06 April 2020

News Flash

देख भाई फेक

साधारणपणे २०११ पासून ‘फेक न्यूज’चा वेगळ्या कारणांसाठी व वेगळ्या पद्धतीने वापर केला जात आहे

| February 12, 2020 01:02 am

देवेश गोंडाणे

‘गणपती दूध पितो’, ही वाऱ्यासारखी देशभर पसरलेली बातमी सगळ्यांनाच आठवत असेल. पण, फेक न्यूजचे हे उदाहरण असले तरी यातून समाजात द्वेष पसरवणे, विरोधी विचारांच्या लोकांना बदनाम करणे असा काही अजेंडा नव्हता. त्यामुळे या फेक न्यूज, अफवा आल्या आणि गेल्या. त्यांच्या केवळ चर्चा होत राहिल्या. मात्र, मागील काही वर्षांपासून ‘फेक न्यूज’चे स्वरूप बदलले आहे. चिंता वाटावी, असे वातावरण तयार झाले आहे.

साधारणपणे २०११ पासून ‘फेक न्यूज’चा वेगळ्या कारणांसाठी व वेगळ्या पद्धतीने वापर केला जात आहे. यात तरुणाई अग्रेसर असून समाजमनावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. हाच धागा पकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाद्वारे विद्यार्थ्यांनी ‘देख भाई फेक’ हे अभियान सुरू केले आहे. याद्वारे समाजाला समाजमाध्यमांद्वारे ‘जे खोटे दाखविले जाते, ते कसे ओळखावे’ त्याबाबत तरुणाईमध्ये जनजागृती केली जाते आहे.

अमक्याने ही अमुकच गोष्ट केल्याने वातावरण तणावपूर्ण आहे, तमक्या ठिकाणी तमक्या समूहाने हल्ला केला, किती दिवस अत्याचार सहन करणार? उठा उत्तर द्या.. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे फेक न्यूजची आहेत. आपल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सामाजिक माध्यमांवर असे अनेक संदेश रोज येत असतात. यांसारख्या काही संदेशांच्या खाली ‘आग की तरह फैला दो’ असे म्हणत हे संदेश पुढे पाठविण्याचे आवाहन केले जाते. भावनेच्या भरात बहुतेक लोक राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या जाणिवेतून असे संदेश पुढे पाठवीत असतात. मात्र, त्यातील कितीजण याची खातरजमा करतात हा प्रश्नच आहे. हल्ली युवा पिढी समाजमाध्यमांचा जास्त वापर करतात, त्यामुळे त्यांना टार्गेट करून त्यांच्यामध्ये समाजाला बदलण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची ताकद निर्माण व्हावी या उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे. अतिशय वेगाने पसरत चाललेल्या खोटय़ा माहिती, व्हिडीओ, फोटोमुळे समाजात अस्थिरता, मतभेद आणि हिंसेचे वातावरण निर्माण होत आहे. त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी विभागप्रमुख डॉ. मोईज हक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू केले आहे. विशेष म्हणजे या अभियानाला प्रा. भीमराव मेश्राम हे सक्रियपणे अनेक महाविद्यालयांमध्ये अभियान राबविण्यासाठी मदत करीत आहेत.

सर्वच स्तरांतून प्रतिसाद

विविध सोशल साइट्सवर ‘देख भाई फेक’ नावाने पेजेस तयार केली आहेत. त्याद्वारेदेखील जागरूक केले जात आहे. समाजमाध्यमांच्या दृष्टीने विचार केला तर, गैरविचारांच्या विरोधात सुविचार व्हायरल केले जात आहेत. एकटय़ा फेसबुकद्वारे जवळजवळ ५००० आणि प्रस्तुतीकरणाद्वारे ६०० विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. या अभियानात जनसंवाद विभागातील विद्यार्थी सक्रिय आहेत. या अभियानांतर्गत समाजातील अराजकता, दुराचार आणि मॉब लिंचिंगसारख्या घटना न होणे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार करण्याची क्षमता निर्माण होत आहे. कारण त्यांच्याप्रमाणे एका लाइक, कमेंट, पोस्ट आणि शेअरमुळे आपण स्वत: ज्या चुका करत आलोत त्या सुधारण्याचे समाधान मिळत आहे. जनसंवाद विभागाचे विद्यार्थी या नात्याने आमची समाजाविषयी नैतिक जबाबदारी म्हणून ‘देख भाई फेक’ हे अभियान सुरू केले आहे.

