हेमंत बावकर

मारुती सुझुकीने भारतीय ग्राहकांची गरज ओळखून स्विफ्ट ही कार बाजारात आणली. दोन महिन्यांपूर्वी नवी कोरी वाटणारी स्विफ्टची तिसरी आवृत्तीही आणली गेली. परंतू, स्विफ्टची वाहनप्रेमींवर असणारी जादू नवी स्विफ्ट खरचं पेलू शकेल का? नव्या रुपड्यातील बरेचशे बदल खरच लोकांना भूरळ घालतील का? की क्वालिटीच्या जमान्यात ती तकलादू ठरेल? अशा अनेक प्रश्नंची उत्तरे चला पाहूया..

मारुती सुझुकीने गेल्या काही दशकांत सर्वसामान्यांच्या मनात स्थान बनविले आहे. साधारण दशकभरापूर्वीपहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहकाची पहिली पसंद मारुतीच्या कारना होती. यामध्ये ओम्नी, अल्टो, व्ॉगन-आर या ‘खिशात बसणाऱ्या’ कार येत होत्या. मात्र सर्वसामान्यांमधला थोडासा श्रीमंत वर्ग यामुळे दुर्लक्षिला जात होता. तो इतरत्र वळू लागल्याने मारुतीने २००५ मध्ये स्विफ्ट ही हॅचबॅक आणि स्विफ्ट डिझायर ही सेदान कार बाजारात आणली आणि ती पाहता पाहता ग्राहकांच्या पसंतीसही उतरली. आता तिसरी आवृत्ती एकदम नव्या आकर्षक स्वरुपात कंपनीने बाजारात आणली आहे. स्विफ्टचे अ‍ॅटोमॅटिक गिअरचे १.२ लिटर पेट्रोल व्हर्जन ‘लोकसत्ता’चा टीमकडे रिव्ह्य़ूसाठी आले होते. आम्ही जवळपास ६०० किमी ओबडधोबड रस्ते, खड्डय़ांचे आणि चकचकीत रस्त्यावर ही कार चालविली. साधी स्क्रीन असलेली म्युझिक सिस्टिम, कीलेस एन्ट्री, पुश स्टार्टबटन आणि अ‍ॅटोमॅटीक गिअर्समुळे कार चालविताना आलेला अनुभव काहीसा वेगळा होता.

कारची अंतर्गत रचना आकर्षक आणि प्रशस्त आहे. अंतर्गत प्लॅस्टिकची गुणवत्ता मारुतीच्या आणि नेक्साच्या इतर कारच्या तुलनेने चांगली आहे. सीटचे कुशनिंग आणि मांडय़ांना असलेला आधार आरामदायी आहे. ग्राहकांची ‘किती देते?’ ही मानसिकता आणि इंधनाचे दिवसेंदिवस वाढणारे दर पाहून नव्या स्विफ्टचे वजन कंपनीने तब्बल १०० किलोंनी घटवले. मात्र, याचा परिणाम काहीसा कारच्या गुणवत्तेवरही झालेला जाणवला. काहीसे हलक्या दर्जाचे बंपरचे प्लॅस्टिक, पातळ पत्रा वापरण्यात आला आहे. मारुतीच्या कार किफायतशीर म्हणून ओळखल्या जात असल्या तरी एखादी छोटीशी दुर्घटना किंवा मोटारसायकल जरी बंपरवर आदळली तरी बंपरला तडे जातील असा या प्लॅस्टिकचा दर्जा आम्हाला दिसून आला. यामुळे हा जादाचा खर्चही विचारात घेण्यासारखा आहे.

खड्डय़ांच्या रस्त्यावरून जाताना धक्के जाणवत नव्हते. पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते, गतिरोधकाचे दणके न जाणवू देण्याएवढे चांगले सस्पेंशन स्विफ्टमध्ये देण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर एका बाजुला उंच-सखलपणा असेल तर कार भर समुद्रात होडी जसे हेलकावे घेते तसे हेलकावे घेत असल्याचे जाणवले.

वजन कमी केल्याने दृतगती महामार्गावर कार खूप हलकी वाटली. १२० किमीच्या वेगामध्ये स्विफ्ट आरामात मार्गक्रमण करत होती. चढणीच्या वाहतूक कोंडीमध्येही स्विफ्टने पिकअप आणि काहीशा चिंचोळ्या जागेतून जाण्यास निराश केले नाही. अ‍ॅटोमॅटिक गिअरमुळे कोंडीमधून वाट काढणे मॅन्युअल गिअरच्या कारपेक्षा सोपे वाटले. मात्र, वळणावर काहीवेळा कार अनियंत्रित झाली. खड्डे चुकविताना हलक्या स्टिअरिंगमुळे खूप सोपे जात होते. म्युझिक सिस्टिमचा आवाजाचा दर्जा काहीसा त्रासदायक वाटला. स्टिअरिंगवर फोनकॉल उचलने, ठेवणे यासाठी वेगळी बटने आहेत. शिवाय ब्लुटुथ, गाणी पुढे-मागे, आवाज कमी-जास्त करण्याची बटने दिली आहेत. ३७ डीग्रीच्या तापमानामध्ये अ‍ॅटोमॅटिक एसी गाडीतील वातावरण थंड ठेवत होता.

