलेला हा देश म्हणजे जणूकाही परीकथेतलाच देश असावा असा आहे. परीकथेतील वर्णनासारखी टुमदार घरे, शेती, भरपूर गोधन असा हा समृद्ध प्रदेश.

खास पर्यटकांना भटकण्यासाठी एक विशेष रेल्वेसदृश असे वाहन देशाची राजधानी वडूज येथे उपलब्ध असते. पर्यटकांसाठी आखलेल्या ठरावीक मार्गाने हे वाहन तासाभराची सफर घडवून आणते. या सफरीतून देशाच्या विविध भागांत भटकून तर होतेच पण तेथील निसर्गसौंदर्याची चांगली ओळख होते. येथे मुख्यत: यायचे ते तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी. एक-दोन दिवस वास्तव्याच्या सोयीदेखील आहेत. हॉटेल्स महागडी आहेत. पण काही होम-स्टे आहेत. नुसता आराम करायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे.

युरोपातील इतर शहरांप्रमाणे येथे फार काही भव्यदिव्य वास्तू नाहीत. एक किल्ला आहे. तेथे त्यांचा राजा आजही वास्तव्य करतो. देशात लोकशाही आहे, पण तेथील लोक या राजाचा खूप मान राखतात. राजाला देशाच्या कायदेमंडळात महत्त्वाचे स्थान आहे. या कॅसलचा काही भाग आतून फिरून पाहता येतो. फार आकर्षक नसले तरी त्या देशातील प्राचीन वास्तू म्हणून पाहायला हरकत नाही. वार्षिक उत्सवादरम्यान एक मिरवणूक या कॅसलच्या परिसरात निघते ती पाहण्यासारखी आहे. कॅसल काहीसा उंचावर आहे आणि तेथून आल्प्सचे दृश्य न्याहाळता येते.

हा देश चांगलाच पर्यटकस्नेही आहे. भारतीय पर्यटकांचा येथील वावर लक्षात घेऊन येथील पर्यटन विभागाने काही ठिकाणचे सूचना फलक भारतातील सात प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित केले आहेत. त्यात मराठीदेखील आहे.आपणदेखील असे काही चांगले स्वीकारायला हरकत नाही. स्वित्र्झलडचे चलन येथे वापरले जाते. युरोप सहलीत या देशाची ही भटकंती करण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते, पण तो दिवस सत्कारणी लागतो.

कसं जावं

  • फक्त लॅन्चेस्टाईन पाहण्यासाठी जाणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे स्वित्र्झलड आणि इटलीच्या भटकंतीला जोडून एक दिवसाची टूर येथे करता येते. जर्मनीलादेखील हा देश जवळ असला तरी जर्मनी हे काही नेहमीच्या पर्यटन नकाशावर नसते. त्यामुळे तीन दिवस इटली, तीन दिवस स्वित्र्झलड आणि एक दिवस लॅन्चेस्टाईन असे नियोजन करता येईल. स्वित्र्झलडमधील झुरिक आणि इटलीमधील रोम ही जवळची विमानतळे आहेत. तिकडून रस्तामार्गे वडूज येथे जाता येते. लॅन्चेस्टाईनला स्वत:चे विमानतळ नाही.

केव्हा जावे

  • मे ते सप्टेंबरदरम्यान लॅन्चेस्टाईनला भेट द्यावी. या काळात सकाळी पाचला उजाडते आणि रात्री १०पर्यंत उजेड असतो.

atmaram.ishatour@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:08 am

Web Title: article on europe tour
Next Stories
1 खाद्यवारसा : बटाटय़ाचे भुजणे
2 शहरशेती : गॅलरीतील देखणी फुले
3 सुंदर माझं घर : लाकडी रंगीत फूल
Just Now!
X