वैभव भाकरे

जगातील सर्वात मोठय़ा मोटार उत्पादकांपैकी असणाऱ्या होंडा या जपानी कंपनीची स्थापना १९४६ मध्ये झाली. २००१ मध्ये होंडा जगातील दुसरी सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी होती, तर २०१८ मध्ये जगातील आठवी मोठी कार उत्पादक कंपनी ठरली. अमेरिकी आणि इटालियन कार कंपन्यांच्या जन्म गाथा त्यांच्या संस्थापकांचा संघर्ष कथा जगप्रसिद्ध आहेत. परंतु होंडा, टोयोटासारख्या भारतीय मोटार बाजारावर मजबूत पकड असणाऱ्या कंपनीच्या इतिहासाबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात.

भारतीय वाहन बाजारात होंडाचे अस्तित्व वाखाणण्याजोगे आहे. मोटार ते दुचाकी उत्पादन या दोन्ही क्षेत्रांत होंडाने चांगली कामगिरी केली आहे. होंडा कंपनीची सुरुवात सोइचिरो होंडा यांनी केली. होंडाच्या या जन्मगाथेला होंडा आणि टोयोटाच्या वैराची आणि होंडा यांच्या संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. जगातील इतर देशांप्रमाणे १९३० च्या दशकातील आर्थिक मंदीचा जपानलाही मोठा फटका बसला होता. १९३७ मध्ये सोइचिरो होंडा हे एका वर्कशॉपमध्ये काम करू लागले. ते पिस्टन रिंगच्या संकल्पनेवर काम करीत होते. पिस्टन तयार झाल्यावर ही संकल्पना एका मोठय़ा वाहन उत्पादन कंपनीला विकण्याचा त्यांचा मानस होता. पिस्टन तयार करण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली. भांडवलासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण टाकले. आपण एक चांगले उत्पादन तयार केल्याचा त्यांचा विश्वास होता. पिस्टनचे काम पूर्ण झाल्यावर तो ते टोयोटा कंपनीमध्ये घेऊन गेले. मात्र तो पिस्टन कंपनीच्या गुणवत्तेत बसत नसल्याचे सांगत नाकारण्यात आला. त्यांनी पुन्हा पिस्टनवर काम करण्यास सुरुवात केली त्यात अनेक बदल केले. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ते पुन्हा टोयोटामध्ये पिस्टन घेऊन गेले. या वेळी त्यांच्या पिस्टनचे डिझाइन मंजूर झाले आणि त्यांनी टोयोटाशी करार केला.

टोयोटाशी केलेला करार पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९४१ मध्ये एक फॅक्टरी सुरू केली. यात टोयोटाची ४० टक्के मालकी होती. होंडा यांना अध्यक्ष पदावरून कमी करत वरिष्ठ कार्यकारी संचालक करण्यात आले. त्यादरम्यान युद्धाला सुरुवात झाली आणि होंडा यांच्या फॅक्टरीवर  बॉम्बहल्ला झाला. उत्पादनासाठी स्टील मिळेनासे झाल्यावर त्यांनी इंधनाचे रिकामे कॅन कच्चामाल म्हणून वापरून उत्पादनाला सुरुवात केली.  शेवटी भूकंपामुळे त्यांची फॅक्टरी जमीनदोस्त झाली. त्यांनतर त्या कंपनीचे हक्क टोयोटाला विकून त्यांनी १९४६ मध्ये होंडा टेक्निकल रिसर्च इन्स्टिटय़ूटची स्थापना केली. युद्धानंतर इंधन तुटवडय़ामुळे लोकांना वाहन वापरणे परवडेनासे झाले. कुठेही जाण्यासाठी लोक सायकलचा वापर करू लागले.

होंडा यांनी एक छोटे इंजिन सायकलला लावून मोटारसायकल तयार केली. होंडाच्या या मोटारसायकलला मागणी येऊ  लागली.  त्यांचे पहिले मॉडेल जास्त वजनाचे आणि मोठय़ा आकाराचे होते. त्यात त्यांनी सुधारणा करून इंजिनचा आकार लहान केला. आणि त्यांची ‘सुपर कब’ लोकप्रिय झाली. जपानमध्ये मिळालेल्या यशानंतर त्यांनी बाईकची युरोप आणि अमेरिकेत निर्यात करण्यास सुरुवात केली. १९७० च्या दशकात झालेल्या इंधन तुटवडय़ामुळे अमेरिकी कार बाजार छोटय़ा गाडय़ांकडे वळला. बाजारातील बदलाचे संकेत होंडा यांनी हेरले आणि छोटे इंजिन असणाऱ्या लहान गाडय़ा निर्माण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारच्या छोटय़ा गाडय़ा मोटार बाजारात नवीन होत्या.

या गाडय़ा अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यानंतर होंडा कंपनी यशाचे नवे टप्पे गाठत गेली. कधीही तडजोड न करणे, अपयशाचा सामना करून सातत्याने काम करत राहणे हा सिद्धांत होंडा अजूनही पाळत आहे.