29 February 2020

News Flash

खिशात ‘स्कॅनर’

मोबाइलचा वापर करणाऱ्या अनेकांच्या मोबाइलमध्ये ‘कॅम स्कॅनर’ हे अ‍ॅप्लिकेशन दिसून येते.

(संग्रहित छायाचित्र)

आजच्या धावत्या काळात प्रत्येकाला वेळ काढून सायबर कॅफेमध्ये जाऊन कागदपत्रे स्कॅन करणे तितकेसे शक्य होत नाही, यावर अद्ययावत तंत्रज्ञानाने मात करत दहा वर्षांपूर्वी विविध मोबाइल स्कॅनिंग अ‍ॅप्लिकेशन बाजारात आणले आणि भल्या मोठय़ा आकाराच्या स्कॅनिंग मशीनची व्यक्तिगत गरज काहीशी कमी झाली. थेट मोबाइल काढून त्यातील विविध स्कॅनिंग अ‍ॅप्लिकेशनद्वारे त्यांची कागदपत्रे अनेक जण स्कॅन करू लागले. हव्या त्या प्रकारे, हवे ते कागदपत्र सुयोग्य प्रमाणात या अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्कॅन होऊ लागले. विद्यार्थी, कार्यालयीन व्यक्तींकडून सध्या उपयुक्त आणि अधिक प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या विविध स्कॅनिंग मोबाइल अ‍ॅप्लिकेशनविषयी जाणून घेऊ यात..

कॅम स्कॅनर

मोबाइलचा वापर करणाऱ्या अनेकांच्या मोबाइलमध्ये ‘कॅम स्कॅनर’ हे अ‍ॅप्लिकेशन दिसून येते. आठ वर्षांपूर्वी हे अ‍ॅप्लिकेशन बाजारात आले. त्यानंतर अनेकांच्या पसंतीस हे अ‍ॅप्लिकेशन उतरले. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर हे अ‍ॅप्लिकेशन उपल्बध आहे. कोणतेही कागदपत्र चांगल्या प्रकारे मोबाइलद्वारे या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅन करता येते. स्वतची अधिकृत मुद्रा (वॉटर मार्क) त्यावर तयार करू शकतो. यामध्ये सब्रस्क्रिप्शन विकत घेतल्यानंतर वापरकर्त्यांला काही स्कॅन केलेली कागदपत्रे एडिट करता येतात, तयार झालेली पीडीएफ फाइलदेखील एडिट करता येते. आयडी कार्ड स्कॅन, क्यू आर कोड स्कॅनची सुविधाही यात देण्यात आली आहे. स्कॅन केलेले कागदपत्र आपल्याला पीडीएफ किंवा इमेज स्वरूपात जतन करता येते. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये ओसीआर- ऑप्टिमाइझ स्कॅन क्वालिटी तसेच नको असलेल्या भागाला योग्य प्रकारे कात्री लावता येण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्कॅन केलेली फाइल ही थेट व्हॉटस्अ‍ॅप किंवा मेल करता येते.

टायनी स्कॅनर

फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असणाऱ्या या टायनी स्कॅनर अ‍ॅप्लिकेशनची मोबाइल वापरकर्त्यांमध्ये मोठी चर्चा आहे. वायफायद्वारे संगणकाला हे अ‍ॅप्लिकेशन जुळवून संगणकातून एखादा फोटो थेट स्कॅन करता येण्याचा पर्याय या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कागदपत्रांमधील अक्षरे ठळक करता येतात. एखादे स्कॅन केलेले कागदपत्र महत्त्वाचे असेल तर पासवर्डद्वारे ते सुरक्षित ठेवण्याचा पर्यायदेखील या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. प्रतिमा हलू न देण्याचा पर्याय या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतो. जेणेकरून मोबाइलद्वारे कागदपत्राचा फोटो काढताना मोबाइल हलला तरी त्याचा अनावश्यक परिणाम स्कॅनिंग केलेल्या कागदपत्रावर होत नाही. स्कॅन केलेले कागदपत्र थेट फॅक्स करण्याचा पर्यायदेखील यामध्ये उपलब्ध आहे.

अ‍ॅडॉब स्कॅन

अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीवर उपलब्ध असणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्कॅनिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असे हे अ‍ॅप्लिकेशन आहे. एखादे मोठे पुस्तक चांगल्या प्रकारे या अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्कॅन करता येते. एखादे बिझनेस कार्ड योग्य प्रकारे स्कॅन करण्याचा पर्याय अ‍ॅडॉब स्कॅनमध्ये उपलब्ध आहे. कागदपत्रांसह स्कॅन केलेल्या एखाद्या कागदावरील अक्षरे कॉपी करून ती दुसरीकडे वापरण्याचा पर्याय या अ‍ॅप्लिकेशनमध्ये कंपनीने दिला आहे. मोबाइलच्या फोटो गॅलरीमधील जुना फोटोही या अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्कॅन करता येतो. एखादी पावती चांगल्या प्रकारे स्कॅन करून जतन करता येते. ओसीआर- ऑप्टिमाइझ स्कॅन क्वालिटी पर्याय अ‍ॅडॉब स्कॅनमध्ये देण्यात आला आहे.

क्लीअर स्कॅनर

एखादा फोटो चांगल्या प्रकारे स्कॅन व्हावा याकरिता अनेक वापरकर्ते क्लीअर स्कॅनरचा वापर करत असतात. अनेकदा काही स्कॅनिंग अ‍ॅप्लिकेशनमध्ये गणितीय कागदपत्रे चांगल्या प्रकारे स्कॅन होत नाहीत. मात्र क्लीअर स्कॅनरमध्ये गणितीय कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर अंकाची स्पष्टता अधिक चांगली होते. जेपीईजी आणि पीडीएफ या दोन्ही फॉरमॅटमध्ये कागदपत्रे स्कॅन करता येतात. स्कॅन केलेल्या कागदपत्रांचा रंग आकर्षक दृष्टिकोनातून बदलता येतो. लीगल, लेटर आणि ए४ अशा विविध आकारांमध्ये कागदपत्रे स्कॅन करता येताता. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स स्कॅनर

मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स स्कॅनर अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्कॅन केलेली कागदपत्रे अधिक ठळक करण्याचा पर्याय अ‍ॅप्लिकेशनमध्ये देण्यात आला आहे. स्कॅन केलेल्या फाइल्स या थेट गूगल ड्राइव्ह तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राइव्हमध्ये जतन होतात. शाळेतील किंवा महाविद्यालयातील व्हाइट बोर्डही चांगल्या प्रकारे अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्कॅन करता येतो. हाताने लिहिलेले किंवा छापील मजकूर योग्य प्रकारे डिटेक्ट करणारे असे हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स स्कॅनर अ‍ॅप्लिकेशन आहे. अ‍ॅप्लिकेशनमध्ये काही फोटो हे वर्डमध्ये तसेच पीडीएफमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

संकलन- ऋषिकेश मुळे

@rushikeshmule24

First Published on May 23, 2019 12:11 am

Web Title: article on mobile scanner
Next Stories
1 घरातलं विज्ञान : ‘इन्स्टंट’चा जमान
2 परदेशी पक्वान्न : आंबा-पालक स्मूदी
3 ऑफ द फिल्ड : क्रीडापटूंमधील समलैंगिकता
X
Just Now!
X