14 August 2020

News Flash

कोकण भ्रमंती

महाराष्ट्र देशीसुद्धा उन्हाळ्यातील भटकंतीचे अनेक पर्याय आहेत. कोकण हा त्यातलाच एक सुंदर पर्याय.

(संग्रहित छायाचित्र)

आशुतोष बापट

उन्हाळ्यात कोकण म्हणल्यावर काही जणांना वेडेपणा वाटू शकेल. रणरणते ऊन, आणि घामाची आंघोळ असेच काहीसे चित्र डोळ्यासमोर उभे राहील. पण वस्तुस्थिती तशी नाही. कोकण हा खरेतर असा प्रदेश आहे, जिथे वर्षांतले बाराही महिने निसर्ग आपली निरनिराळी रूपे दाखवतो आणि म्हणूनच ऐन उन्हाळ्यात – वसंत ऋतूत कोकणात जायलाच हवे.

परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की साहजिकच वेध लागतात ते हिमालयात जाण्याचे. आपल्याकडे कडकडीत ऊन असताना तिकडे बर्फात रमणे, भटकंती करणे याची ओढ कोणालाही असणे स्वाभाविक आहे. अनेक मंडळींची पावले हिमालयाकडे वळतातसुद्धा. पण इथे महाराष्ट्र देशीसुद्धा उन्हाळ्यातील भटकंतीचे अनेक पर्याय आहेत. कोकण हा त्यातलाच एक सुंदर पर्याय.

डोक्यावर टोपी, डोळ्याला गॉगल आणि सुती कपडे हे पथ्य पाळून प्रवास केला तर ऐन उन्हाळ्यातही कोकणातली भटकंती खूप छान होते. नारळाचे पाणी, नीरा, कोकम सरबत, आवळ्याचे सरबत इत्यादींचे सतत सेवन केल्याने थकवा अजिबात जाणवत नाही. पाणी मात्र सतत पीत राहायला हवे आणि वातानुकूलित गाडीतून एकदम उन्हात न येता जरा वेळ सावलीत काढून मग भटकायला बाहेर पडावे. खरेतर गाडीच्या काचा उघडय़ा ठेवून केलेली भटकंती फारच रमणीय असते. आंबा, काजू यांच्या मोहोराचा वास मनसोक्त घेता येतो. त्याबरोबरच अबोली, सुरंगी, करवंद आणि कुडा यांची फुललेली फुले कधीही थांबून पाहता येतात.

मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ, जांब ही फळे याचवेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणे ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फुले ऐन उन्हाळ्यात केवळ अप्रतिम दिसतात. विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली असते. पक्ष्यांची तर गणनाच करायला नको एवढे पक्षी कोकणात दिसतात. खंडय़ा, कोतवाल, वेडा राघू, भारद्वाज, स्वर्गीय नर्तक, तांबट असे सुंदर, देखणे आणि गोड आवाजात गाणारे पक्षी बघायला मुद्दाम कोकणात जायला हवे.

कोकणाला समृद्ध समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे मुद्दाम किनाऱ्यालगतच्या गावात राहणे हा उत्तम पर्याय आहे. आणि आता तर सागरकिनारा महामार्ग झालेला असल्यामुळे कोकणातल्या दोन ठिकाणांमधील अंतर खूपच कमी झाले आहे. या महामार्गावरून प्रवास करताना सागराचे सान्निध्य सतत लाभत असल्यामुळे हा प्रवास फारच रमणीय होतो. खाण्यापिण्याच्या आणि मुक्कामाच्या मुबलक सोयी आता कोकणात सर्वत्र झालेल्या आहेत. त्यामुळे बराचसा प्रदेश भटकून आपण एखाद्या सागर किनाऱ्यावर निवांतपणे सूर्यास्त अनुभवू शकतो. जंजिरा, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग कोकणात आपली वाट पाहात आहेत.

जयगड किल्लय़ावरून समुद्र अफाट दिसतो. तिथेच शेजारी जिंदाल कंपनीने बांधलेले गणपतीचे मंदिर आणि त्याच्या बाहेरचा बगिचा आवर्जून पाहण्याजोगा आहे. जयगड किल्लय़ाच्याच शेजारी असलेले कऱ्हाटेश्वराचे शिवालय खास वाट वाकडी करून बघून यावे. परिसरात असलेले कोलिसरे येथील लक्ष्मीकेशव मंदिर आणि तिथली प्राचीन विष्णुमूर्ती पाहून थक्क व्हायला होते. तसेच पुढे आले की कवी केशवसुत यांचे जन्मस्थान असलेले मालगुंड, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे ही ठिकाणे ऐन उन्हाळ्यात भेट द्यावीत अशी आहेत.

अगदी दिवेआगरपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत अनेक सागरकिनारे मुद्दाम भेट द्यावेत असे आहेत. दीपगृहे न चुकता पाहावीत. एक वेगळाच खजिना त्यात दडलेला असतो. ऐन झाडीत वसलेली विविध देवस्थाने आणि मंदिरे मुद्दाम पाहावीत. त्यांचे फरसबंद प्रकार, लाकडी सभामंडप, त्यावर केलेली नक्षी, दगडी मंदिरांमुळे आलेला गारवा अनुभवायला याच दिवसात तर कोकणात जायला हवे. कुठल्याही सडय़ावरून भटकताना करवंदीच्या जाळ्या फुललेल्या असतात. तिथली करवंदं खाताना दोन-तीन तास कसे जातात कळत नाहीत.

ऐन उन्हाळ्यात कोकणात जावे. वसंत ऋतूने बहरलेला सगळा परिसर मनमुराद भटकावा. आपले गाव कोकणात असेल तर गावचा देव किंवा देवीच्या राउळात घालवलेला वेळ स्मरणीय असतो. पुन्हा आपल्या गावी निघताना देवाचे घेतलेले दर्शन, गुरवाने देवाला घातलेले गाऱ्हाणे आणि तिथून निघताना जड झालेली पावले, आपली पाळेमुळे याच कोकणच्या मातीत किती खोलवर रुजली आहेत याची आठवण करून देतात. शांत, निवांत आणि नितांत सुंदर कोकणात उन्हाळ्यात एकदा तरी मुद्दाम जावेच!

गावरान मेजवानी

आमरस, बिरडय़ाची उसळ, ओल्या काजूची उसळ, उकडीचे मोदक, फणसाचे सांदण, शेवया आणि नारळाचा रस, सोलकढी, कुळथाचे पिठले अशा अस्सल कोकणी पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. खास मत्स्याहारी लोकांसाठी या पदार्थासोबत माशांचे अनेकविध प्रकार कोकणात उपलब्ध असतात.

किनाऱ्यावरील सूर्यास्त

मनमुराद भटकंती करून संध्याकाळी समुद्रावर जावे. मावळत्या दिनकराला समुद्रकिनाऱ्यावर निरोप देणे यासारखे दुसरे सुख नाही. पूर्ण अंधार पडल्यावर वरती आकाशात लक्षावधी ताऱ्यांनी काढलेली रांगोळी बघावी. प्रदूषणविरहित वातावरणात अनेकदा आपल्या ओळखीचे तारेसुद्धा कळेनासे होतात. चांदण्या रात्री समुद्राच्या वाळूवर पायपीट करावी. चंद्राच्या प्रकाशात चमकणाऱ्या लाटा, आणि लांबवर मासेमारीसाठी गेलेल्या होडीतले लुकलुकणारे दिवे बघावेत.

vidyashriputra@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 12:29 am

Web Title: article on konkan delusion
Next Stories
1 कॉफी, टोफू आणि भाजलेली केळी
2 टेस्टी टिफिन : झटपट चिकन सँडविच
3 शहरशेती : कंद फुलझाडे
Just Now!
X