ऋषिकेश बामणे

एखाद्या ‘डेली सोप’मधील बालकलाकार किंवा देखणा मुलगा-मुलगी चाहत्यांना त्यांच्या अभिनयाद्वारे लगेच भुरळ घालतात. परंतु आपले आवडते कलावंत अभिनयाव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्रातही तितकेच पटाईत असतील, याचा कधी तुम्ही विचार केला का? आजचे सदर हे अशाच काही क्रीडापटूंच्या सेकंड इनिंगवर आधारित.

सखी दातार

सोनी मराठी वाहिनीवरील सुरू असलेली ‘ह. म. बने-तु. म. बने’ ही लोकप्रिय कौटुंबिक मालिका तुम्ही पाहिली असेलच. या मालिकेत ‘सई’ या मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी सखी दातार एक उत्कृष्ट कॅरमपटू आहे. ठाणे येथे राहणारी सखी सध्या मुलुंडच्या नालंदा पब्लिक शाळेत शिकत आहे. जवळपास वयाच्या ९व्या वर्षी घरी विरंगुळा म्हणून कॅरम खेळतानाच सखीला या क्रीडाप्रकाराची ओढ लागली. त्यानंतर प्रशिक्षक वीणा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सखीने अधिक भरारी घेतली. कॅरमप्रमाणेच अभिनयाची आवड असलेल्या सखीची गतवर्षी या मालिकेसाठी निवड झाली. तेव्हापासून ती तिच्या निरागस अभिनयाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. नाना पाटेकर यांच्या सुप्रसिद्ध ‘नटसम्राट’ चित्रपटात त्यांच्या नातीची भूमिका करणाऱ्या व्यक्तिरेखेला सखीचाच आवाज देण्यात आला आहे. अभिनयाव्यतिरिक्त कॅरममध्येही सखीने सलग दोन वर्ष १२ वर्षांखालील गटात राज्य विजेतेपद मिळवले. त्याशिवाय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक गटात उपविजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राचे तिने प्रतिनिधित्व केले आहे.

सलील अंकोला

१९८९-९०च्या काळात उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा सलील अंकोला फार क्वचितच कोणाला आठवत असेल. भारतासाठी एक कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळलेल्या सलीलने १९९६मध्ये हाडांच्या टय़ुमरमुळे क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकला. मात्र २१व्या शतकात सलीलने अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमातून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. २०००मध्ये ‘कुरुक्षेत्र’ या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने या क्षेत्रात पर्दापण केले. एकेकाळी चाहत्यांच्या मनावर घर करणाऱ्या स्टार वन वाहिनीवरील ‘विक्राल व गब्राल’ या मालिकेत त्याने विक्रालची भूमिका साकारली. त्याशिवाय ‘शू कोई है’ या मालिकेतही त्याने साकारलेली व्यक्तिरेखा अनेकांना आवडली.

करण वाही

अनेक मुलींचा लाडका असलेल्या दिल्लीच्या करण वाहीने २००३मध्ये दिल्लीच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याशिवाय त्याची विराट कोहली, शिखर धवन यांच्यासह १९ वर्षांखालील संघातही निवड झाली होती. परंतु एका मोठय़ा दुखापतीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आली. पुढे २००४मध्ये मुंबईत स्थायिक झाल्यावर त्याने अभिनय आणि मॉडेलिंगकडे अधिक लक्ष केंद्रित केले. स्टार वनवरील ‘दिल मिल गए’ या मालिकेत त्याने डॉ. सिद्धांत मोदीची भूमिका साकारली. गतवर्षी आलेल्या ‘हेट स्टोरी ४’ या चित्रपटाद्वारे त्याने मोठय़ा पडद्यावर पदार्पण केले.

प्राची तेहलान

२९ वर्षीय प्राची तेहलान ही भारतीय नेटबॉल व बास्केटबॉलपटू असून हिंदी मालिकेतही काम करते. २०१०मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्राचीने भारताच्या नेटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. तिच्याच नेतृत्वाखाली भारताने २०११च्या दक्षिण आशियाई सागरी क्रीडा स्पर्धेमध्ये नेटबॉलमधील पहिलेवहिले पदक मिळवले. मात्र नेटबॉल या क्रीडाप्रकाराला फारसा प्रकाशझोत मिळत नसल्यामुळे प्राचीने अभिनयाकडे गाडी वळवली. जानेवारी, २०१६मध्ये प्राचीची स्टार प्लस या वाहिनीवरील ‘दिया और बाती हम’ या मालिकेसाठी निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त ‘अर्जून’ या पंजाबी चित्रपटातही प्राचीने निम्मी ही व्यक्तिरेखा साकारली होती.