25 January 2020

News Flash

जुन्नरचे कातळसौंदर्य

पुणे जिल्ह्यच्या उत्तरेला असलेल्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

पुणे जिल्ह्यच्या उत्तरेला असलेल्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. जुन्नर तालुका म्हणजे अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टींची अक्षरश: खाण आहे. जीर्णनगर अशी प्राचीन ओळख असलेल्या या परिसराचा संबंध इसवी सनाच्या पूर्वी थेट सातवाहन कुलापर्यंत जातो. या काळात जुन्नर परिसरात बौद्ध भिक्षुंसाठी विविध लेणी खोदली गेली. अभ्यासकांच्या मते ती हीनयान पंथियांची आहेत.

जुन्नर परिसरात सुमारे १८० लेणी आहेत. एकाही लेणीत बुद्धाची मूर्ती नाही. त्यात कल्याण, भडोच इथल्या व्यापाऱ्यांचे आणि रहिवाशांचे लेख आहेत. लेणी किंवा तिथल्या पाण्याच्या पोढीसाठी दान देणे हे पुण्यकर्म समजले जाई. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या चहूबाजूंनी असलेल्या डोंगरातील ही लेणी अवश्य पाहण्यासारखी आहेत.

अंबा-अंबिका लेणी

नारायणगावहून जुन्नरला जाताना डावीकडे डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो, तो मानमोडी लेणीसमूह आहे. या लेणीचे मुखदर्शन (फसाड) रस्त्यावरूनसुद्धा होते. पायथ्याशी असलेल्या पोल्ट्रीपासून एक पायवाट या लेणींकडे जाते. ही अंबा-अंबिका लेणी आहेत. त्यापैकी एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैन देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पाश्र्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या अंबिका देवीचे अंकन दिसते. त्यावरून या लेणीला अंबिका लेणी नाव पडले. याच लेणीसमूहात पुढे एक अर्धवट राहिलेले चैत्यगृह आहे. दगड ठिसूळ लागल्यामुळे ते बांधकाम अर्धवट सोडावे लागले. त्याच्या शेजारच्या दोन छोटय़ा लेण्यांच्या बाहेरच्या भिंतीवर ब्राह्मी लिपीमधील अत्यंत सुबक शिलालेख आहेत. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या ‘बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित’ (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी या लेणीसाठी दान दिले. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले म्हणून ते मधल्या ओळीत छोटय़ा अक्षरांत लिहिलेले आहे.

सुलेमान लेणी

ही लेणी लेण्याद्री रांगेतील पूर्वेकडच्या एका डोंगरात आहे. हा गणेश लेण्यांचाच एक भाग आहे. सुलेमाननामक व्यक्तीने संवर्धन केले म्हणून याला सुलेमान लेणी म्हटले जाऊ  लागले. लेण्याद्रीच्या वाहनतळापासून डोंगरावर न जाता बाजूच्या शेतातून या लेणीकडे जायला पायवाट आहे. तिथून अर्ध्या तासात आपण लेण्याद्री डोंगर आणि लेणींच्या मध्ये जाऊन पोहोचतो. तिथून ही लेणी दिसू लागतात. थोडासा डोंगर चढून गेल्यावर एक कोरडा ओढ आडवा येतो त्याला वळसा घालून आपण लेणीखाली येतो. इथून वर जायचा मार्ग काहीसा पडलेला आहे. ही लेणी हीनयान पंथियांची आहेत. याचे मुखदर्शन (फसाड) खूपच आकर्षक आहे. गौतम बुद्धाच्या मूर्ती करण्याआधी बुद्धाचे अस्तित्व हे त्याच्या आयुष्यात आलेल्या काही वस्तूंद्वारे दाखवले जाते. त्यानुसार इथे गौतमबुद्ध मूर्ती स्वरूपात न दिसता कुंपण असलेला वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला कोरलेल्या धर्मचक्राच्या सांकेतिक रूपात दाखवलेला आहे. छोटेसे पण अत्यंत सुंदर असे हे सुलेमान लेणे लेण्याद्रीला गेल्यावर तर अवश्य पाहिले पाहिजे.

निसर्गरम्य जुन्नरची ही श्रीमंती मुद्दाम वेळ काढून पाहिली पाहिजे. इसवीसनाच्या सुरुवातीच्या काळात इथे भरभराटीला आलेला व्यापार आणि लयनस्थापत्य (लेणी) या प्रदेशाचे महत्त्व अधोरेखित करतात. बौद्ध धर्मातील हीनयान पंथियांचे अस्तित्व आजही आपल्याला त्यांनी खोदलेल्या लेणींमधून जाणवते. नितांत शांत परिसरात काळ्या कातळात खोदलेल्या लेणी आपल्याला निराळीच अनुभूती देऊन जातात. इथे डाव्या बाजूला असलेल्या भीमाशंकर लेणीवर मात्र मधमाशांचे मोठे पोळे आहे. तिथे जाऊ  नये. तसेच या परिसरात आरडाओरडा केला तर या माशा उठू शकतात आणि मग ते प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे शांततेचा भंग न करता कातळसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

भूतलेणी

मानमोडी लेणीसमूहात असलेली ही लेणी इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदली गेली. या लेणीचे मुखदर्शन (फसाड) अत्यंत आकर्षक आहे. बाजूच्या भिंतीवर कोरलेला बोधीवृक्ष आपले लक्ष वेधून घेतो. पिंपळाच्या आकाराची चैत्यगवाक्षाची कमान आकर्षक आहे. इथे दोन मोठे स्तूप आणि बाजूला मनुष्यरूपातल्या नाग आणि गरुडाच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. खरे तर नाग आणि गरुड एकमेकांचे शत्रू. परंतु बुद्धाच्या सहवासात आल्यावर दोघेही वैर विसरून गेले असे यातून सांगायचे आहे. इथल्या चैत्यगवाक्षाची कमान फारच सुंदर सजवलेली आहे. यात मध्यभागी अभयमुद्रेत उभी असलेली गजलक्ष्मी आणि दोन बाजूंनी तिच्यावर अभिषेक करणारे हत्ती आहेत. त्यांच्या बाजूच्या पाकळ्यांमध्ये पुरुष-स्त्री अशी दाम्पत्ये, त्याखाली ब्राह्मी लिपीतील शिलालेख दिसतो. शेजारीच असलेल्या विहारांचे दरवाजेसुद्धा देखणे आहेत. त्यावर असलेले दोन दोन स्तूप तसेच त्रिरत्न, फुलांची नक्षी, धर्मचक्र ही बौद्ध स्थापत्यातील शुभचिन्हे फारच सुरेख कोरलेली आहेत. हे सगळे दृश्य केवळ अप्रतिम असते. तिथे असलेल्या नीरव शांततेमुळे लेणी कायम स्मरणात राहतात.

vidyashriputra@gmail.com

First Published on February 22, 2019 12:13 am

Web Title: article on junnar taluka tourist spot
Next Stories
1 ट्रिपटिप्स : जंगल भ्रमंतीत काय टाळावे?
2 बांबू चिकन आणि कॉफी
3 शहर शेती : रोप लावताना..
Just Now!
X