एजीएस(एएमटी) गिअर धोक्याचा ?

मारुतीने जवळपास सर्व कारमध्ये एजीएसचा पर्याय दिला आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या वाहतूक कोंडीच्या शहरांमध्ये एजीएस गिअरच्या कार वापरणे खूप सोपे बनले आहे. सारखा क्लच आणि गिअर बदलावा लागत नसल्याने काही तासांच्या कोंडीतही आराम मिळतो. मात्र, एकेरी रस्त्यावर एखादा ट्रक, ट्रेलर किंवा बसला ओव्हरटेक करताना ही कार दगा देणारी आहे. ओव्हरटेकसाठी ८०-८५ चा वेग पुरेसा असताना अकारण पिकअपसाठी पाचव्या गिअरवरून चौथा आणि पुन्हा तिसरा गिअर पडल्याने कारचा वेग तुटला व समोरून येणारे परंतू दूर असलेले वाहन अगदी पुढय़ात येऊन ठेपले. केवळ प्रसंगावधानामुळे अपघात टळला. असा दोनदा प्रकार झाल्याने पुढील मार्गावर मोठय़ा वाहनांना ओव्हरटेक करण्याचे शक्यतो टाळले. यामुळे आठ लाखांची कार केवळ शहरातच चालवायची का असा प्रश्नही काही काळ मनात रेंगाळत होता.

मायलेज

कंपनीने मायलेज चांगले देण्यासाठी कारच्या वजनात जरी घट केलेली असली तरीही पेट्रोल एएमटी कारने आम्हाला या ६०० किमीच्या प्रवासात १४ किमी प्रतिलिटरचे मायलेज दिले. बऱ्याचदा अकारण होणारे गिअर बदलही मायलेजवर मोठा परिणाम करत होते. आजच्या पेट्रोलच्या किंमती पाहता सहा-सात रुपये प्रतिकिमीसाठी खर्च झाले. याशिवाय गाडीचा देखभाल खर्च वेगळाच असतो.

सुविधा

कारमध्येपुढील दोन्ही दरवाज्यांमध्ये साधारण दीड लिटरच्या पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची जागा. गिअरसमोर कप होल्डर्स, मध्यभागी अर्धालिटर बॉटल ठेवू शकता. मागील दरवाजांमध्येही पाणी बॉटल ठेवण्याची सोय. लगेज स्पेसही समाधानकारक आहे. मागील सीट ४०-६०च्या प्रमाणामध्ये फोल्ड करता येतात. पाठीमागे पाय ठेवण्यासही जागा चांगली आहे. चालकाच्या सीटला उंची अ‍ॅडजस्ट करण्याची सुविधा. मात्र, स्टिअरिंग केवळ टील्ट चा पर्याय आहे. मिरर अ‍ॅडजस्मेंट, फोल्डिंगची एका बटनावर सोय.

कमतरता- रात्रीच्यावेळी मिटर कन्सोलची लाल-पांढरी लाईट डोळ्यांना त्रासदायक. तसेच रिअर व्ह्य़ू मिरर हा थोडा खाली असल्याने डावीकडून मुख्य रस्त्यावर येणारी कार किंवा मोठे वाहन (ब्लाईंड स्पॉट) दिसत नाही. सारखा दचके देत बदलत राहणारा गिअर काहीसा त्रासदायक. अंधारात दरवाजा लॉक-अनलॉक किंवा काचा खाली वर करण्यासाठी बटनांमध्ये लाईट नसल्याने चाचपडावे लागते. टचस्क्रीनचा अभाव.

वेगळेपण

कीलेस एन्ट्रीमुळे पहिल्या अनलॉकवेळी केवळ चालकाचा दरवाजा अनलॉक होतो. इतर दरवाजे उघडण्यासाठी दुसऱ्यांदा अनलॉक बटन दाबावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने चांगली सुविधा म्हणावी लागेल. मागील दरवाजा खोलण्यासाठी वरच्याबाजूला सोय करण्यात आली आहे.

स्पर्धक

ह्य़ुंदाई ग्रँड आय १०, फोर्ड फिगो, फोक्सव्ॉगन पोलो, टोयोटा लिवा

hemant.bavkar@expressindia.com