कर्नाटकच्या प्राचीन इतिहासाची जोपासना करणारा महोत्सव म्हणजे होयसळ महोत्सव. दक्षिणेच्या इतिहासात होयसळ साम्राज्याचा ठसा महत्त्वाचा आहे. होयसळांच्या काळात त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच हळेबिडू आणि बेलूरमध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारी मंदिरे बांधली गेली. याच मंदिरांच्या प्रांगणात होयसळ महोत्सव साजरा केला जातो. हळेबिडू येथे होयसळेश्वर तर बेलूर येथे चेन्नकेशव मंदिर आहे.

प्रामुख्याने कर्नाटकी पारंपरिक कलेचा वारसा यामध्ये सादर केला जातो. कर्नाटकातील अनेक कलाकार या महोत्सवासाठी एकत्र येतात. हळेबिडू आणि बेलूर या दोन्ही ठिकाणच्या मंदिरांवर या काळात रोषणाई केली जाते. तसेच मंदिरामध्येदेखील काही धार्मिक विधी केले जातात. या उत्सवाची परंपरा १२ व्या शतकापासून जोपासली जात असल्याचे सांगितले जाते. होयसळ राजांच्या विजयाप्रीत्यर्थ हा महोत्सव सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. यावर्षी हा महोत्सव १६ मार्चला साजरा होणार आहे. या काळात या ठिकाणी अनेक प्रदर्शनेदेखील उभारली जातात. संपूर्ण शहरातच उत्साहाचे वातावरण असते आणि या काळात पर्यटनालादेखील बराच वाव असतो.