13 December 2019

News Flash

फेसअ‍ॅपचे फॅड!

‘फेसअ‍ॅप’ या अ‍ॅपने सध्या तरुणपिढीला असाच अनाठायी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले आहे

(संग्रहित छायाचित्र)

आपण म्हातारपणी कसे दिसू, याची उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. ‘फेसअ‍ॅप’ने मानवाची हीच नाडी ओळखून ‘म्हातारपणी तुम्ही कसे दिसाल?’ हे दाखवणारी सुविधा सुरू केली. ‘फेसअ‍ॅप’ने दाखवल्याप्रमाणेच प्रत्येक जण त्याच्या म्हातारपणी दिसणार नाही, हे अनेकांना माहीत असते. परंतु, तरीही या अ‍ॅपवरून काढलेले फोटो शेअर केले जातात. गंमत म्हणून हे ठीक आहे. मात्र, यामुळे वापरकर्त्यांच्या सुरक्षेशी होणाऱ्या छेडछाडीचे काय?

मानव वर्तमानात जगत असला तरी, त्याच्या मनात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे विचार सातत्याने सुरू असतात. ‘ते दिवस किती चांगले होते’ इथपासून ‘अपना टाइम आयेगा’ या वाक्यांमधून हाच स्वभावगुण झळकत असतो. ते नैसर्गिक आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे, म्हातारपणाची चिंता. म्हातारपणी आपली प्रकृती कशी राहील, आपल्या उदरनिर्वाहाचे साधन काय असेल किंवा म्हातारपणी निवांत वेळ कुठे, कसा घालवता येईल, या विवंचनांतून आपण तारुण्यातच वार्धक्याची बेगमी करत असतो. हे चांगलेही आहे. परंतु, म्हणून कोणी म्हातारपणात ‘डोकावण्याचा’ प्रयत्न करत असेल तर, त्याला काय म्हणायचे?

‘फेसअ‍ॅप’ या अ‍ॅपने सध्या तरुणपिढीला असाच अनाठायी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले आहे. तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल, हे दाखवणाऱ्या या अ‍ॅपची सध्या इतकी चलती आहे की, ते सुरू झाल्यापासून तब्बल ६० कोटी वापरकर्त्यांनी डाऊनलोड करून त्याचा वापर केला आहे. अनेक जण आपल्या ‘म्हातारपणा’ची झलक दाखवणारे फोटो समाजमाध्यमांवरून प्रसारित करत आहेत. यात मोठमोठे सेलिब्रिटीही मागे नाहीत.

‘फेसअ‍ॅप’ काय आहे?

रशियातील वायरलेस लॅब या कंपनीने ‘फेसअ‍ॅप’ तयार केले आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमचे सध्याचे छायाचित्र अपलोड केले की काही क्षणांत त्यावर प्रक्रिया करून हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या म्हातारपणी तुम्ही कसे दिसाल, याचे दर्शन घडवते. या अ‍ॅपमध्ये अनेक पर्याय म्हणजेच फिल्टर्स आहेत आणि त्यातीलच ‘ओल्ड फेस फिल्टर’ लोकप्रिय झाले आहे. याखेरीज तारुण्यातील रूप पाहण्याचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, मेकअप करण्याचे, चेहऱ्यावर क्रूर हास्य दाखवणारे फिल्टरही या अ‍ॅपमध्ये आहे. गुगल प्ले आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप सक्रिय असून आयओएसवर तर हे अ‍ॅप कमालीचे लोकप्रिय झाले आहे. आयफोनवर ५० कोटी वापरकर्त्यांनी या अ‍ॅपचा वापर केल्याचे फोर्ब्सची आकडेवारी सांगते.

तसे पाहायला गेले तर, अशा प्रकारचे असंख्य अ‍ॅप सध्या स्मार्टफोनच्या अ‍ॅप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यातील बहुतांश अ‍ॅप रशियातील संगणक अभियंत्यांनीच विकसित केले आहेत, हे विशेष!

वापरकर्त्यांना धोका

‘फेसअ‍ॅप’ वरकरणी गमतीशीर अ‍ॅप वाटत असले तरी, प्रत्यक्षात त्याद्वारे अनेक वापरकर्त्यांची माहिती फेसअ‍ॅप बनवणाऱ्यांच्या ताब्यात जाऊ लागल्याचे समोर येत आहे. ‘फेसअ‍ॅप’ डाऊनलोड केल्यानंतर ते वापरत असताना वापरकर्त्यांचे नाव, यूजरनेम, छायाचित्र यांसह अनेक तपशील या अ‍ॅपकडून हाताळले जातात. तसेच हे अ‍ॅप सुरू होण्यापूर्वी वापरकर्त्यांच्या फोनमधील फोटो, व्हिडीओ, मेसेज, कॉल यांच्या हाताळणीची परवानगी मागते. ती देताच ते अ‍ॅप वापरकर्त्यांबाबत अधिक माहिती सहज चोरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपच्या ‘अटी व शर्ती’मध्ये वापरकर्त्यांच्या माहितीचा पुनर्वापर करण्याची तसेच त्याची विक्री करण्याची परवानगीही अ‍ॅप मागते. मात्र, या गोष्टीचे गांभीर्य नसल्याने वापरकर्ते सर्रासपणे अ‍ॅपला सर्व परवानग्या देऊन टाकतात. त्यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वापरकर्त्यांच्या खासगीपणाचा भंग झाल्याचे सांगण्यात येते. ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘फेसअ‍ॅप’ बनवणाऱ्या रशियन कंपनीकडे आजघडीला १५ कोटींहून अधिक वापरकर्त्यांची माहिती गोळा झाली आहे.

– प्रा. योगेश अशोक हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on August 8, 2019 12:22 am

Web Title: article on face app social media abn 97
Just Now!
X