महाविद्यालयातील अण्णा, अप्पा, तात्या, झुल्या, प्यारा, कमला, भिकू अशा तमाम कट्टय़ांवर अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखे वातावरण आहे. दरसालाप्रमाणे डोक्यावर येऊन बसलेल्या ‘परीक्षा भुता’ने कट्टेकऱ्यांना झपाटले आहे. त्यामुळे कट्टय़ांना कट्टा न म्हणता ‘स्टडी ग्रुप’ असे संबोधून त्यावर कट्टय़ावरील उपक्रमांचे तात्पुरते स्थलांतर झाले आहे. थोडक्यात, नेहमीच्या ठिकाणी न जमता जागा बदलून आणि उद्देश बदलल्याचे भासवून कट्टेकरी अभ्यासाचा अभ्यास कसा करायचा या उपक्रमांमध्ये गुंतले आहेत.

पुण्यात विद्यापीठांतील बागा, मैदान, पार, शहरातील सार्वजनिक उद्याने, जंगली महाराज रस्त्यावर संभाजी बागेबाहेर झालेली नवी छोटेखानी बाग, बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर आणि अपवादात्मक परिस्थितीत विविध नावे  आणि देवळांच्या ठिकाणी ‘स्टडी ग्रुप’ जमलेले दिसतात. मुंबईत परळ, लालबाग, चर्चगेट परिसरातील उद्याने, विद्यापीठ, कॅफे, आणि एरवी जोडीदाराला भेटण्याचे ठिकाण असणारे समुद्र, ठाण्यातील पावलापावलांवरची तळी अशा ठिकाणी कट्टेकरी पुस्तकांच्या चळती घेऊन बसलेले दिसतात. काही ठिकाणी सबमिशन्स तोंडावर आल्यामुळे झालेली पळापळ, क्वचित प्रसंगी वर्षभराची हजेरी न भरल्यामुळे घरी येऊ घातलेल्या महाविद्यालयांच्या ‘प्रेमपत्रां’ना कसे तोंड द्यावे याची चिंता, कुठे एखाद्या संकल्पनेवरून रंगलेला वाद, दुसऱ्या ग्रुपकडून अभ्यास, नोट्स मिळवण्यासाठीच्या व्यूहरचनांची आखणी आणि जोडीला कुणी कोणत्या नोट्स हस्तगत केल्या आहेत याची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चालणारी ‘गॉसिप्स’ अशा बहुढंगी वातावरणाने हे हंगामी कट्टे सजले आहेत.

पुण्यातील बहुतेक कट्टेकऱ्यांना रात्रीच्या वेळी एकत्र जमून अभ्यास करण्याचा उत्साह दांडगा. सार्वजनिक ठिकाणी वेळेच्या बंधनामुळे सायंकाळी हकालपट्टी झाली की मंडळी कुणाची तरी गच्ची, घर इथे ठिय्या मांडतात. थोडा अभ्यास, थोडी मस्ती असा ग्रुप स्टडीचा माहोल. मात्र काही वेळा गप्पाच अधिक रंगतात. मग पुन्हा अभ्यासाकडे वळण्यासाठी लागणारी एनर्जी देण्यासाठी खाऊगल्ली तयार असते. पुण्यातल्या बहुतेक भागांत या रात्रीच्या अन्नदात्यांसमोर कायम खवय्यांचे कोंडळे दिसते. बासुंदी, केशरी उकाळा, बर्फाचा गोळा, चहा, लस्सी, वाळ्याचे सरबत, पोहे, मूगभजी, धपाटे, खरवस, कुल्फी, मटकी भेळ, कॉर्न चॅट, मॅगी, सूप, अंडा भुर्जी, चिकन लॉलीपॉप, असे शहराच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या मेन्यू कार्डचा माग घेत कट्टेकरी गाडीला ‘किक’ मारतात. मग तिथे पोहोचण्यासाठी भले तासभर का जाईना.. पण परीक्षेच्या काळात आनंदी राहायला हवे ना. वरकरणी ही सगळी धमाल दिसत असली तरी एकत्र केलेल्या अभ्यासातून परीक्षेची तयारीही आपोआप होत असते. एरवी तासतासभर पुस्तकात डोके खुपसून न कळलेली गोष्ट मित्रांशी गप्पा मारताना सहज कळते. एकमेकांकडून टिप्स घेत तयारी होत असते. दुसऱ्या दिवशी कोणते विषय करायचे, कुणी कोणते मुद्दे घरी तयार करून यायचे याचे अगदी पद्धतशीर नियोजन चालते आणि काटेकोरपणे नाही तरी बहुतांशी ते पाळलेही जाते. रात्री अभ्यास करून थकल्यावर घरी किंवा वेळप्रसंगी हॉस्टेलवर रेक्टरला पत्ता लागू न देता हळूच जाऊन आवरायचे आणि अभ्यासू वातावरणात जाण्यासाठी बाहेर पडायचे.. हीच खरी परीक्षेच्या तयारीसाठी मिळणारी सुट्टी.

पुण्यातील मानस पासलकर सांगतो, ‘आमचा सहा जणांचा ग्रुप आहे. एरवीचे ग्रुप वेगळे आहेत, पण हा आमचा अभ्यासाचा ग्रुप आहे. दोन मित्र पुण्यात फ्लॅट घेऊन राहतात. त्यांच्या घरी आम्ही जमतो. दिवसभर अभ्यास होतो, पण इकडे-तिकडे लक्षही जाते. त्यामुळे शक्यतो रात्री जमतो. मजा असते पण अभ्यासही होतो.’ रश्मी सांकला हिने सांगितले, ‘आम्ही तिघी मैत्रिणी माझ्या घरी जमतो. शाळेपासून आम्ही एकत्र आहोत तेव्हा आठवी, नववीपासून आम्ही परीक्षेपूर्वी एकत्र अभ्यास करतो. एक टॉपिक ठरवून तो बाकीच्या दोघींना समजावून सांगायचा असा अभ्यास आम्ही करतो.’

गेमचा विरंगुळा

मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये अभ्यास होत असताना विरंगुळा शोधावाच लागतो. खूप अभ्यास करून कंटाळा आल्यावर आम्ही मोबाइलवर गेम खेळतो. निदान काही काळ अभ्यासाचा ताण हलका होऊन गेम खेळण्याकडे लक्ष असते, असे ठाण्यातील अजिंक्य शिंदे सांगतो.