ओंकार वर्तले

राजस्थानमधील जोधपूर हे सध्या गुलाबी थंडीतील एक हटके ठिकाण म्हणून अनेक पर्यटकांची पहिली पसंत ठरत आहे. अगदी महाराष्ट्रातून अनेक जण या शहराला भेट देत असतात. जोधपूरला आले की अनेक पर्यटक मेहरानगड, उम्मेदभवन आणि शहरातील महाल बघून आपली भटकंतीची संपत्ती करतात. खरं तर जोधपूरला कमीत कमी तीन दिवस तरी हातात हवेच, कारण केवळ शहरातच नव्हे तर या शहराच्या परिघात खूप चांगली आणि वास्तुस्थापत्याचे दर्शन घडवणारी ठिकाणे उभी आहेत. ती प्रसिद्ध नसल्यामुळे अनेकांना माहीतदेखील नाही. म्हणूनच या लेखात अशा ठिकाणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करून दिला आहे.

भीमभडक गुंफा

जोधपूरपासून साधारण ३० कि.मी. अंतरावर असलेली ही भीमभडक गुहा एक नैसर्गिक आणि भौगोलिक आश्चर्य आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगेत अशी आश्चर्य आपल्याला पदोपदी दिसतात; पण हे आश्चर्य खासच आहे. जोधपूरपासून पश्चिमेला असणाऱ्या अरावली पर्वतरांगांच्या कुशीत हे ठिकाण लपलं आहे. जवळपास १५० फूट लांबीची ही गुहा असून ती आरपारदेखील आहे. याच गुहेत आणखी एक छोटीशी उपगुहा असून त्यात देवीचं मंदिर आहे. या गुहेत मोठय़ा शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते. त्यामुळे येथे येणारे भटके कमी आणि भाविकच जास्त आहेत. स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते काही काळ येथे वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी या गुहेत  तपश्चर्या केली होती असे म्हणतात. मोठी निसर्गरम्य आणि शांत जागा आहे ही; पण आता येथे मठाची स्थापना झालेली दिसते. या भीमभडक गुहेत जाण्यासाठी आपल्याला संरक्षित क्षेत्रातून जावे लागते, त्यामुळे आपले ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे.

कायलाना तलाव

जोधपूरच्या पूर्वेला साधारण ८ किलोमीटर अंतरावर कायलाना हा मानवनिर्मित तलाव बांधला गेला आहे. हा तलाव राजा प्रताप सिंह यांनी १८७२ साली बांधल्याचे इतिहासकार सांगतात. अतिशय शांत आणि निसर्गरम्य जागा आहे ही. या ठिकाणी  बोटिंगचीही सुविधा उपलब्ध होते. या तलावाचे वैशिष्टय़ म्हणजे हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी या तलावाचे सौंदर्य खरोखरीच पाहायला हवे.

राणीसर आणि पदमसर तलाव

जोधपूरमध्ये अनेक तलाव त्याच्या वास्तुस्थापत्यामुळे प्रसिद्ध आहेत. याच यादीत राणीसर आणि पदमसर तलाव यांची भर पडते. हे दोन तलाव मेहरानगडाच्या फतेह पोलजवळ निर्माण केले गेले असून ते अगदी शेजारी शेजारी आहेत. हे दोन्हीही तलाव १४५९ साली निर्माण केले गेले आहेत. या तलावांची निर्मितीमागची कहाणी मोठी रंजक आहे. राजा राव जोधा याची पत्नी राणी हिने या तलावाची निर्मिती केली म्हणून याचे नाव ‘राणीसार तलाव’, तर पदमसार या तलावाची निर्मिती राजा राव गंगा याची राणी पद्मिनी हिने केली म्हणून हा झाला ‘पदमसार तलाव’. या दोन्हीही तलावांचे बांधकाम पाहण्यासारखे आहे. तसेच अनेक पक्षीही पाहायला मिळतात. फक्त येथे येणारा रस्ता मात्र अत्यंत अस्वच्छ असून भर वस्तीतून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे वाहन येऊ  शकत नाही. या तलावापासून मेहरानगडाच्या पाठीमागील बाजूचे खूपच सुंदर दर्शन घडते.

मंडोर किल्ला आणि उद्यान

मंडोर जोधपूरपासून पूर्वेला १७ कि.मी.वर असणारी मारवाड राज्याची जुनी राजधानी. जोधपूरच्या आधी राजस्थानची राजधानी ही मंडोरला होती. मंडोरला असणारी सुरक्षितता राव जोधाला कमी भासू लागली, तशी त्याने राजधानी जोधपूरला हलवली. नंतरच्या काळात राव जोधा यांनी जोधपूर शहराची स्थापना केली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव राजधानी नंतर बांधलेल्या मेहरानगड किल्ल्यावर स्थलांतरित केली. आजही आपणास राठोड शासकांच्या समाध्या इथे पाहावयास मिळतात. येथे असणारी ऐतिहासिक बाग आजही एकदम व्यवस्थित जतन केलेली आहे. मंडोरचे प्राचीन नाव होते मांडवपूर. इथले स्थानिक लोक असं म्हणतात, रावणाची पत्नी मंदोदरी हीसुद्धा इथलीच. मंदोदरीवरून मंडोर झालं. प्राचीन काली हेच ठिकाण मारवाडची राजधानी म्हणून ओळखले जात होते. याची साक्ष देत याच मंडोरमध्ये एक किल्ला देतो आहे; पण हा किल्ला आता भग्न झाला असून त्याचे अवशेष मात्र आजही पाहायला मिळतात. सध्या येथे आता मोठे उद्यान उभारले गेले आहे आणि याच उद्यानात वास्तुस्थापत्याचे सुंदर दर्शन घडवणारी मंदिरे, राजघराण्यांच्या सदस्यांची स्मारके आणि छत्र्या, विहीर आणि महाल येथे पाहायला मिळतात. या उद्यानातूनच किल्लय़ावर जाण्यासाठी एक रस्ता आहे. साधारण अध्र्या तासात हा किल्ला पाहूनदेखील होतो. किल्लय़ावरून आसपासच्या परिसराचे खूप सुंदर दर्शन होते. मंडोर पाहण्यासाठी अर्धा दिवस तरी हातात हवा. जोधपूरपासून येथे येण्यासाठी खासगी वाहनेही मिळतात किंवा सरकारी बसेससुद्धा उपलब्ध आहेत.

तुरजी का झालरा अर्थात पायऱ्यांची अद्भुत विहीर

जोधपूर शहरातच म्हणजे राणीसर आणि पदमसर या तलावांजवळच वास्तुस्थापत्याने नटलेली पायऱ्यांची सुंदर विहीर पाहण्यासारखी आहे. इतिहास संशोधकांच्या मते ही विहीर जोधपूरचे महाराज अभयसिंह याच्या तंवर नावाच्या राणीने १७४० मध्ये याची निर्मिती केली. या राणीला ‘तुर’ असेही म्हणत असत. यामुळेच या विहिरीला तुरजी का झालरा असे नाव पडले. या विहिराच्या कामात जोधपूरच्या खास लाल रंगाच्या  दगडांचा वापर केलेला दिसून येतो.

ovartale@gmail.com