वैभव भाकरे

चाळीस वर्षांहून अधिक काळ मॅकलेरन आणि फेरारी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. रेसिंग जगताने मागील काही दशकांमध्ये अनुभवलेल्या तीव्र वैरांमध्ये मॅकलेरन विरुद्ध फेरारी यांचा समावेश होतोच. स्कुडेरिया फेरारी ही जगातील प्रसिद्ध अशा फेरारी या कंपनीची अधिकृत फॅक्टरी रेसिंग टीम आहे. याबाबत कदाचित बहुतेकांना काही खास माहिती नसली तरी ही टीम फेरारीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शर्यंतीसाठी पैसा उभा राहावा म्हणून वाहनविक्री करण्याचे धोरण फेरारीचे संस्थापक इन्जो फेरारी यांचे होते. फेरारी जेव्हा मोटार शर्यतींमध्ये भाग घेऊ  लागले तेव्हा त्यांनी स्वत:जवळील सर्व पैसा शर्यतींमध्ये गुंतवला. रेसिंग ही त्यांच्या अत्यंत आवडीची गोष्ट होती. त्यांची टीम जगातील सर्वोत्तम रेसिंग टीम व्हावी यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. हीच निष्ठा घेऊन स्कुडेरिया फेरारी ही आजही गाडय़ांची निर्मिती करीत आहे. त्यांच्या याच निष्ठेमुळे आज केवळ फॉम्र्युला-१ मध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय मोटारस्पोर्ट्स क्षेत्रात फेरारीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. फॉम्र्युला-१ च्या १९५० मधील उद्घाटनाच्या शर्यतीत सहभागी झालेली फेरारी ही सध्या खेळात सामील असलेली एकमेव टीम आहे आणि या ६६ वर्षांहून अधिक कालावधीत फेरारीने कारनिर्मितीचे विजेतेपद १६ वेळा पटकावले, तर १५ वेळा चालकाचे विजेतेपद पटकावले. फॉर्मुला-१ च्या इतिहासात इतर कोणताही कारनिर्माता या यशाची बरोबरी करू शकला नाही. अनेक प्रतिस्पर्धीनी फेरारीला आव्हान देण्याचे प्रयत्न केले, मात्र या फेरारीच्या विक्रमांना कोणीही लगाम लावू शकले नाही; परंतु त्यातही ज्या प्रकारचे आव्हान मॅकलेरनने फेरारीला दिले त्याला तोड नाही.

१९६६ साली मॅकलेरनने फॉर्मुला १ मध्ये पदार्पण केले.  फॉर्मुला-१ मध्ये सध्या सहभागी होणारी मॅकलेरन ही दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे. न्यूझीलंडचे जगप्रसिद्ध रेसकार ड्रायव्हवर ब्रूस मॅकलेरन यांनी या जागतिक पातळीची टीम तयार करण्याच्या उद्देशाने या टीमची स्थापना केली. आपल्या टीमबाबत ब्रूस यांचे धोरण एन्झो फेरारी यांच्याहून वेगळे होते. रेसिंगबाबत भावनिक होण्याऐवजी त्यांचा विश्वास अचूक आणि परिपूर्ण गाडय़ा निर्माण करण्यात होता. अजूनही मॅकलेरन तेच तत्त्व पाळत आहे. मॅकलेरनसाठी फॉर्मुला-१ ची सुरुवात थोडी खडतर होती. मात्र काही काळातच या टीमची गणना जगातील सर्वोत्कृष्ट टीममध्ये होऊ  लागली. फॉर्मुला-१ मध्ये पदार्पण केल्याच्या दोन वर्षांतच मॅकलेरनने एफ वनच्या जागतिक कारनिर्माता स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. स्पर्धेत केवळ दोन वर्षेच सहभागी होणाऱ्या एखाद्या टीमसाठी हे एक मोठे यश होते.

१९७० मध्ये ब्रूस मॅकलेरन यांचे निधन झाले. ब्रूस यांच्या निधनानंतरही मॅकलेरन टीमने  सर्वोत्कृष्ट होण्याच्या प्रयत्नात खंड पडू दिला नाही. यशाचे अनेक टप्पे निरंतर मेहनतीतून मॅकलेरन गाठत राहिली आणि १९७२ मध्ये फेरारीला मागे पाडत मॅकलेरनने १९७२ मध्ये जागतिक कारनिर्माता विजेतेपदावर नाव कोरले. फेरारीला मागे टाकण्यात मॅकलेरनला यश आले.

फॉर्मुला-१ च्या जगात ज्याप्रमाणे इतर कार कंपन्यांच्या वैरांच्या आख्यायिका आहेत त्याप्रमाणे फेरारी आणि मॅकलेरनच्या थेट स्पर्धेचे किस्से तसे कमीच आहेत. फॉर्मुला-१ वर फेरारीचा असलेला दबदबा पाहता कोणतीही कंपनी साहजिकच फेरारीला मागे टाकण्याचा प्रयत्न करणार यात दुमत नाही; परंतु मॅकलेरनच्या रूपात फेरारीला एक दमदार प्रतिस्पर्धी मिळाला. या दोन्ही टीम्सकडे अद्ययावत गाडय़ा आणि सर्वोत्तम चालक होते जे आज फॉर्मुलाच नाही तर मोटरस्पोर्ट्सच्या इतिहासात दिग्गज मानले जातात. मारिओ आंद्रेत्ती, जेम्स हंट, निकी लाऊडा, नायजेल मानसेल, एलेन प्रोस्ट हे दिग्गज या टीमचे चालक होते. फेरारीच्या १२ सिलिंडरच्या गाडय़ांनी जागतिक स्पर्धामध्ये नाव मिळवले, तर ८० आणि ९० च्या दशकांत मॅकलेरनने आपल्या विजयात सातत्य कायम ठेवले. त्या काळात इतरही स्पर्धक होते ज्यांनी लक्षवेधी कामगिरी केली, मात्र फेरारी आणि मॅकलेरनपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही.