13 December 2019

News Flash

घरातलं विज्ञान : केशाकर्षण

आपण जेव्हा स्ट्रॉमधून शीतपेय पितो तेव्हा त्याच्यातील हवा आपण शोषून घेतो व पेय त्यातून वर चढते.

(संग्रहित छायाचित्र)

सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

पाऊस पडला की सर्वत्र आनंद पसरतो. त्याबरोबर छत्र्या, रेनकोट वॉटरप्रूफ दप्तर हे आत ठेवलेले साहित्य कपाटातून बाहेर येते. या सर्व साहित्याचे वैशिष्टय़ म्हणजे ते ओले होत नाहीत. असे काय आहे ज्यामुळे हा विशेष गुणधर्म त्यांना प्राप्त होतो? हे समजण्याकरिता आधी केशाकर्षण समजून घ्यायला हवे.

आपण जेव्हा स्ट्रॉमधून शीतपेय पितो तेव्हा त्याच्यातील हवा आपण शोषून घेतो व पेय त्यातून वर चढते. त्याऐवजी एखादी अतिशय बारीक नळी त्यात ठेवली तर पेय त्यातून आपोआप वर चढेल. यालाच केशाकर्षण म्हणतात. या नळीचा व्यास किती, घनता किती, द्रव/पेय पदार्थाचा पृष्ठीय ताण किती यावर तो किती वर चढेल, हे अवलंबून असते.

केशाकर्षणाची अनेक उदाहरणे देता येतील. झाडांच्या मुळापासून पानांपर्यंत पाणी पोहोचते ते या केशाकर्षणामुळेच. पाण्याचे पृष्ठीय ताण झाडांतील केशिकांचा व्यास हे सर्व गणितरूपात मांडून पाणी जास्तीत जास्त किती उंच चढेल हे आपल्याला माहिती करून घेता येते. ही उंची साधारण १२० ते १३० मी. आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात उंच वृक्ष हा १३० मी.हून अधिक उंचीचा असू शकत नाही.

उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत असे आपण म्हणतो. घाम आल्यास सुती कपडय़ावरील तंतू केशाकर्षणाने तो घाम शोषून घेतात. नायलॉन/टेरिरीन कपडे घातल्यास त्यामधील तंतू घाम शोषून घेऊ  शकत नाहीत. याच कारणामुळे ते लवकर वाळतात, सुती कपडय़ांनी पाणी शोषून घेतल्यामुळे त्यांना वाळायला वेळ लागतो. देवापाशी दिवा लावायला कापसाची वात करतात. कापूस पिळून बारीक अशा या वाती तयार केल्या जातात. जितकी वात बारीक तेवढे तेल त्या वातीतून वर चढते व दिवा व्यवस्थित पेटतो. ही वात ८-१० दिवस तरी चालते. पूर्वी या वाती घरोघरी तयार केल्या जात. आजच्या जीवनशैलीत यासाठी वेळ नसल्यामुळे आपण त्या विकत आणतो. विकत आणलेल्या वाती जाड असतात व त्यातील केशिका जास्त व्यासाच्या असल्यामुळे त्यातून तेल खूप कमी वर चढते. या वातींमध्ये तेल कमी चढल्याने कापूसदेखील जळतो व या वाती लवकर बदलाव्या लागतात. म्हणून विकत आणलेल्या वातींना पीळ देऊन केशिका बारीक केल्याने त्या अधिक दिवस टिकतात.

पावसाळ्यात लाकूड फुगणे, भिंतीला ओल येणे हे सर्व या केशाकर्षणामुळेच. समुद्रकिनारी असलेली वाळू कोरडी या उलट माती मात्र ओली. मातीचे कण वाळूपेक्षा बारीक असतात. परिणामत: त्यात तयार होणाऱ्या केशिकादेखील अतिसूक्ष्म व्यासाच्या असतात. त्यातून पाणी वर चढून माती ओली राहते. वाळूतून मात्र पाणी वर चढत नाही. बागकाम करताना माती नेहमी मोकळी करावी. असे केल्याने केशिका मोडल्या जातात. या केशिका मोडल्याने पाणी वर चढत नाही व बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. तसेच माती सुटी केल्याने मुळांपाशी हवा खेळती राहते.

केशाकर्षणामुळे द्रव वर चढते याची अनेक उदाहरणे आपण बघितली. याचे अगदी उलट उदाहरण बघितले आहे का कधी? आठवून बघा. याविषयी आपण स्वतंत्र लेखात चर्चा करू या. रेनकोट, छत्र्या यावर त्यातून पाणी आत येऊ  नये याकरिता एक विशिष्ट थर दिला जातो. हा थर दोन प्रकारचा असतो. १) हा थर पाण्याला आत येऊ  देत नाही, पण आतील बाष्प किंवा ओलेपणा याला बाहेरची वाट करून देतो. २) पूर्णत: वॉटरप्रूफ म्हणजे शरीरावरील बाष्प, घाम हे आत कोंडून राहते व गुदमरायला होते.  रेनकोट घेताना नेहमी पहिल्या प्रकारचा थर असलेला रेनकोट घ्यावा. भिंतीतून ओल आत येऊ  नये म्हणून विशिष्ट रसायन बाजारात उपलब्ध आहे ती वापरावीत. या रसायनांमुळे केशिका बंद केल्या जातात व ओल आत येत नाही.

First Published on August 8, 2019 12:21 am

Web Title: article on home science abn 97
Just Now!
X