आत्माराम परब

मोरोक्को, उत्तर-पश्चिम अफ्रिकेतला एका टोकावरचा देश. एका बाजूला अटलांटिक महासागर, एका बाजूला भूमध्य समुद्र, एकीकडे नऊ हजार फूट उंचीची विरळ अशी हिमाच्छादित शिखरं, तर एका बाजूला जगप्रसिद्ध सहार वाळवंटाचे शेवटचे टोक अशा प्रचंड वैविध्याने नटलेला देश. इथे जेवढे नैसर्गिक वैविध्य दिसते तेवढीच सामाजिक विविधताही आढळते.

मोरोक्को हा तसा अधिकृत मुस्लीम देश. पण तिथे बराच काळ स्पॅनिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांचं आधिपत्य होतं. त्यामुळे येथील भाषेवर त्यांच्या भाषेचा पगडा अजूनही टिकून आहे. काही प्रमाणात वास्तुकलेत आणि काही सामाजिक रीतिरिवाजांतदेखील हा प्रभाव दिसून येतो. मुस्लीम देश असूनही कोठेही कट्टरता जाणवत नाही की बुरखा परिधान केलेल्या महिलादेखील दिसत नाहीत. असा हा वैविध्यपूर्ण देश.

स्वतंत्रपणे मोरोक्कोची भटकंती करणारे तसे फारच कमी असतात. अनेकदा स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को अशी टूर आखली जाते. पण त्यामध्ये मोरोक्कोसाठी अवघे दोन दिवस असतात. स्पेन आणि मोरोक्कोमध्ये असणाऱ्या १६ किलोमीटरच्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमुळे तसा हा युरोपला जवळ असणारा देश. पण मोरोक्कोचे सारे वैविध्य पाहायचे असेल तर किमान १० दिवस तिथे भटकायला हवे. मोरोक्कोतली गावे, वाळवंटातील पाच-दहा दिवसांची सफर, स्पेनच्या बाजूची बर्फाच्छादित शिखरे आणि तेथील गावे असे बरेच काही आहे. वाळवंटी प्रदेशाची जोड असल्याने खजुराचे उत्पादन प्रचंड आहे. तर जगातील सर्वात मोठय़ा सोलर पॅनलच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. जगातील सध्याचे सर्वात मोठे सोलर पॅनल हे कॅलिफोर्नियात आहे. मोरोक्कोच्या पॅनलचे काम पूर्ण झाले की ते पहिल्या क्रमांकावर येईल.

मोरोक्कोमधील वास्तुवैभव तसे संमिश्र आहे. काही प्राचीन तर काही अगदी अलीकडच्या काळातील सुंदर वास्तू येथे आहेत. मशीद, मदिना म्हणजे शाळा आणि मिनारेट्स यांचा त्यात समावेश होतो. येथील मुस्लीम स्थापत्यामध्ये घुमटाचा वापर दिसत नाही. सगळा भर हा उंच खांब आणि मिनारांवर आहे. राजा हसन दुसरा यांनी बांधलेली मशीद आणि मिनार हे भव्य या सदरात मोडणारे आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेला हा मिनार तब्बल २१० मीटर इतका उंच असून, जगातील सर्वात उंच धार्मिक वास्तू म्हणून तो ओळखला जातो. कासाब्लांका येथील ही वास्तू अनेक वैशिष्टय़ांनी युक्त आहे. मशिदीच्या आतील कलाकुसर, भव्य झुंबरे, पाणी पिण्याच्या जागा, नमाजापूर्वी हात-पाय धुण्याच्या जागा, दरवाजे अशा प्रत्येक ठिकाणी वास्तुसौंदर्य ओसंडून वाहताना दिसते. हसन दुसरा या राजाने असाच आणखी एक भव्य मिनार रबात येथे बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र ती वास्तू पूर्ण होऊ शकली नाही. सध्या त्या वास्तूचे जे अर्धवट स्वरूप पाहायला मिळते तेदेखील खूप भव्य आहे.

मोरोक्कोमध्ये फिरताना काही महत्त्वाच्या समान बाबी जाणवतात. येथील पाणपोया या एका विशिष्ट पद्धतीच्या कमानीत बांधलेल्या आहेत. प्रत्येक पाणपोईची मोझ्ॉक पद्धतीने सजावट केलेली असते. हीच मोझ्ॉक पद्धत येथील बहुतांश घरांच्या दरवाजांवरदेखील दिसून येते. चिनीमातीचे बारीक रंगीत तुकडे लावून सजवलेले हे दरवाजे मोरोक्कोत अगदी सर्वत्र दिसतात. एकूणच मोरोक्कोच्या सार्वजनिक वास्तूंमध्ये एक प्रकारची कलात्मकता जोपासली आहे. अनेक गावांमध्ये प्रवेश करताना दुतर्फा असलेल्या विजेच्या दिव्यांच्या खांबांमध्येदेखील असाच जुन्या-नव्याचा संगम दिसून येतो. प्रत्येक गावातील खांबांचे आणि दिव्यांचे रंग वेगवेगळे आहेत. इतकेच काय, प्रत्येक राज्यातील टॅक्सीचे रंगदेखील वेगवेगळे आहेत. प्रत्येक खोऱ्याची ओळख असणारे फूल, फळ यानुसार त्या त्या खोऱ्यात एक त्या फळाची, फूलाची प्रतिकृती असणारी सुंदर वास्तू भर चौकात दिसते.

येथील प्राचीन गावांची रचना ही काहीशी बंदिस्त भुईकोटांसारखी आहे. ही गावे फोट्र्रेस म्हणजेच कसबा या नावाने ओळखली जातात. कसब्यांमध्येच शाळा, दुकानं, दवाखाने अशा सर्व सुविधा आहेत. कसबे चांगलेच मोठे असतात आणि आजही वापरले जातात. त्यातील काही ठिकाणी अनेक पारंपरिक व्यवसायदेखील मोठय़ा प्रमाणात सुरू असतात. त्यापैकीच एक म्हणजे चामडे कमावणे आणि त्यापासून वस्तू तयार करणे. सहार वाळवंटाचे उत्तर-पश्चिम टोक असणारा भाग तर आणखी वेगळ्या भौगोलिक रचनांचा आहे. सहार वाळवंटातील सर्वात उंच असा हा भाग वाळूच्या अनेक टेकडय़ांनी व्यापलेला आहे. या टेकडय़ादेखील तब्बल ७०० ते १५०० फूट उंचीच्या. सहार वाळवंटात इतरत्र ही रचना क्वचितच दिसते.

atmparab2004@yahoo.com