मकरंद जोशी

उन्हाळ्याचा भर ओसरता ओसरता पुन्हा सूर्य तापला की मग मात्र आपल्यासमोर एकच आसरा राहतो, पहाडांच्या माथ्यावरील गारव्यामध्ये बुडून जाणे. आपल्या भारताला हिमालयाची साथ सोबत लाभल्याने ऐन उन्हाळ्यातही खरोखरच थंडगार हवेने जिवाला गार करणाऱ्या ठिकाणांची कमतरता नाही. हिमाचल प्रदेश असो किंवा सिक्कीम, उत्तराखंड असो वा काश्मीर, सरत्या उन्हाळ्यात ही राज्ये पर्यटकांना नक्की खूश करतात.

हिमाचल प्रदेश म्हटल्यावर शिमला आणि मनालीची आठवण तर हमखास होणारच, पण या दोन ठिकाणांमध्ये कुल्लु व्हॅली आहे आणि या व्हॅलीत अनेक झकास ठिकाणे आहेत. हिमाचलमधला एकमेव विमानतळ भुंतर येथे आहे, तिथे उतरायचे आणि कसोलकडे जाणाऱ्या वाहनात बसायचे. कसोल हे छोटेसे गाव पार्वती नदीच्या किनाऱ्यावर पहुडलेले आहे. अवतीभवती उंच उंच पहाड, त्यांच्या माथ्यावर बर्फाचा शिडकावा आणि अंगाखांद्यावर हिरव्यागार झाडांची दाटी यामुळे हा सगळा परिसरच रमणीय भासतो. ५१८० फुटांवर वसलेल्या कसोलमध्ये तीन-चार दिवस मुक्काम करून आजुबाजूच्या काही ठिकाणांना भेट देता येते. मध्यम दर्जाच्या हॉटेल्सपासून ते नदीकाठच्या तंबूनिवासापर्यंत इथे राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कसोलमधून तुम्ही खिरगंगा, मलाणा असे छोटे छोटे ट्रेक करू शकता. चंद्रखणी आणि देव तिब्बा या हिमशिखरांच्या छायेत आठ हजार फुटांवर मलाणा हे चिमुकले गाव वसलेले आहे. या गावात बोलल्या जाणाऱ्या ‘कनाशी’ या भाषेपासून ते इथल्या रीतीरिवाजांपर्यंत सारेच मुलखावेगळे आहे. इथले लोक स्वत:ला अलेक्झांडर द ग्रेट्च्या सैन्याचे वंशज समजतात. जमलू ऋषींनी घालून दिलेले नियम पाळणारे हे लोक आजही जमलू याच ग्रामदेवतेची पूजा करतात.

कसोलहून मणिकरण हे तीर्थस्थान अगदी जवळ आहे. या ठिकाणी गरम पाण्याची कुंडे आहेत. शीख धर्मीयांचे गुरुनानकजी यांच्या चमत्काराने हे गरम पाणी जमिनीतून बाहेर आले अशी शीख धर्मीयांची श्रद्धा आहे. तर हिंदू पुराणकथेनुसार या ठिकाणी पार्वतीने आपल्या अलंकारातील मणी हरवला होता, तो शोधूनही सापडला नाही म्हणून शिवशंकर कोपले आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी शेषाने जोरदार उच्छ्वास सोडला, त्यामुळे कुंडातले पाणी गरम झाले आणि पार्वतीचा मणी बाहेर आला. मणिकरणवरून पुढे गेल्यावर तोश नदीच्या काठचे तोश गाव लागते. या निसर्गरम्य गावामध्ये हिमालयातले पक्षी पाहायला मिळतात. तोशहून तुम्ही पदभ्रमण करत खीरगंगा गाठू शकता. ९७०० फुटांवर हिमालयाच्या पहाडांमध्ये वसलेल्या या ठिकाणी शिवशंकरांनी हजारो वर्षे तपश्चर्या केली होती. त्या ठिकाणी दुधासारखा पांढरा शुभ्र गरम पाण्याचा झरा वाहतो आहे.

उन्हाळा सरता सरता जाण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे उत्तराखंडमधील लँडोर. डेहराडूनजवळच्या मसुरीला खेटून सुमारे सात हजार फुटांवर हे लहानसं गाव वसलेलं आहे. ब्रिटिश राजमध्ये ‘वेल्स’मधल्या एका गावाच्या नावावरून लँडोर हे नाव देऊन हे गाव वसवण्यात आलं. सिडार, ओक पाइन, ऱ्होडोडेंड्रॉन वृक्षांनी भरलेल्या या गावात मुक्काम ठोकून दोन-चार दिवस निवांतपणे काढले की शरीर मनावरचा सगळा ताण सहज गळून पडतो. चार दुकान हे इथले मार्केट नावाशी इमान राखून आहे तर लाल तिब्बा या इथल्या सर्वात उंच ठिकाणावरील निसगदृश्य भान हरपून टाकणारे असते.

उन्हाळा संपत आला तरी तुमची उन्हाळ्यातील सहल बाकी असेल तर या ठिकाणांचा नक्की विचार करा. शिवाय पेंच, कान्हासारख्या राष्ट्रीय उद्यानांना भेट देऊन वाघोबांची भेट होते का हे पाहायलाही हरकत नाही. या काळात लडाखचे रस्ते हळूहळू सुरू होत असतात त्यामुळे लडाखचा बेतही आखता येईल.

जंगलातील हिरवाई

उन्हाळ्यातला गारवा जसा हिमालयातील पहाडांमध्ये मिळतो तसाच तो गर्द जंगलांतील हिरवाईतही मिळू शकतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घनदाट जंगलातील फेरफटका आणि रिव्हर राफ्टिंगचा थरार एकत्र अनुभवायचा असेल तर कर्नाटकातील दांडेलीला अवश्य भेट द्यावी. उत्तर कन्नाडा जिल्ह्य़ातील दांडेलीचे अरण्य हे हत्तींपासून ते किंगकोब्रापर्यंत विविध प्रकारच्या जीवसृष्टीने समृद्ध आहे. सुमारे २०० प्रकारचे पक्षी या जंगलात पाहायला मिळतात. ज्यामध्ये ग्रेट पाइड हॉर्नबिल, ग्रेटर फ्लेमबॅक, ब्लॅक इगल अशा पक्ष्यांचा समावेश होतो. शेकरू आणि अस्वलांना सहारा देणाऱ्या दांडेलीच्या जंगलात ब्लॅक पँथरही आहे. दांडेलीमधून काली नदी वाहते. या नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये राफ्टिंगचा थरारक अनुभव घेता येतो. शिवाय कावळा केव्हज, सिंथेरी रॉक, उलवीचे प्राचीन मंदिर या ठिकाणांमुळे दांडेलीची भेट रंगतदार ठरते.

makarandvj@gmail.com