ऋषिकेश बामणे

एका सिमेंट कंपनीच्या जाहिरातीत ‘भैया, ये दिवार टुटती क्यूं नहीं?’ हा संवाद सध्या आयपीएलच्या मैदानात ऐकायला मिळत आहे. फरक फक्त इतकाच की, इथे ‘दिवार’च्या ऐवजी ‘बेल्स’ला उद्देशून ‘ये बेल्स गिरती क्यूं नहीं?’ असे विचारले जात आहे. याला कारणही आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत तीन वेळा अशी घटना घडली ज्यावेळी चेंडूने यष्टय़ांना स्पर्श करूनदेखील बेल्स खाली पडल्या नाहीत. यांमुळे एकीकडे गोलंदाजांच्या फुटक्या नशिबाची चर्चा रंगली असताना यामागे गौडबंगाल काय, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

एलईडी यष्टय़ा बनतात कशा?

साधारणपणे यष्टय़ा लाकडापासून बनवल्या जातात. मात्र एलईडी यष्टय़ांमध्ये वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. यामध्ये एलईडी लाइट बसवून यष्टय़ा व बेल्स दोघांमध्येही मायक्रो प्रोसेसर जोडल्यामुळे या दोन्ही एकमेकांपासून वेगळय़ा झाल्या की यष्टय़ांतील दिवे पेटतात. जुलै २०१३मध्ये आयसीसीने एलईडी यष्टय़ांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापर करण्याची परवानगी दिली. त्यानंतर २०१४ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात याचा सर्वप्रथम उपयोग करण्यात आला. मात्र ही मूळ संकल्पना २०१२च्या बिग बॅश लीगमधून आली. एक एलईडी यष्टी बनवण्यासाठी जवळपास ७५ हजार रुपये खर्च येतो. तर एका सामन्यासाठी संपूर्ण सहा यष्टय़ांचा (बेल्ससह) संच बनवण्यासाठी २५ लाख रुपये मोजावे लागतात.

समाजमाध्यमांवर हास्यकल्लोळ

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन-चार वेळा अशा घटना घडल्यामुळे समाजमाध्यमांवर क्रीडाप्रेमींमध्ये याविषयी फार चर्चा रंगली. काहींनी ट्विटरवर एलईडी यष्टय़ा व बेल्सचे छायाचित्र टाकून त्याखाली ‘ये है फेविकॉल मजबूत जोड’ असा मजकूर लिहिला. तर काहींनी पंचांनीच त्यांच्या चुकांकडे कोणाचे लक्ष जाऊ नये म्हणून बेल्स यष्टय़ांना चिपकवून ठेवल्या असाव्यात, अशा प्रकारचे मिम्स बनवले. याव्यतिरिक्त किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत धोनीने लोकेश राहुलला धावचीत करण्यासाठी यष्टय़ांवर चेंडू फेकूनही बेल्स न पडल्यामुळे काही नेटकऱ्यांनी धोनीचे राजस्थानविरुद्धच्या सामन्यातील छायाचित्र टाकून त्याला ‘जैसी करनी, वैसी भरनी’ या कॅप्शनसह ट्रोल केले.

बेंगळुरु वि. चेन्नई

(२१ एप्रिल)

उमेश यादवने टाकलेल्या डावाच्या चौथ्या षटकातील एक चेंडू चेन्नईच्या फाफ डय़ू प्लेसिसला चकवत यष्टय़ांची कड घेऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. मुख्य म्हणजे यावेळी तर लाइटही पेटली नाही. मात्र रिप्लेमध्ये चेंडू यष्टय़ांना स्पर्श करून गेल्याचे निदर्शनास आले.

कोलकाता विरुद्ध राजस्थान

( ७ एप्रिल)

जयपूरला झालेल्या या सामन्यात धवल कुलकर्णीने टाकलेल्या अप्रतिम आऊट स्विंगने कोलकाताच्या ख्रिस लीनला चकवत थेट यष्टय़ांचा वेध घेतला, मात्र चेंडू यष्टय़ांना लागूनदेखील बेल्स खाली पडल्या नाहीत. उलट काही क्षणांसाठी बेल्स हवेत उडून त्यातील लाइटही पेटली, मात्र त्या पुन्हा यष्टय़ांवरच जाऊन बसल्या. यामुळे लीनला नाबाद ठरवण्यात आले.

चेन्नई विरुद्ध राजस्थान

(३१ मार्च)

जोफ्रा आर्चरसारख्या ताशी १४५ किमी वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाने महेंद्रसिंह धोनीला टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टय़ांवर आदळला. मात्र बेल्स खाली न पडल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. तेव्हा धोनी ‘नाबाद’ ठरवला गेला आणि अखेरीस त्यानेच तो सामना चेन्नईला जिंकवून दिला.