प्रशिक्षणासाठी मोहिमा

कुठलीही माहिती स्वीकारण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहणे, त्याचबरोबर त्यांना जागरूक आणि शिक्षित करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा चमू नागपूर आणि लगतच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्लाइड शोद्वारे जागरूक आणि प्रशिक्षित करीत आहे. त्यात कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, तिरपुडे कॉलेज ऑफ सोशलवर्क, वुमेन्स कॉलेज, डी.एन.सी. व श्रीमती बिंझानीसहित १५ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून पुढे ५० महाविद्यालयांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना ‘फेक न्यूज’ काय असते, त्याचे प्रकार, त्यामागील उद्देश, ती कशी ओळखावी आणि त्यासाठी उपलब्ध असलेली साधने, त्याचा समाजावर, राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याची विस्तृत माहिती दिली जाते.

मागे राज्य निवडणूक आयोगाच्या परिषदेत या विषयावर सादरीकरण केले. या वेळी निवडणूक प्रक्रियेतील अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे केवळ चर्चासत्रांमध्ये भाषणे करण्यापेक्षा तळागाळात ही माहिती पोहोचविण्याचा निर्णय घेतला. जनसंवाद विभागातील मुलांनी याचा प्रतिसाद दिला. त्यांना महिनाभर याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थी धाडस करत महाविद्यालयांमध्ये आज फेक न्यूजसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत.

– डॉ. मोईज हक, विभागप्रमुख जनसंवाद विभाग

खोटय़ा बातम्यांच्या माध्यमातून तरुणाईला विशिष्ट विचारसरणीपूरक बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. यांचे दुष्परिणाम समाजात बघायला मिळत आहेत. सामाजिक घटक आणि जनसंवाद विभागाचा विद्यार्थी या नात्याने जनजागृती करणाऱ्या या उपक्रमात स्वत: काम करण्याचा अनुभव आनंददायी आहे.

-अमोल बोरकर

‘फेक न्यूज’ व्हायरल करण्यासाठी ज्या समाजमाध्यमांचा वापर केला जातो त्याच माध्यमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या अभियानामार्फत करतोय. ‘देख भाई फेक’च्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे फेक न्यूजविषयी निरंतर माहिती आणि प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करतोय.

-तुषार धारकर

भारतात फेक न्यूजचा सामाजिक, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत आहे. यातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी त्यामागचे इंटेन्शन ओळखून समाजाला सतर्क असणे फार गरजेचे आहे. 

-मेघा रोकडे

एखादी माहिती न तपासता ती पुढे पाठविण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि फॅक्ट चेकिंग किती महत्त्वाचे, हे या अभियानामुळे समजले.

-पूजा पराळे

अनेक नवीन गोष्टी माहिती झाल्या व शिकायला मिळाल्या. कोणतीही बातमी, फोटो किंवा व्हिडीओ खरे आहे की खोटे आहे हे मला आता कळत असल्यामुळे मे इतरांनादेखील ते सांगू शकते. स्वत: जागरूक झाल्याशिवाय आपण दुसऱ्यांना जागरूक करू शकत नाही हे कळले.

-श्वेता कामडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:02 am

Web Title: article on fake news understanding fake news zws 70
Next Stories
1 आम्ही बदललो : सामाजिक संस्कारांतून बौद्धिक परिवर्तन
2 पेटटॉक : आपले आणि परके
3 पूर्णब्रह्म : इंडियन स्वीट व्हेगन ब्रेड
Just Now!
X